पालवी-स्त्रीला हवे असे स्वातंत्र्य--क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 18, 2022, 09:40:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         "पालवी"
                                        --------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी यांच्या "पालवी" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "स्त्रीला हवे असे स्वातंत्र्य"

                            स्त्रीला हवे असे स्वातंत्र्य--क्रमांक-१--
                           -------------------------------

"पिता रक्षति कौमार्ये,  भर्ता रक्षति यौवने
पुत्रश्च स्थाविरे भावे, न स्त्री स्वातंत्र्य मर्हती !"

     कौमार्याचे रक्षण पिता करतो, तारुण्याचे रक्षण पती करतो, जेंव्हा मुलं मोठी होतात, तेंव्हा स्त्री त्यांच्या सरंक्षणावर अवलंबून असते. स्त्री स्वतंत्र नाहीच. मनुस्मृती मध्ये मनुने एवढ्या वर्षापूर्वी लिहुन ठेवलेले हे वचन आज या घडीला ही तितकेच सत्य आहे.

     स्त्रीला नेहमीच बंधनात रहावे लागते.ती सतत कुणाच्या ना कुणाच्या हातातील खेळणं बनत आहे. बंधनापासून किंवा पाशा पासून मुक्ती अशा अर्थाचा "स्वातंत्र्य" हा शब्द. अर्थातच स्त्री स्वातंत्र्य म्हणजे स्त्रियांची बंधनातून मुक्तता. खरंतर आज "स्त्री स्वातंत्र्य" हे नाणे वापरुन वापरुन गुळगुळीत झाले आहे. जो तो उठतो आणि स्त्री स्वातंत्र्यावर बोलतो. विचार केला तर असा प्रश्न पडतो, कि स्त्रीला स्वातंत्र्य हवे ते कुणा पासून?पती, पिता, भाऊ कि मुलापासून? कि समाजा पासून? प्रथम स्त्रीने आपल्या स्वातंत्र्याच्या अपेक्षा निश्चित केल्या पाहिजेत.कशा प्रकारचे स्वातंत्र्य?—आर्थिक,सामाजिक, कि बोलण्याचे,विचार करण्याचे, कि फ़िरण्याचे स्वातंत्र्य हवे? ५० वर्षापूर्वी हा विषय एवढा चिघळला गेला नव्हता.म्हणजे त्या काळी स्त्री ही स्वतंत्र होती का?सुरक्षित होती का? हा प्रश्न पडल्या वाचुन रहात नाही. परंतु सहनशील स्त्री ,व पती हा परमेश्वर मानणारी त्या काळच्या स्त्रीचे रुप अधिक वेगळे काय असणार?

     आज २१व्या शतकात सुद्धा स्त्रीला पुरुषांच्या आधाराची गरज असावी –- या सारखी शरमेची गोष्ट ती काय? खरंतर आज या घडीला स्त्री आणि पुरुष ही संसार रथाची दोन चाके आहेत. रथ चालत असताना दोन्ही चाके बरोबरीने चालली, तरच रथाला अर्थ येतो.परंतु या पुरुष प्रधान समाजात स्त्रीला नेहमी दुय्यम स्थान दिले गेल्याने ब-याचदा स्त्रीची गळचेपी झालेली दिसते. आज काही अंशी जरी स्त्रीला स्वातंत्र्य मिळालेले असले, तरी त्यावर अंकुश घरातल्या पुरुषांचाच राहतो. जसे—I am the boss in my house, & husband permit's me to say so! मग तो प्रेमाचा असेल नाहीतर सक्तीचा असेल. स्त्री ही सतत कुणाच्या न कुणाच्या तरी दबावा खाली वावरत असते. आणि स्त्रीनेच मुळी ते न कळत स्विकारलेले आहे.तिच्या ते अंगवळणी पडले आहे. पूर्वी राजेशाही काळात स्त्रियांना पुरुषांइतकेच अधिकार होते. त्या समाज व्यवस्थेत ,राजकारणात जातीने लक्ष देत. याची काही उदाहरणे ही आहेत. पूर्वी सुद्धा उपनिषद काळात मैत्रेयी, गार्गी ह्या प्रात:स्मरणीय स्त्रियांना केवढे महत्व प्राप्त झाले होते.त्या काळी सम्राट जनकाच्या सभेत याज्ञवल्क्य ऋषींच्या ज्ञानाची परिक्षा चालली असताना हजर वेदोज्ञ ब्राह्मणांच्या सभेत गार्गीने आत्मप्रयत्नपूर्वक याज्ञवल्क्यंनाच ब्रह्मचर्यासाठी आव्हान दिले होते. तिचे कुशल धनुर्धारीच्या भात्यातील बाणांसारखे ते प्रश्न ऎकून सभेतल्या कुणाला  ती स्त्री आहे कि पुरुष आहे याचे भान होते? आपल्या जुन्या गुरुकुलांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी दोघे ही शिकत असत. तेवढी परिपूर्ण समानता अन्यत्र कोठे पहावयास मिळते? पूर्वी जे अधिकार होते ते पुढे का राहिले नाहीत? मधल्या काळात पुरुषांचे वर्चस्व  वाढल्याने त्यांनी धर्माच्या नावाखाली स्त्रियांना दुय्यम स्थान दिले. ते टिकवण्यासाठी त्यांनी समाजिक, राजकिय, धार्मिक, सांस्कृतिक प्रक्रिया देखिल केल्या. शिक्षणापासून वंचित  केले. बाल विवाह ,सतीची चाल, विधवांचे केशवपन, जरठ कुमारी विवाह, अशा अनिष्ठ प्रथा त्यावेळी पाडून पुरुष संस्कृतीने मधल्या काळात स्त्रीवर अनेक अत्याचार केले. परंतु नंतर समाज सुधारणेच्या कार्यक्रमातुन राजाराम मोहन रॉय, महात्मा फ़ुले, महर्षी अण्णासाहेब कर्वे, पंडीता रमाबाई या समाज सुधारकांनी पुढाकार घेतल्याने आज आपल्याला स्त्रीचे हे नवीन, सुधारीत रुप दिसते आहे. आज तिच्यावर धर्म ,लिंग जात, वंश अशा कोणत्याही प्रकारे पक्षपात होवु नये यासाठी राज्य घटनेत मुलभूत अधिकार ही देण्यात आलेले आहेत. प्रत्येक स्त्रीला कायद्याची माहिती मात्र हवी. आज प्रत्येक स्त्रीने आपण एक समाजातला दबलेला, शोषित , किंवा असहाय्य घटक म्हणुन स्वत:कडे न बघता , स्वतंत्र देशाची मी एक नागरीक आहे व मला या देशात विचाराचे, स्वतंत्र निर्णयाचे स्वातंत्र्य आहे ,हे समजुन घ्यायला हवे.

--सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी
जयसिंगपूर.
(July 7, 2010)
--------------------------

                       (साभार आणि सौजन्य-पालवी.वर्डप्रेस.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                      ---------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2022-रविवार.