माझं चर्‍हाट-शॅकल्टनची अफाट साहस कथा--लेख क्रमांक-१-अ

Started by Atul Kaviraje, September 03, 2022, 10:00:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "माझं चर्‍हाट"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया,श्री गुरुदत्त सोहोनी यांच्या "माझं चर्‍हाट" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "शॅकल्टनची अफाट साहस कथा"

               शॅकल्टनची अफाट साहस कथा--लेख क्रमांक-१--अ--
              ----------------------------------------------

     शॅकल्टनचे हरवलेले एंड्युरंस जहाज 107 वर्षानंतर सापडले. ही नुकतीच आलेली बातमी वाचली आणि माझ्या मनात घर करून राहिलेल्या त्याच्या अचाट साहसकथेला परत उजाळा मिळाला. सुमारे 40/45 वर्षांपूर्वी रीडर्स डायजेस्ट मधे ती वाचली होती तेव्हापासून अर्नेस्ट शॅकल्टन हे नाव आणि त्याचं साहस माझ्या कायमचं लक्षात राहिलं आहे. तसं पाहिलं तर अनेक साहसवीरांनी केलेल्या अनेक मोहिमांसारखीच त्याची पण एक मोहीम! अनेक संकटं, धोके व साहसांनी भरलेली!आणि ती यशस्वी पण नाही झाली. मग असं काय विशेष होतं त्यात? ते जाणण्यासाठी त्या मोहिमेची नीट माहिती सांगितली पाहिजे मग मला त्यातलं काय नक्की भावलं ते सांगता येईल. तो काळ दोन्ही धृवांवर प्रथम कोण पाय ठेवतो या जीवघेण्या स्पर्धेचा होता. त्यासाठी अनेक देशांच्या मोहिमा झाल्या. शॅकल्टनने रॉबर्ट स्कॉटच्या दक्षिण धृवाच्या शोध मोहिमेत (1901-04) भाग घेतला होता. ती त्याची पहिली मोहीम, पण त्याला ती प्रकृतीने साथ न दिल्यामुळे अर्धवट सोडावी लागली. स्कॉट दक्षिणेला 82 अंशापर्यंत जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर शॅकल्टनने केलेल्या मोहिमेत ((1907-09) तो 88 अंशापर्यंत पोचला, दक्षिण धृवापासून केवळ 180 किमी! या विक्रमामुळे त्याला 'सर' ही पदवी दिली गेली. शेवटी नॉर्वेच्या आमुंडसेनने (हे नाव खूप बंगाली वाटते ना?) 1911 मधे दक्षिण धृव पादाक्रांत करून स्पर्धा जिंकली. मग शॅकल्टनने अंटार्क्टिका बर्फावरून ओलांडायची मोहीम ((1914-17) आखली. शॅकल्टनच्या महत्वाकांक्षी मोहिमेची आखणी अशी होती: मोहिमेत दोन गट आणि दोन जहाजं असणार होती. वेडेल समुद्र गटातील माणसं एंड्युरंस जहाजातून वाहसेल बे भागापर्यंत येणार होती. तिथे 14 जण उतरणार होती, त्यातले शॅकल्टन धरून 6 जण 69 कुत्र्यांसकट जवळपास 2900 किमी प्रवास करून अंटार्क्टिकाच्या दुसर्‍या टोकाला रॉस समुद्राकडे जाणार होते. दुसर्‍या गटातली माणसं अरोरा जहाजावरून रॉस समुद्राकडे जाणार होती. तिथे उतरून ते बिअर्डमोर हिमनदीवर तळ उभारून दुसर्‍या गटाची वाट पहाणार होते.

     असल्या धाडशी आणि अति खर्चिक मोहिमा करायच्या कल्पना या लोकांना कशा सुचतात व त्यांना पैसे देणार्‍यांना त्यातून काय मिळायची अपेक्षा असते असे प्रश्न माझ्या मध्यमवर्गीय भारतीय मनाला नेहमी पडतात. पण ते इकडे कुणाला पडत नाहीत हे आत्तापर्यंत झालेल्या व अजूनही चालू असलेल्या मोहिमांवरून अगदी उघड आहे. यासाठी एकूण 50,000 पाऊंड (त्या काळातले) लागतील असा अंदाज होता. शॅकल्टनला सरकारकडून 10,000 मिळाले, उरलेले त्याने सधन व्यापार्‍यांकडून जमवले. या मोहिमेसाठी माणसं मिळवण्यासाठी शॅकल्टनने खालील जाहिरात दिली असं ऐकिवात आहे, पण त्या जाहिरातीचा काही पुरावा उपलब्ध नाही. "माणसं हवीत: अत्यंत धोकादायक मोहिमेसाठी, कमी पगार, अतिप्रचंड थंडी, पूर्ण अंधाराचे लांब महिने, कायमची संकटं, परतीच्या प्रवासाच्या यशाची खात्री नाही. यश मिळाले तर मात्र कीर्ती व सन्मान !

--गुरुदत्त सोहोनी
(Thursday, March 17, 2022)
-------------------------------

                     (साभार आणि सौजन्य-चिमण्या .ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                    -------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2022-शनिवार.