वाचू आनंदे-झुंबाऽऽ हो झुंबाऽऽ हो--लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 03, 2022, 10:50:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "वाचू आनंदे"
                                       -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री राम जगताप यांच्या "वाचू आनंदे" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "झुंबाऽऽ हो झुंबाऽऽ हो"

                         झुंबाऽऽ हो झुंबाऽऽ हो--लेख क्रमांक-१--
                        ----------------------------------

     एक आठ-दा वरषाचं पोर वागास्नी पकडील का? शिका-यास्नी अद्दल घडवील काय? आणि चंदन चोरणा-या लोकांना हिसका दावील काय? पोर तसं लई मोठं नाय बघा. असंल आठदा वरषाचं. खर्र वाटत नाय ना? मग गडय़ांनो तुमाला हे पुस्ताक वाचायला पायजेल. या पुस्ताकाचा हिरू हाय चिन्ना. हा चिन्ना या सगल्या करामती करून दावतो बघा.

     पण म्या आदी तुमास्नी त्याचा परेचय करून देवतो बघा. तर त्याचं आस्सं हाय की, चिन्ना हा बोरडी गावचा. तुमी इचाराल की ते कुठं आलं? तर ते हाय कोसबाड तालुक्यात. आन हा तालुका हाय ठाणे जिल्ह्यात. बोरडी गाव तसं लई ल्हान हाय. मंजी तिथं आदिवासींच्या पन्चीस-तीस झोपडय़ा हायती. त्यातल्या एका झोपडीत भिल्ल्या आणि मोगी हे नवरा-बायकू रातात. चिन्ना हे त्यांचं एकुलतं पोर. दोगंबी चिन्नाचे लई लाड करत्यात. चिन्ना हायच तसा हुशार पोर. आवं चिन्नाचं डोळं पिंगट. त्या पिंगटय़ा डोळ्यात लई कुतूहल भरलेलं. सारखं आय-बापास्नी 'हे काय? ते काय? हे असं काय? ते तसं का?' असले सवाल इचारून इचारून चिन्ना भंडाऊन सोडायचं बघा. बापुसाला भंडून टाकायचं. पण चिन्नाचा बापुस त्याला माइत असंल तेवढं सांगायचा. पोराचा चुणचुणीतपणा पाऊन मोगीचं काळीज तर सुपासुपाएवढं व्हायचं.

     दिस जाऊ लागलं, तसा चिन्ना मोठ्ठा होऊ लागला. तसतशा त्याच्या खोडय़ाबी वाडू लागल्या. भिल्ल्या आणि मोगी कंटाळून गेले बघा, चिन्नाला आवरून आवरून. पण चिन्ना काय शांत बसायचं नाव घेईना. त्याचा बापुस सक्काली सक्काली कामाला जायचा. मायच घरी असायची. ती चिन्नाच्या खोडय़ानं आंबट होऊन गेल्ती. मग भिल्लानं त्याच्या शेजारच्या इठूचा इचार घेतला. इठू त्या गावातला लई हुशार माणूस. इठू मन्ला, 'काय नाय चिन्नाला आसरम शाळंत पाठीव की!' भिल्लाला बी तेचा इचार पटला. आसरम शाळा तसी लई लांब नवती, जवळच हुती. त्या शाळंतला मास्तर बी हुशार हुता. तो समद्या पोरास्नी लई बेस शिकवायचा. पोरांना बी लिहाय-वाचाय शिकायला मजा यायाची. चिन्ना दिसभर या शाळंत जाऊ लागला. पर ते बी फार दिस चाल्ललं नाय. मंजी झालं आस्सं की, ती शाळा तिसरीपत्तोरच हुती.

     चिन्नाची शाळा सुटली आन मग दिसभर त्याला उनाडक्या करायला मोकळं रान घाऊ लागलं. आता तर त्यो शाळंत जाऊन जाऊन लई हुशार बी झाल्ता. त्यामुळं त्याच्या खोडय़ा लईच वाढल्या हुत्या. मोगी त्याच्या खोडय़ांनी रंजीस येऊ लागली. पण पोरगं काय थांबायचं नाव घेत नवतं. एक दिस काय झालं की, मोगीनं सांच्यासाठी झिंग्याची भाजी करायची ठरिवली. पण चिन्ना ते टोपलंच घिऊन पळाला. माय त्याच्या मागं, त्यो पुढं, माय त्याच्या मागं, त्यो पुढं. पण चिन्ना कसला घावतोय मायला? तो धूम पळाला. एकमद चिंगाट. चिन्ना एका उंच झाडाच्या शेंडय़ावं जाऊन बसला. पण त्याला आता वाईट वाटत हुतं. सांच्याला बापुस आला की, माय त्याला सांगणार. मग बापुस आपल्याला बडवणार, रागं भरणार. तो इच्यार करू लागला, काय करावं गडय़ा, मंजी बापुसाकडून मार बसणार नाय? मग त्यानं धना आणि केरूला ते झिंगे दिले आन त्यांच्याकडून त्यांचे मासे पकडायचे गळ घेतले. चिन्नानं मग नदीवर जाऊन रात होईतो बक्कळ मासे पकडले आणि इजई इराच्या ताठय़ात त्यो घरी आला. बापुस त्याला मारणार, तोच त्यानं चिन्नाकडचे बक्कळ मासे पायले. मग कशाला मारतोय बापुस? माय बी खुश झाली मासं पाऊन.

(चिन्ना : मंजुश्री गोखले)
--------------------

--राम जगताप
(Thursday, 8 December 2011)
----------------------------------

                  (साभार आणि सौजन्य-वाचू आनंदे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2022-शनिवार.