काही उचापत्या...(Born to Survive)-जग जिंकताना....

Started by Atul Kaviraje, September 02, 2022, 09:08:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                        "काही उचापत्या...(Born to Survive)"
                       --------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "काही उचापत्या...(Born to Survive)" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "जग जिंकताना...."

                                   जग जिंकताना....
                                  ---------------

     करोडो भारतीयांचे स्वप्न २०११ चा विश्वचषक भारतीय सघांने जिंकावा हे स्वप्न घेऊन विश्वचषक स्पर्धेत १९ फेब्रुवारीला भारतीय टिम बांग्लादेशविरुद्ध मैदानात उतरली. सेहवागच्या धडाकेबाज दिडशतकाने भारतीय संघांने बांग्लादेशविरुद्ध ३७० धावा कुटल्या. बांग्लादेशनेही २८३ धावापर्यंत मजल मारली. भारतीय संघाने ही मॅच ८७ धावांनी जिंकली पण चांगल्या गोलंदाजाची उणिव तेव्हाही भासली. इंग्लडविरुद्धच्या सामन्यात केलेल्या ३३८ धावाही कमी पडल्या. भारतीय गोलंदाजांना इंग्लडला ३३८ धावा करण्यापासुन थांबवता आले नाही. सामना बरोबरीत सुटला. गोलंदाजाबरोबर भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण हीही एक समस्या होतीच. भारतीय बलाढ्य फलदांजीला द्रुष्ट लागली ती आर्यलंडविरुद्धच्या सामन्यात. आयरीश संघाने केलेल्या २०७ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला ५ विकेट गमवावे लागलेच पण ४६व्या षटकापर्यंत वाट बघावी लागली. नेदरलॅंडविरुद्धच्या सामन्यातही १८९ धावा करताना भारतीय संघाचा अर्धा चमू नेदरलॅंडसने परत पाठवला होता.

     गोलंदाजाबरोबर फलंदाजीची ही स्थिती पाहता सचीन सोबत भारतीय संघाने विश्वचषक जिंकण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न खरं होइल का? हा प्रश्नच होता. ह्या प्रश्नाला पराभावाचे उत्तर मिळाले दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात. भारतीय सघांचे सर्व फलंदाज ५० ओव्हरही खेळू शकले नाहीत. ४८.४ ओव्हरमध्येच सर्व संघ तंबूत परतला. बोर्डावर २९६ ही धावसंख्या होती पण आफ्रिकेच्या चिवट फलंदाजानी ते आव्हान २ चेंडू आणि ३ गडी राखुन पार केले. नेहरा आणि पटेलच्या गोलंदाजीची पिसे काढली गेली. शेवटचे षटक नेहमी घात करणार्‍या नेहराला का दिले गेले ही टीकाही कॅप्टन धोनीवर झाली. खरं सांगायचं तर त्यावेळी हा संघ उपांत्यफेरीतही पोहचेल की नाही ही भिती मनात घर करुन बसली.

     आफ्रिकIविरुद्धच्या पराभवानंतर मात्र भारतीय संघ बरच काही शिकला. रणनीत्या बदलल्या गेल्या. वेस्ट इंडीजला ८० धावाने पराभुत करताना भारतीय संघाची गोलंदाजी छानच झाली. ४२ ओव्हरमध्ये वेस्ट इंडीजच्या संपुर्ण संघाला मैदानाबाहेर पाठवले. हा सामना टिम ब्लू ने दिमाखात जिंकला. ह्या सामन्यानंतरचा दिसलेला भारतीय संघ जबरदस्त आत्मविश्वासाने खेळला. उंपात्य फेरीत कांगारु विरुद्धचा सामना. गेली ३ वर्ल्डकपचा दावेदार असलेल्या कांगारुंना ५ विकेटने धोबीपछाड दिल्यावर पॉण्टींग चा चेहरा बघण्यालायक झाला होता. युवीचा जल्लोष आणि पॉण्टींगची शरणागती ह्या चित्रात अख्या जगाने डोळे भरुन पाहिली. माजोरड्या आष्ट्रेलियाचा केलेला पराभव ही भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बाब होती. भारतीय संघावर इथे स्तुतीसुमनाचा वर्षाव झाला. पण त्यावरही कळस चढवला गेला जेव्हा भारताने पारंपारीक प्रतीस्पर्धी पाकिस्तानला घराचा आहेर दिला. भारत-पाक ह्या सामन्याला नेहमीप्रमाणे महायुद्धाचे स्वरुप आले होते आणि मोहालीच्या स्टेडीयमला रणांगणाचे. भारतीय संघाने केलेल्या २६० धावा आणि त्याला प्रत्युत्तर देताना पाक संघाची दमछाक झाली. अकमलने काही शॉट्स मारुन पाकिस्तानला विजयाची आशा दाखवली. पण भज्जीने त्याला परत धाडले आणि नंतर रांगच लागली. मिसबाहने शेवटच्या काही षटकात वैतागुन हाणलेले चौकारही भारतीय संघाला विजयापासुन रोखु शकले नाहीत. त्यादिवशी भारतभर दिवाळी साजरी झाली. भारत फायनला पोचला होता.

     फायनलमध्ये भारतासमोर ताकदवान लंका. भारतीय संघ विश्वचषकापासुन एक सामना दुर. ह्यावेळीही २००३ च्या फायनलची पुनरावृत्ती होणार? फायनलपर्यंत उत्तम खेळ दाखवुन फायनला हरणार..? लाखो- करोडों भारतीयांचे स्वप्ने खरी होतील का भारतीय संघ परत माती खाणार..? असे बरेच प्रश्न.. लकेंनी प्रथम फलंदाजी केली. सुरुवातीच्या काही षटकात भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षांनी केलेल्या चांगल्या कामगीरीला उत्तरार्धात गळती लागली. २०० पर्यंत पोहचु शकेल की नाही असा लंकेचा सघं जयवर्धनेच्या नाबाद शतकाने २७४ ह्या समाधनकारक धावसंख्येवर पोचला. टिम इंडियाची फलदांजी आणि ३१ धावात सेहवाग आणि सचिन तंबुत परत. पण नंतर आलेल्या गंभीर आणि विराटने केलेल्या भागीदारीने भारतीयांचा आशा पल्लवीत केल्या. कोहली गेल्यांनतर आलेल्या धोनीने मात्र केलेला खेळ आत्ताही त्याला सलाम ठोकावा असाच होता. गभींरचे शतक हुकल्यानंतर आलेल्या युवराजच्या साथीने धोनीने संघाला विजयापर्यंत पोहचवले. आणि एक षटक शिल्लक आणि ४ धावांची गरज असताना धोनीने ठोकलेल्या षटकाराने इतीहासात भारताच्या विश्वविजयाची नोंद झाली. तीन दिवसात परत दिवाळी साजरी झाली. धोनी, युवी, हरभजन आणि सचीनच्या डोळ्यातले आनंदाश्रू सर्वांनी पाहीले. भारतीय संघाने हा चषक सचिनला आणि क्रिकेटवेड्या देशाला अर्पण केला. सचिनला युसुफ पठाणने खांद्यावर बसवुन मैदानात मिरवणुक काढली गेली. त्यावेळी सचिनच्या चेहर्‍यावरचे भाव आजही डोळ्यासमोर आहेत. पुढील चार वर्ष भारतीय संघ क्रिकेटजगतात राज करणार होते . जग जिंकले होते...

--दिपक
(TUESDAY, APRIL 5, 2011)
------------------------------

               (साभार आणि सौजन्य-कूल दीपक १०.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                              (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
              ------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.09.2022-शुक्रवार.