लहरीवर…विचारांच्या-मीडिया बाजार--क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 17, 2022, 10:28:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "लहरीवर...विचारांच्या"
                                --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री संदीप रामदासी यांच्या "लहरीवर...विचारांच्या" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "मीडिया बाजार"
                                                     
                                   मीडिया बाजार--क्रमांक-१--
                                  -----------------------

     दूरदर्शनवर रामायण अवतरलं त्यावेळी देशभरात रस्ते ओस पडायचे. रामानं रावणाचा वध केला त्या रविवारी कित्येत घरात टीव्हीवर फुलं उधळली गेली. तोच प्रकार कमीअधिक प्रमाणात महाभारताच्या वेळी. शक्तिमान सुरु होतं तेव्हा स्वत:चा एक हात छातीवर आणि एक हात वर करत स्वत:भोवती गरगर फिरत वरुन खाली झोकून देणाऱ्या कितीतरी लेकरांनी हात पाय मोडून घेतले, काहींना जीवही गमवावा लागला. कौन बनेगा करोडपतीच्या पहिल्या सीझनच्यावेळी स्पर्धकांसोबत रडणारे आणि नवाथे करोडपती बनला तेव्हा ते कोटभर रुपये आपल्याच घरात येणार असा आनंद झालेले कमी नव्हते. टेलिव्हिजनची ताकद, माध्यमाचा प्रभाव अधोरेखित करणाऱ्या घटनांची ती नांदी होती.

     बातम्यांची मक्तेदारी तेव्हा सरकारी दूरदर्शनकडेच होती. लोकांच्या गरजांचा विचार करायचा नाही आणि काळासोबत चालायचं नाही हा अलिखित सरकारी नियम दूरदर्शननेही इमानेइतबारे पाळला. त्यामुळेच, गरज होती म्हणा किंवा एखादा नवा पर्याय मिळाला की लोक स्वीकारतात म्हणा, खाजगी न्यूज चॅनल्स कधी आले, कधी वाढले, कधी पुढं गेले हे कळलंही नाही.

     आज जगात सर्वात जास्त न्यूज चॅनल्स आपल्या देशात आहेत. परखड पत्रकारितेची परंपरा अगदी ब्रिटिशकाळापासूनच आपल्याला लाभलीय असं म्हणतात. काही मोजक्या वृत्तपत्रांनी किंवा वृत्तपत्रातील काही मोजक्यांनी ती टिकवायची धडपड सुरु ठेवलीय. टिव्ही चॅनल्सकडूनही जनसामान्यांनी तशीच अपेक्षा करणं ओघानं आलंच. आजचं देशातलं चित्र पाहता या अपेक्षा पूर्ण करण्यात टीव्ही मीडियाला किती यश आलंय हा वादाचा मुद्दा आहे.

     लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, देशातलं वातावरण तापू लागलंय. छोट्या पडद्यावर रोज नवनवे गौप्यस्फोट सुरुच आहेत. बाईट वर बाईट देणं आणि घेणं सुरु आहे. येत्या काळात न्यूज चॅनल्सची भूमिका महत्वाची ठरणार आहे.  त्यामुळेच छोट्या पडद्याकडे राजकारण्यांचं बारीक लक्ष राहणार आहे.

     गेली काही वर्ष राज्य आणि देशात विरोधी पक्ष संभ्रमित अवस्थेत असताना, ती भूमिका देशातला मीडिया पार पाडतोय असा सर्वसामान्य जनतेचा समज होता. तो भ्रम फार काळ टिकणार नव्हताच. 'अशोक पर्व'ने भ्रमाच्या भोपळ्याला पहिला तडा दिला आणि जिंदाल – झी न्यूज प्रकरणाने आणखी एक घाव बसला आहे. प्रकरण वरवर दिसतं तितकं सोपं नक्कीच नाहीय.

     टुजी, कोळसाप्रकरणी मनमोहनसिंह सरकारची लाज जाणं सुरुच होतं. त्यातच वाड्रा डिएलएफ प्रकरणामुळे बोफोर्सनंतर पहिल्यांदाच गांधी घराण्यावर थेट आरोप झाले.  या वातावरणाचा फायदा मुख्य विरोधी पक्ष भाजपला होणार हे स्पष्ट होतं पण नितीन गडकरींच्या रुपात सत्ताधाऱ्यांनी नवा बंगारु लक्ष्मण मिळवला. आम्ही चांगले नसलोत तरी तुमच्यासमोर पर्यायही चांगला नाही हा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यात काँग्रेसप्रणित सत्ताधारी यशस्वी झाले. सत्तेतला मुख्य पक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष या दोघांची विश्वासार्हता धोक्यात आल्यावर, न्यूज चॅनल्सची विश्वासार्हता टिकून राहणं त्यांना कसे परवडेल?

     प्रसिद्धी मिळतेय म्हणून असेल किंवा उगाच पंगा घेतला तर आपल्या 'कर्तृत्वाची' कुंडली बाहेर येईल म्हणून असेल राजकारणी मंडळी मीडियाला कुरवाळत राहायचे. न्यूज चॅनेलचा प्रभाव माहित असल्यानं फार फार तर मीडिया से न दोस्ती अच्छी होती है न दुश्मनी हे तत्व ते पाळायचे पण आता ते बाजूला ठेवून न्यूज चॅनल्सना थेट अंगावर घ्यायला सुरुवात केलीय.

     राजकारणी आणि मीडिया यांचा मधुचंद्र संपू लागला आहे. त्याला अर्थातच न्यूज चॅनल्सही तितकेच जबाबदार आहेत. अंजली दमानियापासून अरविंद केजरीवालपर्यंत कोणीही पत्रकार परिषद घ्यायची, फक्त आरोप करायचे आणि चोवीस तास चॅनल चालवण्याच्या अपरिहार्यतेमुळे त्याची शहानिशा न करता न्यूज चॅनल्सनं त्याची ब्रेकिंग न्यूज करत राहायची, लाईव्हची ही घाई पत्रकारितेला परवडणारी नाहीय.

--संदीप रामदासी
(05/11/2012)
----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदीप रामदासी.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                    ---------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.09.2022-शनिवार.