मीऽच तो...-स्वप्नी माझ्या येशील...का ?--क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 14, 2022, 09:28:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "मीऽच तो..."
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री अमित यांच्या "मीऽच तो..." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे  शीर्षक आहे- "स्वप्नी माझ्या येशील... का ?"

                          स्वप्नी माझ्या येशील...का ?--क्रमांक-१--
                         ----------------------------------

     स्वप्नं... जवळपास सर्वांचीच काही ना काही स्वप्नं असतात.  पण ती जागेपणी, हो जागेपणीच.  कारण बर्‍याच लोकांना ते जागेपणी ज्या गोष्टीला 'अमुक एक बनणं माझं स्वप्न आहे' कींवा 'ही माझी स्वप्नसुंदरी आहे' असं म्हणतात ती त्यांच्या स्वप्नात मात्र शक्यतो येत नाही! :)

     तुम्हाला ही काही इंटरेस्टींग स्वप्ने पडली असतीलच की... म्हणजे  कधी एखादं भीतीदायक स्वप्न, कींवा कधी आपण जे करायचं नाही असं ठरवलंय तेच स्वप्नात करताना दिसणं.  एक स्वप्न तर बहूतेक सर्वजण किमान एकदा तरी अनुभवतातच, आपला स्वप्नात अचानक तोल जातो आणि आपण जागे होतो कींवा स्वप्नात कुणीतरी पोटाला गुदगुल्या केल्यात आणि तुम्हाला जाग आली?

     मधे येऊन गेलेल्या इन्सेप्शन चित्रपटाने सुद्धा स्वप्न हा विषय हाताळला होता, आणि त्यात वापरली गेलेली बरीच माहिती बरोबर सुद्धा होती!  या चित्रपटाने स्वप्नांबाबतचे माझे काही जुने अनुभव जागे केले होते.

     तेव्हा मी नुकताच कॉलेजला जाऊ लागलो होतो आणि त्या दरम्यानच मित्रांशी बोलताना लक्षात आलं की इतरांना त्यांनी रात्री पाहीलेलं स्वप्नं कधीकधी लक्षात रहातं पण आपल्याला मात्र कधीकधी २-३ स्वप्नं सुद्धा आठवतात!  सुरुवातीला गंमत वाटली आणि मी रोज ती आठवण्याचा प्रयत्न करु लागलो.  कधी कधी जमायचं सुद्धा.  मग मला अचानक १-२ वेळा जाणवलं की मी स्वत: स्वप्नात जागा आहे आणि अधे मधे मी स्वप्नाची दिशाही बदलतोय!  आता मला हे सगळं गूढ वाटू लागलं होतं काही तरी भारी शक्ती वगैरे. :) म्हणून मग मी प्रयत्न वाढवले.  पण मग एकदा भयानक घटना घडली.  मला जाणवलं की मी पालथा आहे, माझ्या पाठीवर बसून कोणीतरी भेसूर हसतंय. सगळीकडे काळोख होता.  मला काहीच करता येत नव्हतं, जखडला गेलो होतो मी.  घाबरुन ओरडण्याचा प्रयत्न केला तर आवाजही फ़ुटेना.  काहीच सुचत नव्हतं. शेवटी विचार करणं सोडून दिलं... काय झालं माहिती नाही पण पहाट झालेली होती आणि मी झोपेतून ऊठत होतो.  त्यादिवशी मनाशी गाठ बांधली की असली मस्ती परत करायची नाही. :)

     पण ४ एक वर्ष उलटून सुद्धा स्वप्नात जाणिवा असणं प्रयत्न न करता ही होत होतं, म्हणजे मला मी स्वप्नात आहे हे कळायचं.  पण मी त्यांच्याशी उगाच खेळ करणं बंद केलं होतं.  तरीही परत एकदा विचित्र घटना घडलीच.  मला माझे शरीर हलवता येत नव्हते.  इकडे तिकडे बघितलं तर खाली मला मीच दिसलो! खूप घाबरल्या सारखं झालं ओरडायचा प्रयत्नही केला... (घ्या... आता बॉडी खाली आहे तर तोंड तिकडे खालीच असणार ना, ओरडणार कुठून? :) पण स्वप्नांच्या डायरेक्टर ला असले प्रश्न पडत नाहीत.) पण काही नाही.  मग सकाळी पुन्हा नॉर्मल.  शेवटी याचा अर्थ लावायचाच असं ठरवलं, इंटरनेट वर शोध घेतला आणि माहिती काढली.  आणि ती वाचून मजा वाटली!  आपल्या स्वप्न पहाण्यात इतक्या गोष्टी असतात हा विचारच नव्हता केला ना कधी...  त्यानंतर मात्र सांगितलेल्या गोष्टींची काळजी घेतल्यामुळे म्हणा कींवा हा काय प्रकार आहे हे कळल्यामुळे म्हणा, असे विचित्र अनुभव आले नाहीत आणि दु:स्वप्नांची भीतीही वाटत नाही.

--अमित
(शनिवार, ६ ऑगस्ट, २०११)
------------------------

                    (साभार आणि सौजन्य-मीऽच तो.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                 (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                   -------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2022-बुधवार.