अनुभव... क्षण वेचलेले...-दंश--क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, September 15, 2022, 09:30:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "अनुभव... क्षण वेचलेले..."
                                -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, मनस्वी राजन यांच्या "अनुभव... क्षण वेचलेले..." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "दंश"

                                        दंश--क्रमांक-4--
                                       --------------

     अतिशय मळलेले पंचासारखे नेसलेले धोतर, पांढ-या रंगाची कोपरी. दंडाला लाल-भगव्या रंगाचे धागे बांधलेले. गळ्यात कवड्यांच्या आणि रुद्राक्षाची माळ. काळ्या दो-यात बांधलेल्या छोट्या-छोट्या पेट्या गळ्यामधे लटकत होत्या. खुरटी दाढी आणि ओठ-तोंड पान-सुपारीमुळे पुर्ण लाल. डोक्यावर तेलकट गांधी टोपी आणि कपाळावर गुलाल आणि बुक्क्याच्या पट्ट्या. वय थोडं जास्त झाल्याने कमरेत झुकुन झपझप चालत हातात पिशवी आणि गाडगं घेऊन आप्पा मांत्रिक आला. अर्जुनाकडे न जाता सरळ त्याच्या
आई-बापाकडे  गेला. त्यांच्या अंगावरचे रग ऊचलुन कुठे-कुठे काय बघत होता ते कोणालाही कळाल नाही आणि पटकन अर्जुनाकडे आला, त्याचे पाय नीट बघत आपल्या घोग-या आवाजात बोलायला सुरवात केली,"आर...आर..! गड्या हो. हे काय साध सुध दिसत नाय. वेगळच जनवार दिसतया".
नाना, "आप्पा महाराज,किडूकच होत. आम्ही सगळ्यांनी बघीतलया".
आप्पा,"व्हय रं बाबा. सापच हाये पण ह्यो बांधावरचा दिसतुया. चुकलया काय तरी. सा-या घरादारावर ऊठलया."
नाना आश्च्यर्याने," बांधावरचा म्हंणजी? म्हसुबाचा म्हणताय काय?"
आप्पा,"व्हय म्हसोबा. बांधावरचा म्हसोबा. काय तरी द्वाड केलया त्याला तुम्ही".

     आप्पानी अर्जुनाला ऊचलले आणि 'उगवती-मावळती' कडे पाय आणि डोके केले. पिशवीतुन अंगारा काढला. अर्जुनाच्या कपाळाला लावला. नाकापुढे धरला.अर्जुनाचा श्वास चालु होता. गाडग्यात हात घातला आणि तोंडातली तोंडात मंत्र म्हणायला लागला आणि जोरात ओरडला "यस देर भैरवनाथाऽऽऽऽ". गाडग्यातल पाणी एका हातात घेतल. अर्जुनाच्या ओठावर त्या पाण्याचे थेंब पाडले. आपल्या एका हाताने अर्जुनाचे तोंड जबरदस्तीने उघडुन हातातले पाणी तोंडात सोडले. ओला हात अर्जुनाच्या तळव्याला आणि पायाला काहीतरी पुटपुटत चोळला. आपल्या दंडाचा एक लाल दोरा काढला आणि पिशवीमधून एक छोटी तांब्याची डबी बाहेर काढली. डबीमधून सापाची कात काढली आणि त्या लाल दो-यामधे बांधली. तो लाल दोरा अर्जुनाच्या ज्या पायाला साप चावला होता त्या पायाच्या मांडीला आवळुन बांधला, आप्पा मोठ्याने बोलु लागला," म्हसोबाचा आणि भैरवनाथाचा निवद करा. आंड, चिलीम, भात, गुळ, त्याल,शेंगदाणं घेउन या". असं म्हणत आप्पाने एका पुडीतुन कुंकु हातावर घेतले.

     अर्जुनाला कुंकु लावलं. चारही बाजुला फुंकलं आणि अर्जुनासमोर डोळे मिटुन काहीतरी पुटपूट्त बसला.नाना आणि दोन-चार बायका खोपटांमधे गेले. आप्पा मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे सगळा नैवेद्य गोळा करुन आणला. सगळेजण अर्जुनाकडे आणि आप्पाकडे टक लावून बसले होते पण दोघांच्या मुद्रेमधे काहीच फरक नव्हता. फरक होता तो फक्त म्हणजे अर्जुन हळुहळु काळसर होत चालला होता. काही वेळाने आप्पाने डोळे उघडले आणि अर्जुनाकडे बघितले. पुन्हा पहिल्याप्रमाणे पाणी पाजले. अर्जुनाच्या प्रतिक्रियेची वाट बघत बसला आणि घाई करायला लागला, "गड्या हो! चला लवकर. निघा. कोणत्या बांधावर म्हसोबा हाय तिथं चला. ह्या पोराला बी घ्या".
सगळ्यांमधला एकजण म्हणाला, "मागच्या हाप्त्यात धाकल्या मळ्यात परश्यान नांगर चालवला तवा त्यानी बांधावर नांगर घातला आणि म्हसुबाला मातीखाली गाडला. तव्हाच म्या त्याला म्हणल व्हतं. बांधावरचा देव हाय. कोपल. पण खोपडीच्या नशेत गड्याने थट्टा केली".
नाना," चला बीगीबीगी धाकल्या मळ्यात. पोराला ठेऊ तिथं. घाराण ऐकतुच की देव."

     अर्जुनाला नानाने पाठीवर घेतले होते. त्याच्या जोडीला आप्पा मांत्रिक चालत होता आणि त्यांच्या मागे सगळी वस्ती चालत होती. सगळ्या बायका वस्तीवरच थांबल्या. तेवढ्यात इंदलकराला आणि मुकादमाला बोलवायला गेलेले गडी सगळ्यांच्यात सामिल झाले आणि म्हणाले, "मालक त्याच्या बारक्या पोराला घेऊन कुठतरी गेल्यात. मुकादम म्हणाला व्हा पुढ. आलुच".

     सगळी वस्ती धाकल्या मळ्याची ढेकळ तुडवत आणि ठेचकळत चालत बांधावर पोहचले. जाणकरांनी म्हसोबाची जागा शोधली. ढेकळांखालून म्हसोबाची शेंदुर लावलेले दगड बाहेर काढले. पाणी टाकल. चिलीम ठेवली. तंबाखु भरली. अंड ठेवल. तेलाच दिवा लावला. भात ठेवला आणि त्याच्या समोर अर्जुनाला झोपवले. नानाने म्हसोबाला लोटांगन घातले आणि म्हणाला, "म्हसोबाच्या नावान चांगभलऽऽऽऽ. चुकलं-माकलं पदरात घ्या देवाऽऽऽऽ. बारक्या जिवाला सोडा. पोराच्या नावानं कोंबड चढवतो पण आई-बापाच पाप पोराच्या टाळूवर नका मारु देवा. येत्या आमुश्याला कोंबड लावतो देवा"

--मनस्वी राजन
(Sunday, August 28, 2011)
------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-मनस्वी राजन.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                -----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2022-गुरुवार.