नंदिनी-विठ्ठल तो आला आला !!--क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 18, 2022, 09:33:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "नंदिनी"
                                       --------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्रीमती नंदिनी देसाई यांच्या "नंदिनी" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "विठ्ठल तो आला आला !!"

                        विठ्ठल तो आला आला !!--क्रमांक-१--
                       --------------------------------

     पंढरपूरवरून तसं माझं कायमचं येणं जाणं. आईचं माहेर बार्शी त्यामुळे कोल्हापूर बार्शी रस्त्याला पंढरपूर लागायचंच. लहानपणी एस्टीतून जाताना आई विठोबाला नमस्कार कर असं सांगायची. पण हा विठोबा नक्की कुठल्या देवळात आहे हे माहीत नसल्यामुळे, मी दिसला कळस की कर नमस्कार असं करायची. नंतर नंतर बार्शीला जाणं कमी होत गेलं. स्वत्:च्या व्यापात दडत गेल्यावर कुठलं आजोळ नी काय... बार्शीतल्या रणरणत्या उन्हापेक्षा सुट्टीतली नाट्य शिबिरं महत्वाची वाटायला लागली. थोडक्यात म्हणजे कितीहीवेळा पंढरपूरवरून गेलं तरी विठोबा काही मला भेटला नव्हता. योग असावा लागतो दर्शनाचासुद्धा.....

     एकदा मी कॉलेजमधे असताना पप्पाचा फोन आला, ताबडतोब निघ, आपल्याला बार्शीला जायचे आहे. शेताच्या वाटणीचं काहीतरी काम होतं आणि मामाला अचानक जहाजावर जॉईन व्हायची ऑर्डर आल्यामुळे ते ताबडतोब संपवायचं होतं. तिथे आईने हजर होणं जरूरी होतं. त्यामुळे आम्ही सहकुटुंब सहपरिवार (हो, आमच्या आईला escort लागतो) बार्शीला गाडी घेऊन निघालो.
"मला बार्शीला जायचय." मी वर्गातल्या मुलीना सांगितलं.
"हे कुठे आहे?"
अं.... पंढरपूरच्या पुढे दोन तास...
"ए.. म्हणजे तू विठ्ठलाच्या देवळात जाशीलच ना.. प्रसाद घेऊन ये."
"अगं मला जायला जमेल की नाही माहीत नाही.."
"अगं असं काय करतेस? देवळात नक्की जाऊन ये आणि प्रसाद घेऊनच ये.."
"बघते..."
"बघते... नाही प्रॉमिस कर."
विठ्ठलाच्या प्रसादाला प्रॉमिस??
मी केलं.

     दुपारचे तीन वाजले होते. बार्शीवरून आम्ही जऊन वगैरे निघालो होतो. पंढरपूर हायवेचा बायपास नुकताच झाला होता. त्यामुळे गावातुन गाडी न्यायचा प्रश्न नव्हता. पण बार्शी सोडल्यापासून मी भुण भुण लावली होती.
"पप्पा प्लीज, मी इतक्या दिवसात एकदाही ते देऊळ पाहिलं नाही. आई कित्येकदा जाऊन आलीये. तुम्ही गेलाय. मीच नाही गेले. मला काहीतरी पुण्य नको का?"
"मुली, हे तुझं वय पुण्य करायचं नाही. म्हातारी झालीस की हवं तितकं पुण्य कर पण त्या आधी एखाद्या चांगल्या डीटर्जंटने पापं धुवून टाक. त्यात खूप वेळ जाईल तुझा..." माझा लहान भाऊ... जर हा माझ्यापेक्षा सात वर्षानी लहान नसता आणि जन्मल्या जन्मल्या बार्बी बाहुल्यासारखा दिसत नसता तर नक्की त्याला मारलं असतं..
"पप्पा प्लीज ना.. पाचच मिनिटं. "
"हे बघ, ते देवळात खूप गर्दी असते. वारकरी लोकाची रांग असते. वेळ जाईल. रात्र व्हायच्या आत आपल्याला रत्नागिरी गाठायची आहे." पप्पा.
"कुणी वाट पहात नाही तिथे. एवढं मुलगी म्हणते तर घेऊउ या ना दर्शन.."
आई..
"वेळ नाही."
"ठीक आहे, दर्शन नको, पण प्रसाद घेऊन जाऊ ना.. मी वर्गात सांगेन की मी पंढरपूरवरून प्रसाद आणला. मी मैत्रीणीना प्रॉमिस केलय... प्लीज.."
"घाल रे गावातून गाडी.." पप्पा लेकीवर दया दाखवत ड्रायव्हरला म्हणाले.

     माझे पप्पा सर्वीस इंजीनीअर म्हणून काम करत असताना बर्‍याचदा पंढरपूरला येऊन गेले होते. त्यामुळे मला सगळे रस्ते माहीत आहेत. हा त्याच्या घोषा.. वीस वर्षात गावं बदलतात हे मानायला तयारच नाही.

--नंदिनी देसाई
(TUESDAY, 25 DECEMBER 2012)
------------------------------------

                  (साभार आणि सौजन्य-नंदिनी देसाई.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 -----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2022-रविवार.