!!अंतर्नाद!!-A Voice Within..!!-पिल्लू-भाग पहिला-क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 16, 2022, 10:10:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            "!!अंतर्नाद!!-A Voice Within..!!"
                           ----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्रीमती अर्चना यांच्या "!!अंतर्नाद!!-A Voice Within..!!" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "पिल्लू"

                                पिल्लू-भाग पहिला-क्रमांक-१--
                               -------------------------

     'किती गोड दिसतंय ना पिल्लू'...पलंगावर गाढ झोपलेल्या त्या मांजरीच्या पिल्लाकडे पाहून मनातल्या मनात ती म्हणाली आणि खुदकन हसली. ते गच्च मिटलेले डोळे, इवलेसे गुलाबी नाक आणि झोपेत  मधूनच जांभई देणारी त्या पिल्लाची मुद्रा पाहून तिला आणखीनच हसायला आले. खूप आळशी झालंय पिल्लू, होणारच...त्याला शाळा आणि कॉलेज मध्ये थोडेच जावे लागणार आहे, आणि नंतर जॉब ची सुद्धा फिकीर नाही. मस्त खा, आणि झोपा, कसली कसलीच चिंता नाही. 

     नाहीतर आपण माणसं, एक दिवस आपला असा जात नाही ज्या दिवशी कसली
काळजी नसेल कसलेही टेन्शन नसेल. मनातल्या मनात तिचे विचारचक्र 
चालूच होते. त्या दिवशी जर आपण पिल्लूला घरी आणले नसते तर काय
झाले असते त्याचे?  त्या आठवणीने तिच्या अंगावर काटा आला. थोड्याच दिवसांपूर्वी घडलेली घटना तिला आठवली... संध्याकाळ झाली होती, त्या दिवशी दिवसभर पाऊस कोसळत होता. ऑफिसमधून घरी येताना त्यांच्या बिल्डिंगच्या आवारात
कुडकुडत बसलेल्या पिल्लाकडे तिची नजर गेली. चिंब भिजलेले, गारठलेल, म्याव म्याव करत ते कसल्यातरी शोधात होते. इवलासा तो कासावीस जीव भर पावसात जीवाच्या आकांताने ओरडत असलेला पाहून तिला कसेतरीच वाटले. तेवढ्यात त्यांच्या  बिल्डींगमध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या जोशी काकू तिला दिसल्या, तिने त्यांना आवाज देऊन विचारले, 'काकू, हे मांजराचे पिल्लू कुठून आले हो? सकाळपर्यंत तर नव्हते इथे.'
'अगं आज दुपारीच ते इथे आलंय, भरकटलय वाटत, आईला शोधत असेल त्याच्या नाहीतर चुकले असेल, जाईल ते...इति जोशी काकू.

     तेवढ्यात शेजारच्या घरातून माने काकू बाहेर आल्या, तिच्याकडे पाहत त्या म्हणाल्या 'अगं, मी आज दुपारी बाजारात जाताना पाहिले होते ह्या पिल्लाची मांजरीन आई मार्केटच्या मेन रोडवर एका बसखाली चिरडून मेली आणि हे पिल्लू थोडक्यात वाचलंय,
बी. एम. सी. वाले ते मेलेले मांजर घेवून गेले, तेव्हापासून ते त्याच्या आईला इकडे तिकडे शोधत फिरतंय.' 'अरेरे...बिच्चारे!!!' जोशी काकू त्याच्याकडे पाहून म्हणाल्या.
येणारे, जाणारे त्याच्याकडे पाहून फक्त हळहळत होते, पण त्याला आसरा द्यायला कुणीच पुढे येत नव्हते. ती तशीच पुढे गेली, पण त्या पिल्लूचे विचार तिच्या मनातून जात नव्हते, 'त्या पिल्लूला घेवून जावे का घरी? पण घरात मांजर नेलेली आई बाबांना आवडणार नाही, आपल्याला तरी कुठे मांजर पाळायला आवडते, पण ते बिच्चारे एकटे पडले होते,
रडत होते, भुकेलेले असेल कधीपासून'. जड मनानेच ती घरात शिरली. तिचा तो पडलेला
चेहरा पाहून, तिच्या आईने काळजीने विचारले, काय झाले गं? ऑफिसमध्ये खूप काम होते का?'

--अर्चना
(सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११)
-------------------------

              (साभार आणि सौजन्य-अंतर्नाद-ए व्हॉइस वीथीन.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                    (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
             ---------------------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.09.2022-शुक्रवार.