बाल-सलोनी-हवाहवाई-भाग १-माऊई कडे प्रयाण-अ

Started by Atul Kaviraje, September 16, 2022, 10:18:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "बाल-सलोनी"
                                     -------------
                             
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, बाल-सलोनी च्या "बाल-सलोनी" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "हवाहवाई-भाग १-माऊई कडे प्रयाण"

                           हवाहवाई-भाग १-माऊई कडे प्रयाण--
                          --------------------------------

     माऊईहुन परत येऊन ७ दिवस झाले परंतु अजुनही मन तिथेच आहे. अजुनही असेच वाटते आहे की सकाळी उठले की पहिली गोष्ट दृष्टीस पडेल ती म्हणजे घनदाट झाडांमधुन आकाशाकडे झेपावणारे, गवताच्या पात्यांसारखे माड आणि त्यांच्या पाठीमागे ढगांनाही भेदुन आकाशाचे चुंबन घेऊ पाहणारा उत्तुंग हालेयाकाला पर्वत. अजुनही लाटांचे आवाज येत आहेत. अजूनही असेच वाटते की घराबाहेर गाडी काढली की वडांच्या रांगा समोर येतील. उसांची शेती दिसेल ... निळ्याशार पाण्याशेजारुन वळण घेत जाणारे रस्ते लागतील. माऊईचे सौंदर्य नुसते प्रेक्षणीय नाही तर भावनिक वाटले. कदाचित कुठेतरी भारताची आठवण झाली. रोजच्या दगदगीतुन विरंगुळा मिळाला, निर्भेळ आनंदाचा सहवास मिळाला, मातीचा वास मिळाला, मध्येच गोवा, मध्येच सह्याद्री, मध्येच घाटाचा सुगंध मिळाला !

     तशी काही फार काही पूर्वनियोजित सहल नव्हती ही. मनात बर्याच दिवसांपासुन होते की हवाईला जायचे. दोन महिन्यांपूर्वी सहजच पाहिले तर सगळे काही जमुन आले. त्यातुन यावर्षी भारतभेटही नसल्यामुळे सुटीत काय करावे असा प्रश्न होताच. कॅलिफोर्निया, नेवाडा यापूर्वीच ५-१० वेळा फिरुन आलेलो. मेनलॅण्ड वर फ्लोरिडा आणि वायोमिंग वगळता मुख्य सर्व काही एव्हाना पाहुन झाले आहे. अगदी कोलोरॅडो राहिले होते ते ३ महिन्यांपूर्वी केले तुझ्याबरोबरच. कोलोरॅडोची मजा काही वेगळीच. १२००० फुटांच्या वर २०० शिखरे असलेले राज्य! ग्रॅण्ड कॅनियन तयार करणार्या कोलोरॅडो नदीचा उगम होतो त्या रॉकीज पर्वतांचे राज्य! निसर्गाचे मला नेहेमीच आकर्षण वाटले आहे. मग तो समुद्र किनारा असो किंवा ढाकबहिरीची पर्वत कपारी मधील गुहा. त्यामुळे कोलोरॅडो पहायला नक्कीच आवडले. तुझा पहिला विमान प्रवास. सहल तशी छानच झाली होती. परंतु कोलोरॅडोच्या प्रवासात कारचा खूपच प्रवास झाला. डेन्व्हर-रॉकिज माऊंटेन-डेन्व्हर-ऍस्पेन-ग्रॅण्ड जन्क्शन-डेन्व्हर-फोर्ट कॉलिन्स-डेन्व्हर-फोर्ट कॉलिन्स-डेन्व्हर असा १००० मैलांचा प्रवास ४ दिवसात केला (तुम्हा दोन नक्षत्रांना घेऊन) ! त्यामुळे निवांतपणा जरा कमी मिळाला. त्यामुळे त्याचवेळी ठरवले होते की पुढची सहल शांतपणे करायची. एकाच ठिकाणी जायचे आणि तंबु ठोकुन तिथेच रहायचे.

--बाल-सलोनी
(Sunday, December 27, 2009)
----------------------------------

                   (साभार आणि सौजन्य-बाल-सलोनी.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                  ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.09.2022-शुक्रवार.