"प्रतिबिंब"-अस्वस्थतेतून सुचते कविता !

Started by Atul Kaviraje, September 14, 2022, 09:16:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "प्रतिबिंब"
                                       ----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री अभिजित यांच्या "प्रतिबिंब" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे   शीर्षक आहे- "अस्वस्थतेतून सुचते कविता !"

                                अस्वस्थतेतून सुचते कविता !--
                               -------------------------

     कविता कशी सुचते याचं ठोकळेबाज उत्तर माझ्यापाशी नाही। पण जे काही थोडंफार लिहिलं ते अस्वस्थतेतून आलं असं मला वाटतं. जगण्याच्या ओघात कधी कधी उगाचच अस्वस्थ व्हायला होतं. मग ही अस्वस्थता मनाची असते, कधी आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही गोष्टींची असते. या अस्वस्थतेतूनच एखादा विषय मनाला भिडतो. मग त्या भिडण्यामागूनच शब्दही टपटपत येतात. त्या शब्दांची होते एखादी ओळ. ही ओळच कवितेचा ढाचा घेऊन येते. मग आख्खीच्या आख्खी कविताच डोळ्यासमोर उभी रहाते. त्यातूनच सगळी कविता आकाराला येते. व्यक्त होण्यासाठी इतरही माध्यमं आहेत पण कविता हे त्यातल्यात्यात जवळचं आणि सहज माध्यम वाटलं .

     कविता लिहिल्यानंतर तथाकथित विरेचनाची भावना, मोकळं झाल्याचा आनंद होतो, असं मी म्हणणार नाही. मुळात तसं मला वाटतंच नाही. पण कधी स्वत:च्याच ओळी पुन्हा वाचल्यानंतर काही तरी जमल्याची भावना मनाला आनंद देते, खूप समाधान देते. पण या सगळ्यात अस्वस्थता कायमच रहाते. ही अस्वस्थता कधी विसरलेपणाच्याही पलीकडे कुठेतरी लपून बसते. मग कधी स्वत:च्याच अस्वस्थ शब्दांवरुन नजर फिरल्यावर पुन्हा जागी होते. आणि कधी तीच दुसऱ्या कवितेची प्रेरणाही बनते, असं काहीसं माझ्या बाबतीत होत आलंय. अलीकडच्या काळात माणूसपण आपल्या कवितेतून व्यक्त करता यावं असं वाटायला लागलंय. कोणताही आडपडदा, झापडं न लावता, माणसाचं सगुण, निर्गुण, भलं, बुरं रुप स्वीकारत माणूस माणसाशी बोलला पाहिजे, तो निर्मळतेनं व्यक्त झाला पाहिजे, ही भावना मनात कायम रहाते आहे. पण माणसाचं माणूस म्हणून बिघडणं, या गोष्टीनं फार अस्वस्थही व्हायला होत नाहीये. माणसाच्या या बिघडलेपणातून माणूसपणाचं काही अस्सल हाती लागावं याचा शोध सध्या मनातल्या मनातच सुरु आहे. त्यासाठी मात्र गांभीर्यानं पण आपसूकच अस्वस्थ होता आलं पाहिजे.

--अभिजित 
(Friday, November 26, 2010)
---------------------------------

                   (साभार आणि सौजन्य-अभिप्रतिबिंब.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  -----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2022-बुधवार.