अनुभव... क्षण वेचलेले...-दंश--क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, September 15, 2022, 09:32:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "अनुभव... क्षण वेचलेले..."
                                -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, मनस्वी राजन यांच्या "अनुभव... क्षण वेचलेले..." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "दंश"

                                        दंश--क्रमांक-5--
                                       ---------------

     थोडावेळ लोटांगण ठेऊन नाना ऊठला आणि आप्पाने सुध्दा नानासारखीच देवाची प्रार्थना केली. सा-या वस्तींच्या पुरुषांनी पाया पडायला सुरुवात केली. तिथेच सगळे बांधावर अर्जुनाकडे बघत बसले. आता मात्र वेळ बराच झाला होता. सकाळच ऊन चांगलच तापायला लागलं होत. सगळ्यांच्या कपाळातुन घामाच्या धारा सुरु झाल्या होत्या पण नजरा मात्र अर्जुनावर खिळल्या होत्या. अर्जुनाची हालचाल कमी झालि होती आणि तापत्या ऊन्हामुळे मानेला झटके द्यायला अर्जुनाने सुरुवात केली होती. आप्पा ऊठला आणि बोलु लागला,"गड्या हो! देवाच्या मनात काय हाये कळत नाय. पोराला भैरोबाच्या गाभा-यात सोडु. शेवटाला सा-या गावाचा, देवाचा आणि राना-मळ्याचा राजा त्योच्च".

     नानाने अर्जुनाला खांद्यावर घेतले आणि सगळे पुन्हा सार रान तुडवत कच्च्या रस्त्याला लागले. वेगाने गावात भैरोबाच्या देवळाकडे जायला निघाले. देवळापुढे गेले. आप्पाने आणि नानाने अर्जुनाला भैरोबाच्या त्या अंधा-या गाभा-याकडे नेले. भल्या मोठ्या मंदीरामधे काळ्याकुट्ट अंधाराने गच्च भरलेला गाभारा. तीन फुटाच्या दगडी चौकटीचा दरवाजा ओलांडून एक फुट खाली उतरले की गाभा-याची थंडगार फरशी पायाला लागली. सा-या गाभा-यात तेलकट वास सुटला होता. भैरोबाची मूर्ती मंदिरात कुठे आहे ते त्या भयाण अंधारात समजत नव्हत.गाभा-यातल वातावरण ब-यापैकी थंड होत तरी सुध्दा नानाचे कानशील गरम झाले होते.त्याची धडधड वाढली होती. आप्पा आणि नाना दोघही त्या अंधा-या गाभा-यात चाचपडत होते, एकमेकाला धडकत होते आणि त्याच अवस्थेमधे अर्जुनाला संभाळत होते. आप्पाने आपल्या कोपरीतुन कड्याची पेटी काढली आणि पेटवली. त्याच प्रकाशात भैरोबाचा दिवा शोधला. त्यात तेल घातल. जुनी वात पुढे सरकवली आणि पेटवली. अंधा-या गाभा-यात अंधुक प्रकाश झाला. हा मंद प्रकाश मात्र भिती दाटवत होता. ह्या अंधुक प्रकाशात भैरोबाची काळ्या पाषाणातली ऊभी दोन फुटाची मूर्ती दिसत होती. त्याच्या समोर पडलेल्या खोब-यच्या आणि गुळाच्या तुकड्यांवर मुंगळे फिरताना दिसत होते. देवाचे पाय नानाने धुतले आणि त्याच चौथ-यावर अर्जुनाला झोपवला. नाना देवासमोर आता जोरजोराने रडायला लागला. रडतच नाना अर्जुनासाठी जीवदान मागत होता. अर्जुनाचा श्वास चालु होता. आप्पाने नानाला बाहेर पाठवले. पाच मिनिटांमधे आप्पा बाहेर आला.

     सगळेजन हात जोडुन कोणी मांडी घालुन तर कोणी दोन पायावर मंदीरामधे बसले होते. अर्जुना गाभा-यात भैरोबाच्या पायाशी विसावला होता. आतमधे फ़क्त काळ्या पाषाणातील भैरोबा आणि काळा पडत चाललेला अर्जुन दिव्याच्या अंधुक प्रकाशात दिसत होते. सर्वजण खाली मान घालुन बसले होते. आप्पा गाभा-याकडे बघत होता. नानाच्या दोन्ही डॊळ्यातुन पाण्याच्या धारा चालु होत्या. बरेच जण मात्र आपली मळ्यातली काम रखडली ह्या विचारात होती. बराच वेळ झाला मंदिरात अजून शांतता होती. सगळ्यांचे लक्ष एका आवाजाने वेधले. फटफटीचा आवाज येत होता. मालक येत असल्याची चाहुल सगळ्यांना लागली. सगळेजण मनातून सावरुन बसले आणि नजर गाभा-याकडे लावली. फटफटीचा आवाज स्प्ष्ट होत गेला आणि तो अगदी जवळ येऊन थांबला. मालकाची फटफटी मंदिरासमोर येऊन थांबली. सगळेजण उभे राहीले. फक्त नाना आणि आप्पा जिथे होते तिथेच बसुन राहिले. मालकाच्या मागेमागे स्वत:चे कपडे सावरत रंगीत पँट शर्ट घातलेला मुकादम गडबडीने पुढे येत होता. दणकट शरीरयष्टीचा, घोळदार पायजमा आणि पांढ-या खादी शर्टामधे रुबाबदार चाल ठेवत इंदलकर एकाहातात छोटी  बॅग आणि गाडीची किल्ली घेऊन मंदीरात आला. गड्यांशी बोलायला लागला. आप्पा आणि नानांनी काही त्याच्याकडे लक्ष दिले नाही.

     मग त्यांना आपल्या विशेष मालकी आणि करड्या आवाजात त्यांना बोलावले आणि म्हणाला, "आप्पा. किती येळ झाला".
आप्पा, "पहाटपासुन हाये बहुदा".
इंदलकर, "मग कस आता?"
आप्पा, "देवालाच माहीत".
इंदलकर, "ओय नानाऽऽ. परश्याची आणि त्याच्या बायकुची मैत करायला लागंल. मुकादम नानाकडे पैस द्या. नाना दोन दिसात वस्तीवरचा सुताक संपवा. लै कामाचा खोळांबा होतुया".
मुकादमाने मालकाच्या हातातली बॅग घेतली आणि त्यातुन पैसे काढून मोजायला लागला.
नाना, "व्हय जी मालक. आता जीव जायचा म्हणल्यावर..."
नानाच बोलणे मधेच तोडत इंदलकर म्हणाला, "समद माहीती हाये नाना. माझं धाकट पोरग काल खेळताना पडलं, त्याला तालुक्याला दवाखान्यात नेलाय. तिकडच असतु मी सारा हप्ता. मला जास्त येळ नाय लक्ष ठिवायला. त्यामुळं सुताक संपवायचं दोन दीसात."
नानासह सगळेजण "व्हय मालक" म्हणाले.
नानाच्या मनात विचार आला, 'पैका असता तर आपन आत्ताच अर्जुनाला दवाखान्यात नेला असता. पण म्या पडलो म्हतारा आणि वस्तीत कुनालाच उल्हास नाय'.

--मनस्वी राजन
(Sunday, August 28, 2011)
------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-मनस्वी राजन.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                -----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2022-गुरुवार.