....तरंग मनाचे !-शिक्षणपध्दती

Started by Atul Kaviraje, September 09, 2022, 09:07:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "....तरंग मनाचे !"
                                   ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री मितेश शहा यांच्या "....तरंग मनाचे !" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "शिक्षणपध्दती"

                                     शिक्षणपध्दती--
                                    -------------

     "कुठल्याही विद्येचा अभ्यास म्हणजे सरस्वतीची साधना, आणि प्रत्येक साधना योग्य रितीने पूर्ण झाल्याशिवाय अपेक्षित परिणाम मिळत नाहीत" असा साक्षात्कार आपल्याला पावलोपावली होतो. आपली प्राचीन शिक्षणपध्दती याच एका विचारावर कायम असल्याचे पुरावेही गोळा करणे तितकेसे अवघड नाही. अशाच विचाराने त्या काळात गुरू-शिष्याचं पवित्र नातंही व्यवस्थितरित्या सांभाळलं गेलं.

     संपूर्ण त्यागातून जीवन जगण्यास तयार झालेल्या त्या काळच्या तरुणाईने बरेच मैलाचे दगड रचले आणि आधुनिक तरुणाईकडूनही तशीच अपेक्षा ठेवली.ही अपेक्षा ठेवणं कधीच वाईट नव्ह्तं आणि नाही, किंबहुना या शिक्षणात प्राचीन काळातच भारताला महासत्ता बनवण्याची ताकद लपलेली होती. परंतु, दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही. शिक्षणाचं व्यापारीकरण याचं कारण ठरलं.

     आजचं व्यावसायिक शिक्षण हाच व्यवसाय झाला आहे. मोठमोठ्या हुतात्मा, क्रांतिकारक, महात्म्यांच्या नावाखाली चालणाऱ्या शिक्षणसंस्था जेव्हा 'त्या' नावाने सांगितलेली शिकवण विसरुन स्वैरपणे वागू लागतात तेव्हा सरस्वतीही दोन हात दुरच राहते.संस्थारुपी शेतात मग मनमानी नियम तयार करवून घेऊन 'अर्थ'पूर्ण निर्णय घेतले जातात आणि शिक्षण सोडून इतर गोष्टी विद्यार्थीरुपी रोपांभोवती बांडगुळं म्हणुन वाढतात. यामधुन रस्ता शोधता-शोधता विद्यार्थ्यांची अर्ध्याधिक शक्ती खर्च होते आणि दरवर्षी शिक्षणपध्दती तिने ठरवलेल्या नियमांनुसारच नापास होते! मग पोस्टर रुपाने प्रत्येक भिंतीवर लावलेले आणि बऱ्याच वेळी धुळीने वेढलेले जागतिक महासत्तेचे स्वप्न धुसर होऊ लागते आणि त्यासोबत प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या ऊराशी बाळगुन ठेवलेल्या भविष्यरुपी स्वप्नांचे फुगेही फुटतात,मात्र हातात उरतात ते फक्त आतापर्यंत शिकण्यासाठी केलेल्या धडपडीचे अवशेष! दरवर्षी घडणाऱ्या अशा अनेक घटनांतुन व्यावसायिकांचा व्यवसाय  पुर्ण होत असेल कदाचित, पण विद्यार्थ्यांचं आणि पर्यायानं देशाचं भविष्य टेबलाखालून घडत नाही, हेसुध्दा तितकंच खरं !!

     बऱ्याच ठिकाणी भौतिक अवस्थेला प्रमाण मानून गुणवत्तावाढीचे प्रयत्न सक्तीतुन होतांना दिसतात, परंतु मानसिक अवस्था त्याहूनही कित्येक पटीने अधिक महत्त्वाची आहे आणि हीच बाब दुर्लक्षित करण्यात येते. गुणवत्ता सक्तीतुन तयार करण्याची गोष्ट नव्हे तर आत्मविश्वास पेलण्याची मानसिक शक्ती तयार करवून घेण्यात आहे, हा विचार समाजात रुजला, बहरला तरच भारताची वाटचाल महासत्तेकडे होऊ शकते.

--मितेश शहा
------------

                    (साभार आणि सौजन्य-भावविश्व.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                   -------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.09.2022-शुक्रवार.