चारोळी पावसाची-क्रमांक-47-माझा सखा पाऊस

Started by Atul Kaviraje, September 10, 2022, 10:37:46 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    चारोळी पावसाची
                                       क्रमांक-47
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --"आज  मी खूप  खूष  आहे , आनंदी  आहे , उत्साही  आहे . पडणाऱ्या  पाण्याचे  थेम्ब  मुक्तपणे  चेहऱ्यावर  खेळवत  आहे . अंगा-अंगाला  बिलगणारा  अवखळ  वारा , पाऊस-थेम्ब  तुषारांची   माझ्या  तनूवर  मनसोक्त  रांगोळी  काढत आहे . अंगाला  शिरशिरी  येत , मग  मी  त्या  पडणाऱ्या  पाण्यात , साचलेल्या  पाण्यात  एखाद्या  लहान  मुली-प्रमाणे  नाचते  आहे , लोकांच्या  अंगावर  ते  साठलेले , साचलेले  पाणी  उडवीत  आहे , मजा  घेत  आहे . माझे  बालपण  मला  आज  पुन्हा  मिळाले  आहे ." या   कवयित्रीला  आज  काय  झालंय  कळतं  नाहीय . वरील  हर्षाचे , आनंदाचे  उद्गार  तिच्याच  तोंडचे  आहेत . पावसाशी  एक  घट्ट  असं  नातं  तिचं  निर्माण  झालंय . दर  पावसाळ्यात  असंच  घडत . तिचं   हरवलेलं  बालपण  पुन्हा  एकदा  तिला  या  पावसाळ्यातच  प्राप्त  होत . मग  ती  कुणाचीही  पर्वा  न   करता , त्यातच  हरवून  बसते , हरखून  जाते , ती  तिची  मग  उरतच  नाही . पाऊस  आणि  फक्त  तिचं  भिजणं  एवढंच  मग  तिला  माहित  असतं .

     ती  या  चारोळीतून  पुढे  म्हणतेय , हा  पाऊस  मनातलं  ओळखतो . माझ्या  मनात  काय  दडलंय , काय  घडतंय  याची  चाहूल  त्याला  आधीच  लागलेली  असते . म्हणूनच  माझ्या  मनात  लपलेल्या  असंख्य  प्रश्नांना  तो  लीलया  कौल  देतो , व  माझ्या  प्रश्नांची  उत्तरे  ही  मला  चुटकीसरशी  मिळत  जातात . असा  हा  पाऊस  मनकवडा  आहे . त्याचे  पडणारे  हे  थेम्ब , त्या  थेंबाचे  तुषार  यांचा  साद , नाद , आवाज , रव  माझ्या  मनाच्या  गाभाऱ्यात  प्रवेश  करतो . तेथे  तो  रुंजी  घालू  लागतो , व  मनाला  छेडत  माझ्या  अनेक  न  उलगडणाऱ्या  प्रश्नाची  तो  उकल  करतो .

     अत्यंत  हळुवारपणे  तो  मनाला  फुंकर  घालतो . मनात  आजपावेतो  साठलेलं  दुःख , वेदना , जखमा  यांचे  तो  आपल्या  येण्याने , आपल्या  सरींनी , आपल्या  अमृत -थेंबांनी  निसर्गाचे  जणू  मलम  लावतो , औषध  लावतो . व  साऱ्या  वेदना , दुःख , यातना  यांचा  क्षणार्धात निचरा करतो . त्या  जखमांना  पाहता-पाहता भरून टाकतो . या  पावसाला  खरोखरचं  एक  महान  निष्णात  वैद्य  म्हणणे  अगदी  उचितच  ठरेल  ना ! मी  माझे  मनात  साठलेले  सारे  दुःख  त्याला  सांगते , आणि  त्याच्या धारांनी , थेंबांनी  तो  त्या  बऱ्याही करतो , असा  मला  अनुभव  बरेचदा  आला  आहे . या  पावसाबरोबरच मी  निसर्गाचीही अत्यंत  आभारी आहे , ऋणी आहे .

     कवयित्री  पावसाची  स्तुती  करताना थांबतच  नाहीय , थकतच नाहीय . जणू  तिच्या  आवडीचाच  हा  विषय  आहे . ती  पुढे  म्हणतेय , हे  पावसा , एरव्ही  रखरखीत , उजाड , माळरान  असणारी   ही  जमीन   तुझ्या  येण्याने  पहा  कशी  फुलली  आहे . जागोजागी  हिरवळीचे  गारे-गार  हरित  गालिचे , नजरेच्या  टप्प्यात  येत  आहे . हा  नजारा  पाहून  प्रत्यक्ष  स्वर्गातील  देवांनाही  याचा   हेवा   वाटावा , असे  हे  हरित  सौंदर्य  तू  मुक्तपणे  या  धरित्रीसी  देत  आहे , तिला  नटवीत  आहेस , तिची  दृष्ट  काढीत  आहेस . आतापर्यंतच्या  रुक्ष , कोरड्या  डोळ्यांना  ही  हरीताई, ही  हिरवळ  पाहून  क्षणमात्र  गारवा  तू  देत  आहेस , त्यांची  नजर  सुखद  करीत  आहेस . त्यांच्या  नजरेतून  संगीत  ओसंडत  आहे , जे  तू  छेडलं  आहेस . या  डोळ्यांना  तू  तृप्त , समाधानी , शांत  करीत  आहेस . त्यांना  निववीत  आहेस . त्यांची  निगा  ठेवीत  आहेस . खरोखरचं  तू  साऱ्यांच्याच  नजरेत  एक  नजरेचा  खेळ  करणारा  कुणी  जादूगारचं आहेस .

    आणि  हे  पावसाचे  वर्णन  करता  ती  आता  शांत  झाली  आहे . तिचे  मन  शांत  झाले  आहे . प्रसन्न  झाले  आहे . आता  तिच्या  मनात  काहीही  किंतु  नाही , काहीही  प्रश्न  नाहीत . तिचे  मन  आता  दोलायमान  नाही . या  पावसाने , त्याच्या  थेंबांनी  ही  एक  कमालीची  जादू , किमया  केली  आहे . तिच्या  थकलेल्या  मनाला  तकवा   दिला  आहे , उत्साह  दिला  आहे , तिचे  मन  तरोताजा  केले  आहे . ती  पावसाबरोबर  त्या  वाऱ्याचीही  अतिशय  ऋणी  आहे , की  हा  वाराच  माझा  आवडता  पाऊस  घेऊन  येतो , पावसाची  सुरुवात , नांदी  तर  या  वाऱ्यांच्या  येण्यामुळे , वाहण्यामुळेच  तर  होते . तर  असा  हा  मंद , झुळूझुळू  वाहणारा  वारा  तोही  माझ्या  मनाला  गारवा  देतो , थंडावा  देतो , शीतलता  प्रदान  करतो . मनाची  स्पंदने  तो  अश्या  रीतीने  छेडतो , की  त्याचे  तरंग  आणि  पावसाच्या  घन-गंभीर  आवाजाचे  तरंग , लहरी  या  जणू  एकाकार  होतात . अशातऱ्हेने  माझे  आणि  पावसाचे  नाते  दृढ , घट्ट , घनिष्ठ  करण्यात  या  अवखळ  वाऱ्याचाही  हात  आहे . त्यानेच  तर  आम्हा  दोघांना  एकत्र  आणले  आहे .

             माझा सखा पाऊस
            -----------------
कौल पावसाचा साद मनी छेडतो,
झालेल्या जखमांवरी निसर्गाच औषध लावतो,
हिरवळीचे नजारे हे कोण भुमीवरी या पेरतो,
मंद झुळूकेच्या चाहूलीने मनाची स्पंदन छेडतो...
======================

--कवयित्री:साक्षी कांबळे
---------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विश मराठी.कॉम)
                    -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.09.2022-शनिवार.