माझं विश्व …माझ्या शब्दात !!-महाराष्ट्र मंडळ आणि आमची समिती--क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 18, 2022, 09:27:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              "माझं विश्व ...माझ्या शब्दात !!"
                             ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "माझं विश्व ...माझ्या शब्दात !!" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "महाराष्ट्र मंडळ आणि आमची समिती"

                 महाराष्ट्र मंडळ आणि आमची समिती--क्रमांक-१--
                -----------------------------------------

     माणूस हा जात्याच समूहात रमणारा प्राणी आहे.  त्यामुळेच इतका मोठा समाज तयार झाला.  खरं तर महाराष्ट्रात अशा महाराष्ट्र मंडळाची तितकीशी गरज भासत नाही.  पण तुम्ही जेव्हा भारताबाहेर येता तेव्हा मात्र आपल्या लोकांची कमी फ़ार प्रकर्षाने जाणवते.  घवघवीत व्यावसायिक, आर्थिक यश जरी मिळत असलं तरी आपल्या माणसांच्या प्रेमाची भूक सगळ्यांनाच असते.  आपल्या देशात आपली माणसं आपल्या आजूबाजूलाच असतात पण परदेशात मात्र ती शोधावी लागतात अन एकदा का अशी माणसं मिळाली की तयार होतं महाराष्ट्र मंडळ !

     कुवेतमधे पण असंच सगळ्या मराठी कुवेतकरांची ही भावनिक भूक भागवणारं महाराष्ट्र मंडळ आहे. खूप जिवंत!  छोट्या मुलांपासून तर जेष्ठांपर्यंत सगळ्यांना एकमेकांमधे गुंतवून ठेवणारं ! वर्ष सुरु होतं तिळाच्या पौष्टिकतेनं आणि गुळाच्या गोडव्यानं तर समापन होतं वार्षिक स्नेहसंमेलनानं.  "प्रेम" ह्या गाण्याच्या कार्यक्रमानंतर मंडळाशी जरा जास्तच बांधल्या गेलो आम्ही.  प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावायची आणि जास्तीत जास्त कार्यक्रमात भाग घ्यायचा हे ध्येय.  खूप खूप ओळखी झाल्या.  आपल्या अंगच्या कलागुणांना वाव देणारं व्यासपीठ पुन्हा एकदा मिळालं होतं.

     लेकीची (अदिती) १० वी पार पडली.  १२ वीत तिच्यासोबत आम्ही पण बिझी होणार होतो आणि त्यानंतर तिला जिथे admission मिळणार तिथे कदाचित जावं लागणार म्हणून तिच्या ११वीच्या वर्षीच मंडळाच्या कार्यकारी समितीत पाऊल टाकायचं ठरवलं.

     अतिशय Active members असलेली समिती होती आमची.  प्रत्येक जण उत्साहाने भरलेला आणि कल्पक.  अध्यक्ष होते नवीन कल्पनांना भरपूर प्रोत्साहन देणारे विजय कुळकर्णी, सचिव होत्या उसळत्या उत्साहाच्या हरहुन्नरी अल्काताई केतकर, सांस्कृतिक सचिव होता माझा गुरु आणि संगीतकार विवेक आणि बाकी आम्ही सगळे शिलेदार म्हणजे अतिशय सुरेख पदलालित्य आणि बोटांमधे कला असलेली निलिमा दिवेकर, भक्कम आधारस्तंभ अंजू जवाहिरे, हजरजवाबी पाठीराखा बॅंकर सुजीत रोंघे, गाढे अभ्यासक आणि सामान्य ज्ञानाचा खजिना असलेले कुमठेकर, आमचे गायक ऑडिटर दीपक जुवेकर, वास्तुशास्त्राचे ज्ञाते रमेश गाडगीळ आणि मी 🙂

     आमच्याही समितीचा पहिला कार्यक्रम होता मकरसंक्रांतीचा.  अतिशय दिमाखात सुरवात झाली.  काहीतरी नवीन हवंच हे जणूकाही आमचं ब्रीदवाक्य होतं.  अगदी आमंत्रणापासून नाविन्याचा श्रीगणेशा झाला.  सगळ्या सभासदांना मराठी भाषेतून आमंत्रणं गेलीत. माझे शब्द आणि विवेकचं सुशोभीकरण.  पुढे पुढे तर अगदी नशा चढायला लागली.  तऱ्हेतऱ्हेची कल्पक आमंत्रणं आम्ही बनवली.  मंडळाची वेबसाईट बनवली (विवेकनं).  मग त्याचा साजशृंगार.  मंडळाच्या सभासदांचं लिखाण, त्यांच्या कलाकृती, रेखाटन.... सगळ्याला वाव मिळाला.  प्रत्येक कार्यक्रम झाला की त्याचे फ़ोटो आणि कार्यक्रमाचा वृत्तांत लगेच वेबसाईटवर दिसायला लागला.  सगळ्या सभासदांसोबत छानसा संवाद साधल्या जाऊ लागला.

--AUTHOR UNKNOWN
-------------------------
(कुवेत, ऑगस्ट 23, 2006)
-------------------------

                  (साभार आणि सौजन्य-आशा ब्लॉग.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                               (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2022-रविवार.