डोळ्यांच्या कॅमेऱ्यातून..-कोसलाचे दिवस-क्रमांक-2-ब

Started by Atul Kaviraje, September 17, 2022, 10:15:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "डोळ्यांच्या कॅमेऱ्यातून.."
                                 -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "डोळ्यांच्या कॅमेऱ्यातून.." या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "कोसलाचे दिवस"

                                 कोसलाचे दिवस--क्रमांक-2--
                                -------------------------

     कुठलंही कथानक त्याच वेळेस टिकतं ज्यावेळेस ते पुढं काय? याची उत्सुकता निर्माण करतं. मनी भेटते ती अशाच एका वळणावर. नेमाडे ग्रेट ठरतात ते इथंच. मनीचा मृत्यू हाच कोसलाचा आत्मा आहे. मनी, तिचं जीवन आणि तिचा मृत्यू याचं वर्णन कोसलात ज्या पद्धतीनं आलंय एवढा जिवंत मृत्यू ना वाचण्यात आलाय ना पाहण्यात, ना ऐकण्यात. मनी गेल्यानंतर नेमाडेंनी एक वाक्य टाकलंय ते वाक्य अल्बर्ट कामुच्या outsider मधल्या mother died today. or, may be yesterday. i can't be sure. या वाक्याएवढंच किंवा त्यापेक्षाही जास्त चिरंतन आहे. कोसलातलं ते वाक्य असं. मनी गेली आणि तिच्यासोबत तिचं इवलसं गर्भाशयही. तिनं खानेसुमारीची मोठीच ओळ वाचवली. या प्रसंगानंतर कोसला जी उंची गाठते ती शेवटपर्यंत सोडत नाही. पुढच्या प्रत्येक प्रसंगात कोसलात घडतो तो फक्त साक्षात्कार. कोसलाची जशी सुरुवात आहे तसाच क्लास क्लायमॅक्स आहे आणि शेवटही. पण कुठेही कोसला नाटकी नाही ना जाणीवपूर्वक पेरलेला शेवट नाही. गिरीधर जो कोसलातून गायब झालाय त्याचा शोध मी अजुनही का घेतोय? मनीचा मृत्यू माझ्या अंगावर शहारे का आणतो? रात्री अपरात्री ती माझा पिच्छा का पुरवते?. गिरीधरसारखी माणसं आपल्याही आयुष्यात आहेत. जी चूक पांडुरंगनं केली ती आपल्याही हातून कधी घडेल याची भीती का वाटत राहते? पांडुरंगला न दिसलेला दिवा आपल्याला दिसेलच याची काय खात्री? पांडुरंग म्हणतो तसं आपापली वर्षे वगैरे उरलेलीच असतात, वाया वगैरे गेली हे साफ खोटं. तर मग आपला मृत्यू काय आहे? मला वाटतं मी थांबलेलं बरं. कोसला तुम्ही वाचलेली बरी. जगलेली बरी.

--AUTHOR UNKNOWN
-------------------------
(SUNDAY, JUNE 27, 2010)
-----------------------------

                (साभार आणि सौजन्य-माणिक शोभी.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                              (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
               -----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.09.2022-शनिवार.