!!अंतर्नाद!!-A Voice Within..!!-पिल्लू-भाग पहिला-क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 16, 2022, 10:12:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            "!!अंतर्नाद!!-A Voice Within..!!"
                           ---------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्रीमती अर्चना यांच्या "!!अंतर्नाद!!-A Voice Within..!!" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "पिल्लू"

                                पिल्लू-भाग पहिला-क्रमांक-2--
                               -------------------------

     नाही गं, डोकं दुखतंय असे म्हणत ती डोळे मिटून शांत बसली. आई तिच्याजवळ येत म्हणाली फ्रेश हो पटकन, आणि जेवून झोप म्हणजे बरे वाटेल. मूड नाहीयेय गं काहीच करायचा, ती म्हणाली. बर ठीक आहे शांत बस थोडा वेळ, आई असे बोलून कीचनमध्ये गेली. तिचे कशातच लक्ष लागत नव्हते, त्या छोट्याशा पिल्लाचे विचार तिच्या मनातून जात नव्हते. ते पिल्लू असेल का अजून कि गेले कुणीकडे, ती झटकन उठली, खिडकीजवळ आली आणि कुतूहलाने खाली पाहू लागली, पाऊस कमी झाला होता पण ते पिल्लू अजूनहि तिथेच बसले होते. एका निश्चयाने ती तिथून उठली आणि आईजवळ येत म्हणाली, ' आई आपल्या बिल्डींगच्या खाली एक मांजराचे पिल्लू येताना पाहिले, खूप भिजले होते गं ते, बिचारे एकटेच होते त्याची आईसुद्धा नाही' असे म्हणत तिने घडलेली हकीकत आईला सांगितली. हे ऐकून तिच्या आईलासुद्धा त्याची दया आली. आई, आपण आणूया का त्याला घरी? तिने पटकन विचारले. अगं पण तुझे बाबा रागावतील ना, तुला माहीतच आहे त्यांना असे प्राणी पाळायला बिलकुल आवडत नाही, आईने तेवढ्याच काळजीयुक्त स्वरात तिला सांगितले.

     'आई, बाबांचा ओरडा मी खाईन पण मला त्याला तशा अवस्थेत नाही सोडायचं किती निरागस आणि लहान आहे ते अजून. कुठे जाणार ते? आणिफक्त २-३ दिवसच त्याला ठेवून घेवू आणि नंतर त्याला सोडून देवू. आईला तिचे म्हणणे पटले होते, आईलाही त्याची तशी अवस्था बघवणार नव्हती, शेवटी आईच ती. आईची परवानगी मिळताच ती क्षणाचाही विलंब न करता झरकन उठून खाली गेली. पिल्लाजवळ जावून  तिने त्याला हलकेच पकडण्याचा प्रयत्न  केला पण तेही कसले अवखळ तिच्याकडे जायलाच तयार नव्हते, पण तिनेही हार न मानता शेवटी त्याला पकडलेच आणि अलगद उचलून
घेतले, बिच्चारे भीतीने थरथरत होते. ती त्याला घरी घेवून आली, तिच्या आईने त्याला पुसण्यासाठी एक स्वच्छ आणि जाड फडके दिले, तिने पिल्लूला व्यवस्थित पुसून काढले थोडा उबारा मिळताच त्याचे ओरडणे कमी झाले, तिने मग त्याच्यासाठी छोट्याशा वाटीतून दुध आणले आणि त्याच्यासमोर ठेवले पण त्याने त्याच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहिले नाही. अगं, लहान आहे ते, त्याला चमच्याने दुध दे आई म्हणाली. ती गमतीने डोक्यावर हात मारत म्हणाली अगं हो न विसरलेच केवडूसे आहे हे त्याला अजून स्वतःहून खाता पिता पण येत नसणार. तिने मग त्याला चमच्याने दुध भरवण्याचा प्रयत्न केला पण तो हि निष्फळ झाला. घाबरलेलं असणार ते, त्याला सगळेच नवीन वाटतंय ना असे म्हणून तिने स्वतःच्या मनाला समजावण्याचा प्रयत्न केला.

     त्या पिल्लाला घरी आणल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे समाधान तिच्या आईला दिसले आणि तिचे कौतुकही वाटले. थोड्याच वेळात तिचे बाबाही घरी आले आणि घरात शिरल्याशिरल्या नवीन पाहुणा पाहून भुवया उंचावून त्यांनी प्रश्न केला 'हे मांजर कुणी आणले घरी?' आई बाबांकडे पाहतच म्हणाली 'तुमच्या लाडक्या लेकीलाच विचारा, बाईसाहेब घेवून आल्या त्याला '. बाबांचा ओरडा खाण्याच्या तयारीतच तिने मनातल्यामनात देवाचे नाव घेतले. 'बाबा, मी आणलंय त्याला' असे म्हणत तिने बाबांना परत एकदा सगळी हकीकत सांगितली. तिच्या बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले दिसले, आणि त्यांनी त्या पिल्लाकडे पाहिले,ते पिल्लू घाबरून निपचित त्या फडक्यावर बसले होते. ठीक आहे, पण दोनच दिवस ते घरात राहील आणि तोपर्यंत तुलाच त्याचे सगळे पाहावे लागेल, त्याने घरात घाण केलेली मला आवडणार नाही बाबांनी घोषणा केली. बाबांचे हे वाक्य ऐकताच तिने आनंदानेच मान डोलावली. आणि बाबांनी सुद्धा पिल्लूला दोन  दिवस का होईना पण घरात ठेवण्याची संमती दिल्यामुळे ती भलतीच खुश झाली होती मनातल्या मनातच तिने देवाचे आभार मानले आणि त्या पिल्लाकडे कौतुकाने पाहिले त्याच्या डोळ्यात तिला कृतज्ञतेचे भाव दिसले. जणू त्याला तिचे खूप आभार मानायचे होते. पिल्लू थकल्यामुळे लगेच झोपी गेले होते. त्याने रात्री उठून काही गडबड करू नये म्हणून तिने त्याला एका मोठ्या बादलीत ठेवले, जेणेकरून ते त्यातून उडी मारून बाहेर येवू शकणार नाही. मगच तिला शांत झोप लागली होती.

     दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ती उठली, जाग येताच पिल्लाच्या आठवणीने ती त्याच्याजवळ गेली, पिल्लू कालच्यापेक्षा जरा तरतरीत दिसत होते, त्याची भीती बऱ्यापैकी गेली होती आणि ते बसल्याजागीच सगळीकडे टकमक पाहत होते. भूक लागली असेल न पिल्लूला, लाडातच ती पिल्लुकडे पाहून म्हणाली आणि त्याला चमच्याने दुध भरवू लागली यावेळेस मात्र त्याने ते चटाचटा पिऊन टाकले, तिला खूप बरे वाटले. तिने मग त्याला आंघोळ घालायचे ठरवले आणि त्याच्या नादात ती स्वतःला ऑफिसला जायचंय  हेदेखील विसरून गेली, आईने आठवण करून देताच तिने भराभर सगळे आवरून घेतलं तोपर्यंत पिल्लू ने पूर्ण घरभर फिरून घर पाहून घेतले होते. मग तिने छान पैकी कोमट पाण्याने पिल्लूला आंघोळ घालून त्याला लहान बाळाप्रमाणे फडक्यात गुंडाळून ठेवले आणि ऑफिसला जाताना आईला त्याची काळजी घे आणि बाहेर सोडू नकोस हे सांगायला ती विसरली नाही.

(क्रमश:...)

--अर्चना
(सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११)
-------------------------

             (साभार आणि सौजन्य-अंतर्नाद-ए व्हॉइस वीथीन.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                   (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
            ---------------------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.09.2022-शुक्रवार.