माझं विश्व …माझ्या शब्दात !!-महाराष्ट्र मंडळ आणि आमची समिती--क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, September 18, 2022, 09:28:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               "माझं विश्व ...माझ्या शब्दात !!"
                              ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "माझं विश्व ...माझ्या शब्दात !!" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "महाराष्ट्र मंडळ आणि आमची समिती"

                 महाराष्ट्र मंडळ आणि आमची समिती--क्रमांक-2--
                ------------------------------------------

     आम्ही आयोजित केलेली ग्रीन-आयलंडची पिकनिक धमाल उडवून गेली.  होळीच्या जवळपास असल्यामुळे रंग, गाणी, नृत्य, आगळे खेळ...... नुसती धमाल.

     निलिमाच्या मनात एक सुरेख कल्पना साकारायला लागली होती.  तिची गुणी लेक लंडनहून सुट्टी घालवायला इथे आली होती.  तिच्या आणि रेवती कढेच्या साथीनं एक ७ दिवसांचं workshop तिनं घेतलं.  प्रत्येक दिवस काहीतरी नवीन.  त्यांच्यासोबतच नेरुरकर, मिलिंद कुळकर्णी, विवेक ह्यांनीसुद्धा या छोट्या शिबिरार्थींना मोलाचं मार्गदर्शन केलं.  हस्तकला, नृत्य, गाणं, चित्रकला, नाट्यशात्र अशा विविध कलांचा आविष्कार ह्या मुलांकडून घडवून आणला.

     होता होता १ मे.......महाराष्ट्र दिन जवळ आला.  आपल्या सगळ्या मराठी भाषिकांचा मानाचा दिवस.  ह्यादिवशी काहीतरी विशेष करायचं ठरलं.  आम्ही आमंत्रणं खास खलित्याच्या स्वरुपात आणि भाषेत बनवली.  संपूर्ण सोहळा फ़क्त मुलांकडूनच करुन घ्यायचा असं ठरलं.  सगळी मुलं अतिशय उत्साहात होती. त्यांना पण आपलं मराठीपण मिरवून घ्यायचं होतं.  कार्यक्रमाचं निवेदन मी मुलांकडूनच बसवून घेतलं.  एक मावळा आणि एक मराठमोळी मुलगी ह्यांच्या हसतखेळत चाललेल्या गप्पांमधून कार्यक्रम खुलत गेला.  आजच्या पिढीला आपल्या परंपरेची जी काही ओळख आहे ती वाढावी आणि आपण जे मराठीपण अभिमानानं मिरवतो ते मराठीपण त्यांनीही जपावं म्हणून आम्ही केलेली धडपड अगदी सार्थकी लागली

     ह्यानंतरचा कार्यक्रम होता एक Study Tour.  सगळ्या लहान मुलांना आम्ही नेलं KDD ची Icecream आणि Juice factory  बघायला.  ह्या टूर मधे लक्ष्याच्या 'टूरटूर'इतकीच धमाल आली 🙂

     आता ग्रीष्माचा उष्मा जाणवायला लागला तसे सगळ्यांना सुट्टय़ांचे वेध लागले.  इथे जून पासून तर ऑगस्ट पर्यंत शाळॆला सुट्ट्या असतात.  तेव्हा जवळपास अर्ध्यापेक्षाही जास्त कुवेत रिकामं होतं.  अहो ५०-५२ अंश तापमान असताना भारतातला पावसाळा कोण सोडणार?  पण काही कारणाने इथे राहणारी पण बरीच मंडळी असतात.  अशातच डॉ.वसुधा गोखले हिने 'रेकी' ह्या विषयावर अतिशय सुरेख व्याख्यान दिलं.  मी स्वत: वसुधाची खूप मोठी चाहती आहे.  अष्टपैलू व्यक्तिमत्व, कायम हसरी, दुसऱ्याना मदत करायला अगदी out of way  जाणारी, अतिशय सुरेख गाणारी, छानसं लिहिणारी..... एक गोड व्यक्ती ! तर हिचं हे व्याख्यान होतं. सगळ्या उपस्थितांनी ह्या Audio-visual व्याख्यानाचा लाभ घेतला.

     आता वाट होती गणरायाच्या आगमनाची.  अल्काताईंच्या घरी हा कार्यक्रम झाला. अल्काताई म्हणजे उत्साहाचं कारंजं ! त्यांनी गणेशाची सुरेख मूर्ती घरीच तयार केली.  आरास तर लाजवाब. रेशमी वस्त्रप्रवरणात, मोदकांच्या गोडव्यात आणि ढोलकीच्या थापांवरच्या आरतीत अगदी थाटात झाला उत्सव.

--AUTHOR UNKNOWN
------------------------
(कुवेत, ऑगस्ट 23, 2006)
-------------------------

                  (साभार आणि सौजन्य-आशा ब्लॉग.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2022-रविवार.