मीऽच तो...-स्वप्नी माझ्या येशील...का ?--क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 14, 2022, 09:31:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "मीऽच तो..."
                                       -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री अमित यांच्या "मीऽच तो..." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे  शीर्षक आहे- "स्वप्नी माझ्या येशील... का ?"

                          स्वप्नी माझ्या येशील...का ?--क्रमांक-3--
                         ----------------------------------

     आता हे सगळं झाल्यावर आपण REM मधे आलो (इथून पुढे आपण म्हणजे चेतन मेंदूतला एक भाग समजा).  इथे आपला अचेतन (subconscious) मेंदू काम करु लागतो, हा आपल्या स्वप्नांचा दिग्दर्शक, आणि खरं तर पटकथालेखक सुद्धा.  घोळ इतकाच असतो की याला विषयच दिलेला नसतो!  कारण स्मृतींमधे आज कुठे काय भरलंय आणि कशाची उजळणी केली आहे ही माहिती असलेले भाग तर आराम करताहेत.  मग हा स्वत:च  स्मृतींमधून मिळेल तशी माहिती जमवायला सुरु करतो आणि जागेवरच पात्रे, कथा, स्थळं वगैरे उभी करु लागतो (विश्वास ठेवा... मला एकदा मी जुरासिक पार्कमधे अडकलोय आणि सनी देऒल मला डायनासोर पासुन वाचवतोय असंही स्वप्न पडलं होतं!!! हे त्या स्पिलबर्गच्या बापाला तरी सुचलं असतं का? :D ).  यामुळे आपण आज विचार केलेल्या गोष्टी स्वप्ना मधे येतीलच कींवा येणारच नाहीत अशी कुठलीही हमी देता येत नाही.

     शक्यतो आपल्याला जाग आल्यावर लगेचच स्वप्नांच्या स्मृती धूसर व्हायला सुरुवात होते (स्त्रीयांना स्वप्ने जास्त चांगली लक्षात रहातात म्हणे... त्यामुळे त्यांच्या स्वप्नात जाणार असाल तर जरा जपून ;) ).  पण जर पडलेल्या स्वप्नांमधे एखादे अत्यंत भीतीदायक कींवा खूप चांगले स्वप्न असेल तर ते लक्षात रहाते.  स्वप्नांबाबत एक मजेशीर गोष्ट म्हणजे ती तुटक असतात, म्हणजे एखादे स्वप्न मधेच चालू कींवा मधेच संपू शकते आणि पुढचे स्वप्न (जे पुन्हा पूर्णपणे असंबद्ध विषयावर असू शकेल) सूरु होवू शकते.  हे म्हणजे महाभारताच्या शॉटमधे सुपरमॅन येण्याइतके असंबद्ध असू शकते.  एक मात्र नक्की, स्वप्ने आठवणे हे शिकता येते.  झोपेतून उठल्या उठल्या स्वप्ने आठवण्याचा प्रयत्न नेहमी करत राहील्यास एकापेक्षा जास्त स्वप्ने आठवण्याची क्षमतासुद्धा प्राप्त करता येते.

     मग जर स्वप्ने आठवू शकतात तर त्यात आपल्याला जाता येईल?  याचं उत्तर हो आहे!  काही लोकांना ही क्षमता असते व काही लोक सततच्या प्रयत्नांनी हे साध्य करतात.  याला Lucid Dreaming म्हटले जाते, अशा प्रकारच्या स्वप्नात तुम्हाला कळून चुकलेले असते की तुम्ही झोपेत आहात आणि तुम्ही पहाताय ते स्वप्न आहे.  त्यामुळे एका अर्थाने तुम्ही (चेतन मेंदूचा तो एक जागा असलेला भाग!) स्वप्नात राहून ते अनुभवत असता आणि ते लक्षातही रहाते.  याचा दु:स्वप्नांचा अंमल कमी करण्यासाठी फ़ार उपयोग होऊ शकतो.  कारण जर दु:स्वप्नांमधे आपल्याला हे मान्य करता आले की मी पहातोय ते एक स्वप्न आहे तर त्याचा परीणाम बराच कमी होऊ शकतो!

     पण याचाच एक भाग म्हणून दुसरी गंमत मात्र घडू शकते... कधी असं वाटलंय की तुम्ही सकाळी ऊठून आवरताय, कामावर जायला उशीर होतोय म्हणून पळापळ करताय... आणि जागे झालात हे पहायला की तुम्ही आत्ता पहात होतात ते स्वप्न होतं?  :) असंही होऊ शकतं.  एखाद्या स्वप्नाच्या मधेच आपल्याला कळलं की हे स्वप्न आहे  आणि कदाचित ते तितकंसं भारी स्वप्न नसेल म्हणून आपण तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.  आता बाहेर म्हणजे काय तर आपल्यासाठी बाहेर येणं म्हणजे जाग येणं.  मग आपला अचेतन मेंदू नवी चाल खेळतो, तो आपण जागे झाल्याचंच स्वप्न रचतो आणि आपल्याकडूनच सकाळी आवरण्याची माहिती घेऊन False Awakening ची स्थिती तयार करतो!  आहे ना मजेशीर...

     हे तर झालं गमतीशीर... पण या Lucid Dream मुळे संभ्रम कींवा भीतीने गाळण उडण्याची वेळही येऊ शकते.  वर दीलेली घटना शक्यतो तेव्हा घडते जेव्हा आपल्याला स्वप्नात असताना आपण स्वप्नात असल्याची जाणिव होते.  पण स्वप्नात जातानाच जर अशी जाणिव निर्माण झाली तर थोडेसे विचित्र परीणाम समोर येतात.  जर स्वप्नात जातानाच आपण स्वप्नात जात असल्याची जाणिव घेऊन जात असू तर स्वप्न पहाण्यासाठी केली जात असलेली ती सर्व प्रक्रीया आपण अनुभवत असतो! त्यामुळे आपल्याला भयानक आवाज येणे, शरीर थरथरत आहे कींवा सर्वांगाला मुंग्या येत आहेत असे वाटणे कींवा आपण आपल्या शरीरातून बाहेर पडलो आहोत असे वाटणे असे वेगवेगळे विचित्र अनुभव येऊ शकतात.  बरं आपण असतो मात्र झोपेत त्यामुळे पुढच्या प्रक्रीया घडत रहातात.  मात्र झोप झाल्यावरही हे अनुभव एक भयानक कींवा विचित्र स्वप्न म्हणून आपल्याबरोबर येतात.

--अमित
(शनिवार, ६ ऑगस्ट, २०११)
-------------------------

                   (साभार आणि सौजन्य-मीऽच तो.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  --------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2022-बुधवार.