शब्दांकित-गुलकंद-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 01, 2022, 09:09:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "शब्दांकित"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "शब्दांकित" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "गुलकंद"

माझ्या दृष्टीने विचारांचे ३ प्रकार पडतात. व्यक्त, अव्यक्त आणि शब्दातीत. अशा विचारांना शब्दांकित करण्याचा हा प्रयत्न!

                                       गुलकंद
            गुलकंद -संपदा म्हाळगी-आडकर १/२४/१०--लेख क्रमांक-2--
           ----------------------------------------------------

     अकरावीचं उरलेलं वर्ष आणि बारावीचं आख्खं वर्ष, आशूच्या बागेतल्या फुलांचा मधूच्या घरी गुलकंद बनत होता. मधूच्या कपाटातही अनामी प्रेमिकाच्या कवितांची मोठी चवड लागली होती.

     बारावी झाल्यावर, मधूच्या बारावीसाठी थांबवलेली, बाबांची बदली अखेर नागपूरला झाली. मधूने नागपूरच्या इन्जिनिअरिन्ग कॉलेजात प्रवेश घेतला. बारावीत चांगले मार्क्स मिळाले होते. आशू आणि मितू अजून पुण्यातच होत्या, इन्जिनिअरिन्ग करत. तिघीही एकमेकींच्या संपर्कात होत्या. नागपूरला शिफ्ट झाल्याने आईचा गुलकंद मात्र बंद झाला होता. मधूचं इन्जिनिअरिन्ग झाल्यावर, तिच्या बाबांनी एक चांगला मुलगा पाहून तिचं लग्न लावून दिलं. ती आता नवरयाबरोबर यु. एस. मध्ये राहत होती.

     बारावी नंतर जवळ जवळ सहा एक वर्षांनी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा मेळावा होता. मितू आणि आशूने जायचं ठरवलं. आशूबरोबर तिचा होणारा नवराही होता. त्याचे ऑफिस मधले काही सहकारी मेळाव्याला जाणार असल्याने तोही आला होता. त्याच्या सहकाऱ्यांना आशूला भेटण्याची इच्छा होती. त्याने सगळ्यांशी आशू आणि मितालीची ओळख करून दिली. सहकाऱ्यांमध्ये तुषारही होता. त्याने आशू आणि मितूला ओळखलं. "अरे आपण एकाच batch मध्ये होतो. सायन्स बी डिविजन. तुमच्याबरोबर अजून एक असायची ना?", तो  म्हणाला.
"हो मधू, मधुश्री." -आशू म्हाणाली.
"ती कुठे आहे? आली नाही का?" -तुषार.
"नाही ती यु.एस. ला असते. मागच्या वर्षी आली होती. यावर्षी परत यायची आहे." -मितू.
"ओह बर!" -तुषार.
"तिच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे पुढच्या महिन्यात." -मितू. न विचारता ज्यादाची माहिती द्यायची तिला सवयच होती.
"पुस्तक??" -तुषार.
"हो कवितांचा.. कवितासंग्रह... मागच्या वर्षी एक भाग तिने प्रकाशित केला आहे. ह्यावर्षी दुसरा." -आशू.
"ओह बर! काय नाव पुस्तकाचं?" -तुषार.
"गुलकंद!"
"बरं..."
 
     दुसऱ्या दिवशी तुषार आप्पा बळवंत चौकात गेला. त्याने 'गुलकंद' शोधून काढलं. त्यावर लेखिकेचं नाव नव्हतं. पण प्रकाशक म्हणून नाव होतं, 'मधुश्री साने, अभय साने'. "अरेच्च्या, हिचं नाव मधुश्री आपटे होतं ना?... लग्न झालेलं दिसतंय!", तो मनात हळहळला. त्याने ते पुस्तक विकत घेतलं. दुकानाबाहेर येऊन, साईड stand वर लावलेल्या, आपल्या तिरक्या बाईकवर रेलून उभा राहिला. पिशवीतून पुस्तक काढलं. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर, गुलाबी रंगाच्या गुलाबांच्या पाकळ्यांमध्ये, लाल रंगाच्या गुलाबाच्या पाकळ्यांनी "गुलकंद" असं लिहिलं होतं. त्याला मुखपृष्ठ आवडलं. पुस्तक उघडून तो चाळू लागला. पुस्तकाच्या पाचव्या पानावर ऋणनिर्देश होता...

     "माझ्या अनामी प्रेमिकास, तू दिलेल्या गुलाबांचा गुलकंद मी तुला देऊ शकले नाही, पण ह्या तुझ्या मुरलेल्या कवितांचा गुलकंद तुझ्यापर्यंत पोहोचावा ही इच्छा! तुझी ओळख पटल्यास, पुढच्या आवृत्तीचे योग्य श्रेय (मोबदला)  तुला देण्यात येईल -मधुश्री अभय साने."

--संपदा म्हाळगी-आडकर
(जानेवारी 31, 2010)
-----------------------

                   (साभार आणि सौजन्य-शब्दांकित.वर्डप्रेस.कॉम)
                              (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  ------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.09.2022-गुरुवार.