श्रीरंग गायकवाड-अमृताचा घनू--क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 12, 2022, 05:48:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "श्रीरंग गायकवाड"
                                   -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री "श्रीरंग गायकवाड" यांच्या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "अमृताचा घनू"

                                  अमृताचा घनू--क्रमांक-१--
                                  ---------------------
                             
     गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा ८२वा वाढदिवस होता. 'आयबीएन-लोकमत'तर्फे पं. हृदयनाथ मंगेशकरांनी लतादीदींची दीर्घ मुलाखत घेतली. मी ती शब्दबद्ध केली. लोकमतनं ही मुलाखत सर्व आवृत्त्यांमध्ये छापली...

     लता मंगेशकर ..!

     कोट्यवधी रसिकमने झंकारणारा स्वर्गीय सूर... गेली ६८ वर्षे हा अमृताचा घनू अखंडपणे बरसतो आहे... या गानकोकिळेनं अर्थात रसिकांच्या लाडक्या लतादीदींनी आयुष्यातील काही अस्पर्श क्षण अजूनही जपून ठेवले आहेत. हा ठेवा त्यांनी उघड केलाय, 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना. त्यांच्या ८२व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा मनमोकळा संवाद साधलाय, त्यांचा लाडका बाळ अर्थात पं. हृदयनाथ मंगेशकरांशी....

--पं. हृदयनाथ मंगेशकर - दीदी तू गेली ६८ वर्षे गातेस. १९४२ला बाबा गेले, त्याच वर्षी तू गायला सुरुवात केलीस. आता मागे वळून बघताना तुला काय वाटते?
--लता मंगेशकर - गेले ते दिवस खूप चांगले गेले. मी ६८ वर्षांपेक्षा जास्त गाते आहे. ९ वर्षांची असताना सोलापूरला थिएटरमध्ये बाबांसोबत मी क्लासिकल प्रोग्रॅम केला. १९३८-३९ सालची ही गोष्ट आहे. त्याच्याही आधी मी गात होते. बाबांसोबत मी अनेक कार्यक्रम केले. आपली बलवंत संगीत मंडळी कंपनी बंद झाल्यानंतर मी बाबांसोबत प्रत्येक कार्यक्रमात गायले.

--पं. हृदयनाथ मंगेशकर - तुझं पहिलं गाणं कोणतं?
--लता मंगेशकर - मी त्या वेळी पाच वर्षांची होते. घरात बाबांचा एक शिष्य गात होता. त्याला रियाज करायला सांगून बाबा बाहेर गेले होते. मी गच्चीमध्ये खेळताना त्याचे गाणे ऐकले आणि आतमध्ये जाऊन त्याला त्याच्या गाण्यातील चुका सांगितल्या. असे नाही, असे आहे म्हणून त्याला गाऊनही दाखवले. बाबांनी ते बाहेरून ऐकलं. लहानपणी आपलं घर मोठं होतं. स्वयंपाकघरातील डब्यांच्या मोठ्या स्टँडवर बसून मी आपल्या स्वयंपाक्याला मोठमोठ्यांनी बाबांच्या चीजा, सैगलची सिनेमातील गाणी ऐकवायची. माई मला तिथून हाकलायची. बाबांनी शिष्याजवळचं ते गाणं ऐकल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मला उठवलं आणि मला संगीत शिकवायला सुरुवात केली.

--पं. हृदयनाथ मंगेशकर - तो राग आणि गाण्याचे शब्द आठवतात का?
--लता मंगेशकर - हो. राग होता, पुरिया धनश्री आणि बोल होते, हे सदारंग... नीत उठकर देता दुहाई...

--पं. हृदयनाथ मंगेशकर - तुझे पहिले गुरू बाबा होते?
--लता मंगेशकर - अर्थातच. त्यांनी माझ्या गाण्याविषयी माईला सांगितले आणि घरात गवई असताना आम्ही बाहेर का शिकवतो, असे म्हणाले.

--पं. हृदयनाथ मंगेशकर - बाबांना तुझ्या गाण्याबद्दल पूर्ण आत्मविश्वास होता. बाबांसोबत एका नाटकात तू पहिल्यांदा काम केलंस, ती आठवण सांग.
--लता मंगेशकर - ते सौभद्र नाटक होतं. त्यात नारदाचे काम करणारा नट आजारी पडला. बाबा काळजीत पडले. मी खेळत होते. मी ऐकलं आणि बाबांना म्हणाले, मी करते नारदाचं काम... बाबा म्हणाले, नारद एवढासा, अर्जुन केवढा मोठा... कसे दिसेल ते स्टेजवर. पण मी सांगितलं, जरी मी लहान दिसले तरी गाईन तुमच्याबरोबर. मला कॉन्फिडन्स होता. तुला गाणी, नक्कल पाठ आहे का, असं बाबांनी विचारल्यावर मी हो म्हणाले. मग मला बाबांनी गायची परवानगी दिली. आमचे तार्दाळकर नावाचे हार्मोनियमवादक होते. त्यांच्याकडे मी ती गाणी म्हटली. मग माईनं मला रात्री मेकअप केला. माझे लांब केस वरती बांधले. त्यावर फुलं लावली. हातात तंबोरी दिली. पीतांबर नेसवून मला पाठवले. मी बाबांना सांगितलं, मी शेवटच्या गाण्याला वन्समोअर घेणार. नाटकातलं पहिलंच गाणं लोकांना खूप आवडलं. मग बाबांचं गाणं, माझं गाणं असं होतं. ते झाल्यानंतर घाबरू नको, गा, असं बाबांनी सांगितलं. अर्जुन निघून गेल्यावर 'पावना वामना' हे नारदाचं गाणं गात असताना मला वन्समोअर मिळाला. मी बाबांकडे पाहिले... आणि परत ते गाणं गाऊ लागले....

--श्रीरंग गायकवाड
(MONDAY, 20 DECEMBER 2010)
------------------------------------

               (साभार आणि सौजन्य-श्रीरंग गायकवाड.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
              --------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2022-सोमवार.