नंदिनी-विठ्ठल तो आला आला !!--क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 18, 2022, 09:36:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "नंदिनी"
                                       --------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्रीमती नंदिनी देसाई यांच्या "नंदिनी" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "विठ्ठल तो आला आला !!"

                        विठ्ठल तो आला आला !!--क्रमांक-3--
                       --------------------------------

     किती लोभसवाणं हे श्रद्धेचं रूप. म्हटली तर भाकडकथा, आणि म्हटली तर जगण्याची शिदोरी. ही श्रद्धा माझ्याजवळ का नाही? का माझ्या जगण्याचे फ़ॉर्मुले इतके सोपे नाहीत. साक्षात देवाला थांबायला लावणारा तो आणि घड्याळाच्या सेकंदकाट्यावर धावणारी मी .

     रात्री दोन तीन वाजेपर्यंत डीस्कोत अंग घुसळणारे आम्ही, आम्हाला टिळा लावणारे, वाळवंटी नाव्हणारे वारकरी गावंढळ वाटतात. मागासलेले वाटतात. पण आम्ही कुठले पुढारलेले? आमच्याकडे याच्या डोळ्यात असणारं समाधान का नाही? कसलीतरी एक प्रचंड खळबळ घेऊन आम्ही जगत आहोत. जणू प्रत्येकाच्या छातीत एक ज्वालामुखी. आमच्या मनात हे शांततेचं चांदणं का नाही? कशासाठी जगतोय आम्ही? काय अर्थ आहे या अस्तित्वाला? मला देव तेव्हा आठवतो, जेव्हा मला गरज असते. जेव्हा माझी गरज सरते तेव्हा मी देवाला विसरते.. तो ठेवतो का मला लक्षात? इत्क्या माणसाना त्याने जगायची दृष्टी दिली मला का नाही दिली? कारण ती माझी लायकी नाही म्हणून? इतक्या जणाना सांभाळणारा तो. कदाचित विसरला असेल मला.. एवढ्या मोठ्या पसार्‍यात मी कोण कुठली? गर्दी कमी असल्यामुळे आमचा नंबर तसा पटकन आला. त्या अंधार्‍या गर्भगृहात शिरल्यामुळे मला समोरचे काहीच दिसेना. त्यात बडव्याने हातातले हार काढून घेतले. आणि माझं डोकं त्या विठ्ठलाच्या चरणाला टेकवलं.

     मान वर करून पाहिलं तर तो माझ्याकदे बघून गालातल्या गालात हसत होता. जणू तो आणि मी लहानपणचे मित्र होतो. त्याला माहीत होतं की मी येणार आहे. तो मला ओळखत होता. जरी मी त्याला कधीच ओळखलं नसलं तरी. मी त्याच्याकडे नुसती बघत होते. सगळं जग जणू हरवून गेलं होतं. कोण होते मी? काय माझं नाव? कशाला आले होते इथे? काहीच आठवत नाहीये. पण एक गोष्ट माहीत आहे, तो माझ्यासाठी आहे. तो जनाबाईसाठी होता, तुकारामासाठी होता. नामासाठी होता. प्रत्येकासाठी होता. माझ्यासाठीपण. मी काहीच नव्हते. पण त्याने मला अस्तित्व दिलय. त्याने मला हे जीवन दिलय. "मी" त्याची जबाबदारी आहे. तो मला सांभाळेल. कधीही कुठल्याही प्रसंगात. सुखात तो माझ्याबरोबर हसतो. दु:खात मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडते. तो धीर द्यायला कायम असतो. पण मी त्याला कधीच ओळखत नाही. कारण मी माझ्या डोळ्यावरचा माझ्या अहंकाराचा चष्मा कधीच काढत नाही.

     तो महार बनून येतो, त्याला लाज वाटत नाही. तो जात्यावर दळण दलतो. त्याचे हात दुखत नाही.मला माझी चूक कबूल करायला लाज वाटते. दुसर्‍यासाठी काही करताना मला त्रास होतो. आणि तरीही तो माझ्यासाठी आहे. तो खूप मोठा आहे. मी खूप क्षुद्र. तरीही त्याचं माझ्याकडे लक्ष आहे. एखादं जुनं आठवणीतलं माणूस पाहिल्यावर होतो तसा त्याला आनंद झालाय. त्याच्या चेहर्‍यावर दिसतोय.

     समोरचा तो मंदपणे हसणारा विठ्ठल आणि त्याच्यासमोर उभी असलेली मी. काही क्षणापूर्वी प्रश्नानी छळलं होतं. आता उत्तरे मिळतील असं वाटलं तर प्रश्नच गायब झाले.
"चला पुढे व्हा... पाठचे ओरडतायत." बडव्याच्या या उद्गारानी मी जागी झाली. पण मी झोपेत नव्हते. कुठे होते मी इतका वेळ? किती वेळ झाला मला इथे येऊन? बाजूला आई पप्पा योगेश सर्व होते. मग मी कुठे गेले होते? पाठून येणार्‍या माणसामुळे मी पुढे निघाले तरीही पाठी वळून त्याच्याकडे बघण्याचा मोह मला आवरला नाही. "परत भेटशीलच. अशीच एखाद्या रस्त्यावर. अशीच हरवलेली. मी रस्ता दाखवेनच, माझ्या पाठून येण्याचा" तो हलकेच बोलला.

     आज मी त्याच्या येण्याची वाट बघतेय. रस्तातर केव्हाच चुकलेली आहे.

==समाप्त==

--नंदिनी देसाई
(TUESDAY, 25 DECEMBER 2012)
------------------------------------

                  (साभार आणि सौजन्य-नंदिनी देसाई.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                 -----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2022-रविवार.