कविता पावसाच्या-कविता-चोपन्नावी-पहिला पाऊस

Started by Atul Kaviraje, September 13, 2022, 02:38:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "कविता पावसाच्या"
                                     कविता-चोपन्नावी
                                  ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा पाऊस यावर्षी अगदी सुरुवातीलाच मनसोक्त बरसला आणि या पावसाला साजेशा कविताही कविमनातून उत्स्फूर्तपणे प्रगटल्या. प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा पाऊस यावर्षी अगदी सुरुवातीलाच मनसोक्त बरसला आणि या पावसाला साजेशा कविताही कविमनातून उत्स्फूर्तपणे प्रगटल्या. महाराष्ट्राला सुखावणा-या या पावसावर दै. 'प्रहार'ने 'बालकवी' पुरस्कारासाठी कवींना 'पाऊस' या विषयावर कविता पाठवण्याची एक अनोखी संधी दिली आहे. पावसावरील अशाच काही निवडक कविता आम्ही आपणा वाचकांसाठी क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

                                      "पहिला पाऊस"
                                     ---------------

तप्त मातीला आणि मनाला
गारवा देणारा पहिला पाऊस
ओसाड भकास सृष्टीला
हिरवा करणारा पहिला पाऊस
अल्लड मुलांना अन् साऱ्यांनाच
चिंब करणारा पहिला पाऊस

पण मला अजूनही आठवतोय पहिला पाऊस
माझ्या पेंढारी घरातून आत
थप-थप गळणारा..
सतरा ठिगळांच्या कुडातून आत
झिर-झिर झिरपणारा..
जिथं गळायचं तिथं भांडं असायचं
तरीही घराची चाळण करणारा
पहिला पाऊस..

पोरं रस्त्यावर थिरकायची पावसात
आम्ही मात्र भिजायचो घरच्या घरात
तुडुंब शेत, पाणी भरायचं नदी-नाल्यात
आमचे टोप भरायचे-भरायची पिठाची परात
छत्री कुठली? गोणपाटाचं खोलडं
कपडे भिजायचे, काहीच नसायचं कोरडं
रपा-रपा मातीत पाय
फटीतून बोटांच्या चिखल यायचा वरती
तरीही धुंद सारे-तृप्त व्हायची धरती

--गंगाधर साळवी,महाड
---------------------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-प्रहार.इन)
                         -----------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.09.2022-मंगळवार.