दैनंदिनी-दैनंदिनी – ३० जुलै २००९--क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 19, 2022, 11:11:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "दैनंदिनी"
                                      ----------
मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, श्री निलेश सकपाळ यांच्या "दैनंदिनी" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "दैनंदिनी – ३० जुलै २००९"

                          दैनंदिनी – ३० जुलै २००९--क्रमांक-3--
                         ---------------------------------

     गरजा वाढविणारेही आपण अन निरर्थक चोचल्यांच्या मागे धावणारेही आपणच.. ज्या देशात अजुनही दोन वेळचे जेवण मिळत नाही तिथे घरात मोबाईल पोहचविणारेही आपणच, गावामध्ये रस्ता किंवा माध्यमिक शाळा पोहचविण्याआधी कंम्पुटर पोहचविणारेही आपणच, तंत्रज्ञानाच्या विकासाची दिशा ही विकसित देशांना समांतर धावते आपल्याला देशाच्या विकासाला नाही, त्या तंत्रज्ञानाची दिशा त्या विकसित देशांना पुरक आहे पण आपल्याला आहे का? हा विचार न करणे म्हणजे पुन्हा वीज नसलेल्या गावामध्ये एखाद्या योजनेअंतर्गत वीजेचे खांब बसविण्यासारखेच! भारत म्हणजे चार शहरांचा नाही तर तो चार हजार गावांचा आहे हे आपण विसरून गेलो आहोत.. चार-सहा शहरांच्या विकासावर भारताचा अमेरीका नाही होणार तर शिस्तबद्ध विकासाची जोपर्यंत पायाभरणी होत नाही, खेड्यातील माणुसही या विकासात सहभागी होत नाही तोपर्यंत सारे प्रयत्न निरर्थक आहेत, तंत्रज्ञान विकसित करताना फक्त शहरी लोकांचा विचार करून विकसित होते, पण ते एखाद्या खेडुताच्या दृष्टिकोनातून कधीच विकसित होत नाही हे आमचे दुर्दैव! दोन चार पिढ्यांआधी आपणही खेडवळ होतो हे आपण विसरून गेलो आहोत, समोरचा खेडवळ माणुस वर्षानुवर्षे तसाच आहे अन तो तसाच वागतो आहे, तरी आपण त्याला हसतो, पण खरेतर मित्रहो आपण बदललो आहोत हे सत्य आहे!! त्याला हसताना दात आपले दिसत असतात.. आपण आपल्यावर हसत असतो.... अन तो मुकपणे भारत खांद्यावर घेऊन समोरुन रस्त्यावरील धुळीमध्ये खर्‍या भारताचे ठसे उमटवत चालत राहतो.........

     क्रांती उद्वेगातून होते, समाजातील विषमतेचा लाव्हा उफाळला की क्रांती होते, उलथापालथ होते पण त्यासाठीही तो बदलाचा मुद्दा प्रत्येक मनात झिरपावा लागतो.. मित्रहो, कुठेतरी ही विषमता आता दिवसेंदिवस जास्त स्पष्ट होऊ लागली आहे.. प्रत्येक थराला प्रगती प्रवाहामध्ये येण्याची गरज वाटू लागली आहे... पद्धतशीर किंवा साचेबद्ध विकास न झाल्याने एखाद्या झाडावरील पाखरांचा जत्था उडावा अशी परीस्थिती देशात उभी आहे... या खदखदलेल्या असंतोषाला कदचित 'शिकलेल्या' तरुणपिढीची गरज आहे असे वाटून गेले म्हणून हा प्रपंच! कुणाच्या भावना नकळतसुद्धा दुखावल्या असतील तर क्षमस्व! ताशेरे ओढण्यापेक्षाही एखाद्या तरूणाला तरी सुखासीनतेपासून वास्तवतेकडे खेचण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे...

     काल दिवसभरातील हे विचार असेच सहज उतरले गेले आहेत... वेगवेगळ्या भावनांपेक्षाही जेव्हा एकच भावना आपल्या जगण्यावर हावी होते तेव्हा हे विचार एकाच दिशेने अशा पद्धतीने सुरु होतात.. चाबुक फिरवताना चाबकापेक्षा चाबुक फिरवणार्‍याला जास्त विचार करावा लागतो... तसेच आपले आहे... आपण नित्य वावरताना जो आपल्याला चालायला किंवा बोलायला भाग पाडत आहे तो विश्वविधाता नक्कीच सर्व विचारांती असे विचार माझ्या पारड्यात टाकत असेल किंवा असावा.. त्याला अपेक्षित असणार्‍या व त्याच्या संकेतचिन्हांवर समर्पित भावनेने चालत राहणे जास्त योग्य, असेच वाटते व पटतेही !

--निलेश सकपाळ
(३० जुलै २००९)
----------------

                 (साभार आणि सौजन्य-निलेश सकपाळ.वर्डप्रेस.कॉम)
                                (संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
                ----------------------------------------------
                       
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2022-सोमवार.