श्रीरंग गायकवाड-अमृताचा घनू--क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 12, 2022, 05:51:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "श्रीरंग गायकवाड"
                                   -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री "श्रीरंग गायकवाड" यांच्या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "अमृताचा घनू"

                                  अमृताचा घनू--क्रमांक-3--
                                  ---------------------

--पं. हृदयनाथ मंगेशकर- दीदी तू ज्ञानेश्वरांच्या विराण्या फार चांगल्या गायल्या आहेत. अभंग आणि मीराबाईंची भजनेही चांगली गायली आहेस. संतकाव्य गाताना काय करावं लागतं?
--लता मंगेशकर- संतांच्या रचना गाताना मी लता मंगेशकर आहे, हे मी विसरते. मला ज्ञानेश्वर होता येत नाही, पण मी त्यांच्या काव्याशी एकरूप होते. त्यांना ती रचना करताना काय वाटले असेल, याचा विचार करते. तुझ्या चाली हा या गाण्यांतील महत्त्वाचा भाग आहे. त्या चाली काव्याला अनुरूप आहेत. त्यामुळे गायकाला जास्त प्रयत्न करावा लागत नाही.

--पं. हृदयनाथ मंगेशकर- अन्य गायकांकडे त्या चाली मला वेगळ्या वाटतात. मीराबाई असंच गायल्या असतील, असं मला वाटतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात तुझं व्यक्तिमत्त्व विलीन होतं.
--लता मंगेशकर- यात काव्य ही मोठी गोष्ट आहे. त्यानंतर चाल येते. चालीला वाद्यांची साथ असते. या सगळ्याला आपले समजून आपण गातो, तेव्हा ते गाणं चांगलं होतं. मीरा हा माझा आवडीचा विषय आहे. प्रत्येक गाण्यात मी भान विसरून गायचे. त्या वेळी तर मी खूप आजारी होते. दहा ते बारा दिवस सलग रेकॉर्डिंग झालं. आम्ही दिवसभर काम करायचो. माझा वाढदिवस होता. सप्टेंबर महिना होता. शेवटचं गाणं होतं, 'चालावाही देस...' मला त्या वेळी उभंही राहता येत नव्हतं. पण प्रत्येक गाणं गाताना वाटायचं की आपण मीरेच्या आसपास आहोत. मला खूप आनंद मिळायचा. त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. ऑपरेशन झालं. त्या वेळी पितृपंधरवडा चालू होता. लोकांना सगळ्यात जास्त ते रेकॉर्ड आवडते. कितीतरी लोकांची पत्रं आली. एवढ्या वर्षांनंतरही लोक ते रेकॉर्ड खूप चांगले असल्याचे सांगतात. तुझ्यासोबत काम करताना चालींचा वेगळेपणा आवडतो. तुझी मला आवडणारी गोष्ट म्हणजे तू निवडलेली काव्यं खूप सुंदर असतात.

--पं. हृदयनाथ मंगेशकर- तूच मला कवितेचा नाद लावला. भा. रा. तांबे, मैथिली शरण गुप्ता यांची पुस्तकं आणून दिलीस. पण तुला कवितेचा नाद कसा लागला?
--लता मंगेशकर- वाचनाचा नाद मला कोल्हापूरला अक्कामुळे म्हणजेच इंदिरा या मावसबहिणेमुळे लागला. ती लेखिका होती. ती शरदचंद्र चटर्जी वाचायची. तिने मला पुस्तके आणून दिली. मी मुंबईला आले त्या वेळी विनायकरावांनी हिदी काव्याची पुस्तके दिली. भा. रा. तांबेंचं पुस्तक त्यांनीच मला दिलं. त्यांचं आवडतं गाणं होतं, 'घनतमी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना बघ तरी...' ते गाणं त्यांनी मला शिकवलं. 'उठा उठा हो सकळीक' ही चाल त्यांचीच. त्यांनी माझ्यासाठी लेखराज शर्मा म्हणून कवी असलेल्या शिक्षकांची शिकवणी लावली. ते मला हिदी शिकवायला यायचे. त्यांच्यामुळे मी हिदीतील अनेक पुस्तके वाचली. प्रेमचंदांची सर्व पुस्तकं वाचली. त्यांनी मला दिनकर, मैथिली शरण, बच्चन, नरेंद्र शर्मा आदी कवींची पुस्तकं आणून दिली. मास्टर विनायकांमुळे मला काव्याची आवड लागली.

--पं. हृदयनाथ मंगेशकर - बाबांना मेकअप, पावडर आवडायचं नाही, पण नंतर तू त्यातच गेलीस...
--लता मंगेशकर - खरंतर मला ते आवडायचं नाही, पण करावं लागलं. नंतर प्लेबॅक सिगिग सुरू केले, तेव्हा मी बाबांच्या फोटोला जाऊन नमस्कार केला आणि सुटले यातून एकदाची म्हणाले... मेकअप, लाईट हे मला कधीच आवडलं नाही. पर्सनल लाईफमध्येही मी ते कधी केलं नाही.

--श्रीरंग गायकवाड
(MONDAY, 20 DECEMBER 2010)
------------------------------------

               (साभार आणि सौजन्य-श्रीरंग गायकवाड.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
              --------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.09.2022-सोमवार.