अब्द-शब्द-मागे वळून पहाता

Started by Atul Kaviraje, September 03, 2022, 09:51:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "अब्द-शब्द"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, अतिवास, यांच्या "अब्द-शब्द" या ब्लॉग मधील एक कविता. या कवितेचे  शीर्षक आहे- "मागे वळून पहाता"

     तशी ही वर्षाअखेरची कविता वाटावी असेच तिचे शब्द आहेत. ती कदाचित जीवनाअखेरची कविता असेल असं म्हणायला मी धजत नाही, कारण मी नेहमी कविता लिहीन याची मला कधीच खात्री वाटत नाही. प्रत्येक कविता लिहून झाल्यावर 'अरे वा! आपण अजूनही कविता लिहू शकतो' हे जसं समाधान असतं, तशीच 'ही कदाचित शेवटचीच कविता असणार नाही ना' अशी एक भयावह शंका पण मनात असते.

     कधी वरवर पाहता सगळं काही संपून गेलं आहे असं वाटत असतानाच 'अजून शब्द आहेत जागे आत' याची अचानक सुखद जाणीव होते. उजाड भासणा-या जमिनीत पावसाच्या एका सरीने लाखो अंकुर तरारून यावेत त्याच धर्तीचा हा चमत्कार असतो. निसर्गाचं आणि मनाचं मला अद्याप न उलगडलेलं हे एक कोडंच! नाहीतर ऐन मे महिन्यात मला अशी जगण्याच्या निरंतर सुरेल प्रवाहाची जाणीव का बरं व्हावी? जाउ द्या! मी आपली समीक्षकाच्या भूमिकेत शिरायला लागले तर नकळत !

                                   मागे वळून पहाता--
                                  ----------------

पानगळीचा
रेटा सोसून
काही मागे
उभेच आहे;

पाचोळ्यातून
हलके हलके
जीवनरसही
वहात आहे;

जे झाले , ते गेले
आता, मागे
वळून पाहता
काही नाही;

तरी पाखरे
सुरेल गाती
जगणे होता
पुरे प्रवाही!

--अतिवास 
(Tuesday, December 29, 2009)
-----------------------------------

                  (साभार आणि सौजन्य-अब्द-शब्द.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 ---------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2022-शनिवार.