शब्दां वाचून-ध चा मा !!!--लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 01, 2022, 08:51:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "शब्दां वाचून"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री श्रीनिवास याडकीकर, यांच्या "शब्दां वाचून" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ध चा मा !!!"

                              ध चा मा !!!--लेख क्रमांक-१--
                             --------------------------

     नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या वेळी गारद्यांना दिलेल्या आज्ञापत्रात मुदलात "रावांस धरावे" असा उल्लेख होता. तो बदलून आनंदीबाईंनी "रावांस मारावे" असा केला आणि मराठी दौलतीचे धनी (आणि पुढे दौलत सुद्धा) आपल्या निम्म्या गोवऱ्या स्मशानी जाते पाहती जाहले. हा इतिहासाचा भाग एक सत्य-कथा आहे की प्रक्षिप्त(?) हा एक संशोधनाचा विषय आहे. पण या घपल्याहूनही आणखी एक विषय आहे जो की बऱ्याचदा हाताळला जात नाही आणि तो म्हणजे सांप्रत मराठी ऐतिहासिक साहित्यातून होणारे ध चे मा! अर्थात ऐतिहासिक कादंबरी लेखकांच्या ऐतिहासिक चुका !

     मराठीत मुदलात ऐतिहासिक असे लिखाण होत नाही (इथे मराठी वाचक चवताळून उठण्याची शक्यता जास्त आहे. पण मी इथे न वाचल्या जाणाऱ्या थेसिस विषयी बोलत नसून समाजापर्यंत पोहोचणाऱ्या ऐतिहासिक लिखाणाचा अर्थात कादंबऱ्यांचा उहापोह करीत आहे.). कोणे एके काळी भारतीय अस्मिता जागविण्याच्या (मराठी) प्रयत्नांचा भाग म्हणून हरी नारायण आपटे, नाथ माधव प्रभृतींनी लिहिलेल्या कादंबऱ्या ह्या त्या बाबतीत आद्य होत. त्यानंतर ही धुरा रणजीत देसाई, शिवाजी सावंत ह्यांनी सांभाळली. सध्या विश्वास पाटील आदि मंडळी हा भर उचलीत आहेत. पण हा भार उचलताना त्या भाराचा 'भारा' कधी झाला ह्याचा पत्ता ह्यातील बऱ्याच लेखक मंडळीना लागला नाही असे खेदाने म्हणावे लागते.

     सर्वात प्रथम हा विषय उपस्थित करण्याचे प्रयोजन. मुळात इतिहास हा क्लिष्ट पण पुराव्यांवर आधारित थेसिस मधून उकलला जात असला तरी तो समाज-मनापर्यंत पोहोचतो तो कादंबऱ्यांच्या माध्यमातून. साधी-सोपी आणि साहित्यिक चमत्कृतिनी भरलेली कादंबरी ही एखाद्या थेसिस पेक्षा केंव्हाही आकर्षक आणि मनोवेधक असतेच आणि म्हणूनच इतिहासाकडे पाहण्याचा, आपल्या मनातली इतिहासाबद्दलची उत्सुकता शमवण्याचा सामान्य माणसासाठीचा एक सोपा मार्ग देखील असते. पण इथेच सावधगिरीची गरज असते. कारण कादंबऱ्यांच्या माध्यमातून नकळतपणे लोकांच्या मतावर आणि त्यांच्या एकंदरीत विचारसरणीवर लेखकाच्या विचारसरणीचे संस्कार होण्याचा संभव असतो. ह्यातून जे काही साध्य होते ते म्हणजे इतिहासाचे मूळ स्वरूप बदलणे. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पानिपतचे तिसरे युद्ध. १७६१ साली पानिपत येथे मराठे आणि अब्दाली- जो की अफगाणीस्तानचा बादशहा होता- ह्यांच्यात तुमुल रणसंग्राम झाला. ह्यात अस्मानी आणि अब्दाली-पुरस्कृत संकटांनी हैराण मराठी फौजांची अफगाण फौजांनी धूळधाण उडवली. ह्यात मराठी फौजांनी जरी अतुलनीय पराक्रम गाजवला, तरी त्यांचा पराभव झाला. त्यांचा नेता सदाशिवरावभाऊ (उर्फं भाऊ) हा मरण पावला. तसेच मल्हारराव होळकर, शिंदे आदी वीर मराठे सरदार कसेबसे पळून आले. त्यानंतर 'भाऊची बखर' ह्या नावाने एक बखर प्रकाशित झाली. ह्यात होळकरादी लोकांचे 'कर्तृत्व' लपवण्यासाठी सदाशिवरावभाऊ हाच कसा पराभवास जबाबदार होता हे ठसविण्यात आले. ह्यामागे प्रस्तुत बखरीचा लेखक हा होळकर समर्थक अगर त्यांच्या दरबारीचा असावा असा प्रवाद आहे. कारण जरी 'भाऊ हा एक कणखर सेनापती म्हणून पुढे न येता एक विचारी प्रशासक म्हणून दिसतो' (पानिपत १७६१, लेखक त्र.शं. शेजवलकर. उद्गार जसेच्या तसे उद्घृत करता आले नाही ह्यासाठी दिलगीर.) असे जरी शेजवलकर आणि इतर बरेच इतिहासकार जरी म्हणत असले तरी ते भाऊवर कोसळलेल्या अडचणी ह्या ही तितक्याच मती कुंठीत करणाऱ्या होत्या हे अमान्य करीत नाहीत. भाऊचे कर्तृत्व ह्या अडचणीपुढे फिके ठरले, ही बाब बखरकार मांडीतच नाही. पुढे मात्र दुर्दैवाने बखरकाराचेच मत ग्राह्य धरले गेले आणि भाऊ -जो की पानिपतचा नायक होता (अगदी शत्रूच्या दृष्टीनेही)- तोच स्वकियांकडून आततायीपणाचे बिरूद मिळविता झाला. समाजमनावर होणारे साहित्याचे परिणाम सांगण्यासाठी पानिपतइतके बोलके उदाहरण दुसरे नाही. असे म्हणायचे कारण साधने असूनही, प्रत्यक्षदर्शी लोक उपलब्ध असून देखील त्यांचा अभ्यास न करता इतिहास (मग तो कोणेही कारणाने का असेना) चुकीच्या स्वरुपात, मोडतोड करून सांगितला गेला. आणि सांगायचे माध्यम लोकप्रिय असल्याने ह्या विचारांचे गारूड लवकरच समाजमनावर पसरले. समाज -मग तो कितीही सुशिक्षित का असेना- अश्या गोष्टींवर सहजी विश्वास ठेवतो. निव्वळ पानिपत हा एकच दाखला नव्हे.

--श्रीनिवास.
(मे 16, 2010)
---------------

                    (साभार आणि सौजन्य-शब्दांवाचून.वर्डप्रेस.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                   -------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.09.2022-गुरुवार.