अनुभव... क्षण वेचलेले...-दंश--क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 15, 2022, 09:27:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "अनुभव... क्षण वेचलेले..."
                               -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, मनस्वी राजन यांच्या "अनुभव... क्षण वेचलेले..." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "दंश"

                                        दंश--क्रमांक-2--
                                       --------------

     सगळेजण दार वाजवत होते. शेवटी खोपटाच्या दाराला जोराचा धक्का दिला. खोपटाचे दार उघडले. खोपटाच्या आतुन एखादी वीज वेगाने दारावर येऊन सर्वांच्या अंगावर धडकावी आणि त्याच वेगात सगळेजण हादरुन दरवाज्यापासून उलट्या पायाने आणि विजेच्या वेगाने मागे फिरले. एखादी कोणाला न ऐकु आलेली किंकाळी सगळ्यांचे कान सुन्न करुन गेली आणि सगळ्यांच्या नजरा सुध्दा बधीर झाल्या. परश्याच्या खोपटामधे एक बारीक हालचाल झाली; आणि मागे फिरलेले पाय पुन्हा खोपटाकडे त्या निर्जीव वातावरणात चालू लागले. जी बारीक हालचाल झाली ती अर्जुनाची. 'अर्जुन' परश्याच्या एकमेव मुलगा. परश्या आणि त्याची बायको खोपटामधे हात-पाय वाकडे करुन पडले होते. बाभळीच्या लाकडासारखे कडक झालेले हातपाय आणि अस्ताव्यस्त झालेली त्यांच्या अंगावरची फाटकी वस्त्रे वस्तुस्थितीची जाणीव करुन देत होती. दोघांचाही जीव मरणयात्रेवर गेला होता. दोघांचाही मृत्यू झाला होता.

     अर्जुन त्यांच्या बाजुलाच त्या ताडपत्रीवर पडला होता. एक पाय हवेत उचलायचा प्रयत्न करत होता. पोट दाबत होता. तोंडातून फेस वजा थुंकी बाहेर काढत होता. अर्जुनाला जिवंत पाहून सगळ्यांनी लगबग केली आणि खोपटात घुसले. वस्तीतल्या नानाने पटकन खाली बसून अर्जुनाचा पाय उचलून त्याचा तळवा चोळायला सुरवात केली. त्याच वेळी खोपटाच्या कोप-यातुन सळ-सळ असा दिर्घ आवाज झाला. त्या आवाजाकडे सगळ्यांच लक्ष वेधले गेले. नानाने अर्जुनाचा पाय हातून तसाच सोडून दिला आणि तो तसाच उभा राहिला. दोन काळेकुट्ट साप खोपटाच्या पाचोळ्यातून बाहेर जात होते. एक अंदाजे तीन्-चार फुटाचा असेल आणि एक त्याच जातीचा साधारण दिड फुटाचा होता. आवाजाची सळ-सळ ज्या वेगात आली त्याच वेगाने दोन्ही साप पाचोळ्यातून बाहेर गेले. ती सळ-सळ आणि सापांनी वेगात जाण्यासाठी सरपटताना केलेली वळ-वळ सगळ्यांच्याच अंगावर काटा आणून गेली. भितीने सगळ्यांचे घशे कोरडे पडले, घश्यातच आवंढे घेत सगळेजण उभे राहिले आणि पटकन अर्जुनाला उचलून खोपटाच्या बाहेर आणले.

     पटकन कुणीतरी जाऊन तांब्यामधे पाणी आणले. अर्जुनाच्या तोंडात थेंब-थेंब पाणी सोडलं आणि नाना त्याला विचारु लागला.
"आर्जुना काय रं झालं ?".
अर्जुन," लैऽऽऽऽ  पोटात दुखतया नानाऽऽ, पायबी लय दुखतोयाऽऽऽ. आग पडलीयाऽऽऽऽ पोटात.."
अर्जुना त्याला जमेल तेवढ्या मोठ्या आवाजत विव्हळण्याचा प्रयत्न करीत होता. अर्जुना कन्हत होता.
"आई बा ला काय झालयं रं तुझ्या ",नाना.
अर्जुन, "लै हातपाय झाडत होती दोघं, मग पार शांत झाले, मलाबी काय तरी चावलय पायाला. लै चुन-चुनतयाऽऽऽऽ. ओ नानाऽऽऽऽ  बघाना  वोऽऽऽ".
नाना,"आरंऽऽऽऽ , भो**च्या होऽऽ.  गर्दी करुन हुभ राह्यलया. आत खोपटात बघा की काय हालचाल हाय का?"

     दोघे-तिघे घाईने खोपटात गेले, परश्याचे आणि त्याच्या बायकोचे हातपाय कसेबसे सरळ केले. तिथल्याच एका पोत्याचे सुत काढुन परश्याच्या नाका समोर धरलं;
तसंच सुत परश्याच्या बायकोच्या नाकासमोर धरलं; कसलीही हालचाल नाही म्हंटल्यावर दोन बायकांनी टाहो फोडला. सा-या बायका, बापे, लहान मुले, वस्तीवर बांधलेली गुरे, दारात फिरणा-या कोंबड्या आणि एकूणच सा-या मळ्याच्या नजरेने खोपटाचा वेध घेतला. सकाळचा मळ्यावरच्या वस्तीवर फिरणारा प्रसन्न वारा आज मात्र वातावरणाला चांगलाच झोंबला होता. मळ्यावरची वस्ती परश्याच्या खोपटापुढे जमा झाली. दोघांची प्रेते लोकांनी खोपटाच्या दारात ठेवली. वस्तीतल्या बायकांनी त्या दोघांचा ताबा घेतला आणि अक्षरश: मोठ्या आवाजात रडगाणं चालू केले. सगळ्या पुरषांनी तिथेच गराडा घातला आणि दोन पायावर बसले. कोणी तंबाखु काढली, कुणी बीड्या पेटवल्या, कुणी बळेच डोळे पुसायला सुरवात केली. तर कुणी आपल्याच पायाच्या अंगठ्यानी जमीन टोकरत परश्याच्या बायकोच्या गळ्यातल्या गंठणाचं काय करायच असा विचार करत खाली मान घालुन बसले. तिथूनच काही पावलं अंतरावर नाना अर्जुनाच पाय चोळत बसला होता. हा सगळा प्रकार बघुन नानाने ओरडायला सुरवात केली.

--मनस्वी राजन
(Sunday, August 28, 2011)
------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-मनस्वी राजन.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                -----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2022-गुरुवार.