साधी-सोपी टेक्नॉलॉजी-आईसाठी-माहेर, दादा-वहिनीसाठी-मेनका आणि तुमच्यासाठी-जत्रा !

Started by Atul Kaviraje, August 31, 2022, 09:46:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "साधी-सोपी टेक्नॉलॉजी"
                                   ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "साधी-सोपी टेक्नॉलॉजी" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "आईसाठी 'माहेर', दादा-वहिनीसाठी 'मेनका' आणि तुमच्यासाठी 'जत्रा'!"

       आईसाठी 'माहेर', दादा-वहिनीसाठी 'मेनका' आणि तुमच्यासाठी 'जत्रा'!--
      ------------------------------------------------------------

     नमस्कार मित्रांनो,

     आज अनेक महिन्यांनंतर या ब्लॉगवर लिहितोय. 'सकाळ'च्या पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेले काही लेख मी जानेवारीमध्ये पुनर्प्रकाशित केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा खंड पडला. त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आज ही पोस्ट लिहिण्याचा उद्देश काहीसा वेगळा आहे.

     गेल्या सप्टेंबरमध्ये मी नोकरीतून बाहेर पडलो. ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे आणि अभय कुलकर्णी, माझा बालपणापासूनचा मित्र गणेश कुलकर्णी आणि आमचा कॉमन फ्रेंड सुनील गोखले (हा 'आयटी'त होता) आणि मी - अशा पाच जणांनी एकत्र येऊन 'मीडियानेक्स्ट' ही माध्यम सेवा पुरविणारी कंपनी स्थापन केली. १४ ऑक्टोबर २००९ रोजी स्थापन झालेल्या आमच्या कंपनीनं मे २०१० मध्ये पु. वि. बेहेरे यांनी सुरू केलेल्या 'मेनका प्रकाशन'चं संपादन केलं. आमच्या कंपनीच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा होता.

     गेल्या पन्नास वर्षांपासून रसिक मराठी वाचकांचे मनोरंजन करणारी माहेर, मेनका सारखी मासिकं, जत्रासारखा दर्जेदार विनोदी दिवाळी अंक आणि शंभरेक पुस्तकं...एवढा सगळा पसारा आता आम्ही चालवणार होतो. त्यात काही महिन्यांवर आलेली दिवाळी...मराठीतल्या 'टॉप फाईव्ह' दिवाळी अंकांत गणना होणारे तीन दिवाळी अंक आम्हाला प्रसिद्ध करावयाचे होते. कथा, कादांबऱ्यांसाठी मान्यवर लेखक मंडळींसह नव्या दमाच्या लेखकांशी संपर्क करणे, कथाचित्रे, हास्यचित्रांसाठी नामवंत चित्रकार मंडळीशी संवाद साधणे, लेख, मुलाखती, फोटो शूट...त्यानंतर तब्बल साडेसातशे पानांचा ले-आऊट, दरम्यान राज्यभरातल्या वितरकांच्या भेटी, जाहिरातदारांशी संपर्क, अंक प्रसिद्धीचे नियोजन...शिवाय मीडियानेक्स्टची कामं...कामांची ही लांबलचक यादी आणि हाती असलेला तोकडा वेळ...पण गाठीशी असलेला अनुभव, जनसंपर्क आणि वेळेचे योग्य नियोजन यांच्या जोरावर आम्ही माहेर, मेनका आणि जत्राचे दिवाळी अंक अगदी वेळेत; म्हणजे कोजागरी पौर्णिमेनंतर लगेचच बाजारात आणत आहोत.

     चावट-वात्रट विनोदांची फटकेबाजी करणारा जत्राचा दिवाळी अंक आणि 'मधुचंद्र विशेष' अशी मूळ कल्पना घेऊन माहितीपर लेख आणि शृंगारिक कथांनी सजलेला मेनकाचा दिवाळी अंक येत्या सोमवारपर्यंत (२५ ऑक्टोबर ) बाजारात दाखल होताहेत. त्यानंतर दोन दिवसांना मराठी स्त्रीची विश्वासाची सोबत असलेला माहेरचा दिवाळी अंकही बाजारात दाखल होईल.

     दिवाळी अंक ही संकल्पना केवळ मराठी भाषेत राबविली जाते. दिवाळी अंक ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण - अर्थात - मराठी माणसांनी जन्माला घातलेली, वाढवलेली आणि जोपासलेली ही संस्कृती टिकावी, वाढावी हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या तिन्ही दिवाळी अंकांचा दर्जा वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केलाय. आपण त्याला प्रतिसाद द्याल, ही अपेक्षा.

--AUTHOR UNKNOWN
-------------------------
(OCTOBER 23, 2010)
------------------------

               (साभार आणि सौजन्य-सासो टेकनॉलॉजि.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
              --------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2022-बुधवार.