मला आवडलेला लेख-क्रमांक-2-गर्भधारणेचे बाजारीकरण-1

Started by Atul Kaviraje, November 09, 2022, 09:34:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-2
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "गर्भधारणेचे बाजारीकरण"

                               गर्भधारणेचे बाजारीकरण--1--
                              -------------------------

                     जननक्षमतेचा व्यापार--

     बाजारीकरण म्हटल्यावर आर्थिक घडामोडी, खरेदी - विक्री, कंपन्या-कंपन्यामधील जीवघेणी स्पर्धा, उत्पादनांतील व नफ्यातील चढ - उतार, जाहिरातबाजी, शॉपिंग मॉल्स - शोरूम्स, इत्यादी गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. कामगार, शेतकरी, इत्यादींचे शोषण, भेसळ, साठेबाजी, करचुकवेगिरी, भ्रष्टाचार इत्यादी अपप्रवृत्तीसुद्धा बाजारीकरणात गृहित धरल्या जातात व त्याकडे दुर्लक्षही केले जात असते. परंतु बाजाराचा हा ब्रह्मराक्षस आता आपल्या शारीरिक अवयवांच्या व्यापारीकरणाच्या प्रयत्नात आहे. मूत्रपिंडांचा काळाबाजार तर भरभराटीला आहे. युरोप अमेरिकेतील औषधी कंपन्यांच्या नवीन उत्पादनांच्या चाचणीसाठी गिनी पिग्स म्हणून आपल्या येथील गरीब रुग्णांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. व या गैर व्यवहारात मोठमोठ्या नावाजलेल्या वैद्यकीय तज्ञांचा सहभाग आहे, असे ऐकीवात आहे. आता त्याची नजर शुक्राणू, बीजांड, हार्मोन्स, गर्भ इत्यादी पुनरुत्पादनाशी संबंधित असलेल्या जैविक गोष्टीवर पडत आहे. वंध्यत्वावर मात करण्याची लालूच दाखवत लाखो - करोडोंची आर्थिक उलाढाल या पुनरुत्पादन क्षेत्रात - व विशेषकरून गर्भधारणेच्या व्यवसायात - होत आहे.

     प्रेम, वात्सल्य, ममता, अशा गोष्टींची खरेदी - विक्री होऊ शकत नाही असे अनेकांना वाटते. तसाच काहिसा प्रकार संतती प्राप्तीसंबंधीसुद्धा आहे. कारण पुनरुत्पादन उत्क्रांतीचे बलस्थान आहे व ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कृत्रिम गर्भधारणा निसर्गांच्या विरुद्ध असून त्यात भाग घेणार्‍यांना कमी लेखणारी आहे. खरे पाहता, कृत्रिम गर्भधारणेचा अवलंब असाधारण परिस्थितीत एखादा अपवाद म्हणून व्हावयास हवा होता; परंतु ती आता समाजमान्य नेहमीची पद्धत म्हणून रूढ होत आहे.

     'मुलं कशी जन्माला येतात?' याचे उत्तर सर्वाना माहित असले तरी चारचौघात त्याची वाच्यता करण्याची रीत (आतापर्यंत तरी) नव्हती. हा व्यवहार अत्यंत खाजगी स्वरूपातला, एकांतातला असा होता. शुक्राणू, बीजांड, गर्भनिर्मिती, गर्भधारणा या गोष्टी पुनरुत्पादन प्रक्रियेचे महत्वाचे घटक असून त्यातील प्रत्येकाची वैशिष्ट्यपूर्ण अशी भूमिका असते. परंतु आता त्यांची चारचौघात, चव्हाट्यावर चर्चा केली जात आहे. बिनदिक्कतपणे त्यांचे आर्थिक व्यवहारात रूपांतर होत आहे. मागणी तसा पुरवठा या भांडवली तत्वांची 'री' ओढत पुरेपूर फायदा करून घेतला जात आहे. परंतु यात नेहमीप्रमाणे स्त्रियांचेच शोषण होत आहे हे अजून जनसामान्यांना उमजलेले नाही.

     प्रजननाचा हा व्यापार इतर उत्पादनांच्या तुलनेत फार वेगळ्या स्वरूपाचा आहे. जमीन-जुमला, घर-दार इत्यादीसारख्या व्यवहारात मालकी कुणाची याबद्दल व्यवहार संपल्यानंतर संदिग्धता नसते. सात-बाराच्या उतार्‍यावरून त्याची शहानिशा करून घेण्याची सोय असते. परंतु अपत्य प्राप्तीच्या व्यवहारात अपत्यावरील मालकी हक्क कुणाचा याबद्दल अनेक हेवे दावे आहेत. शुक्राणू एकाकडून, बीजांड दुसर्‍याकडून, गर्भप्रक्रिया क्लिनिक्समध्ये, गर्भवाढ एका तिर्‍हाइताच्या पोटात असा व्यवहार असल्यामुळे मूल कुणाचे ही गोष्ट कायम गुलदस्त्यात राहते. या गोष्टी शेवटपर्यंत अंधारात, अस्पष्ट व संदिग्ध राहतात.

                       अपत्याचा हव्यास--

     नैसर्गिकरित्या अपत्य होऊ शकत नाही व आपला वंश पुढे नेण्यासाठी आपल्या स्वत:चे(च) मूल हवे या हव्यासापोटी ही बाजारव्यवस्था मूळ धरू लागली. आपल्याला मूल व्हावे म्हणून देवधर्म, नवस - उपवास, गंडे - दोरे व इतर अनेक प्रकारचे चित्र विचित्र अघोरी उपाय अपत्यहीन जोडपे करत असते. काही वर्षापूर्वी गुजरातच्या सीमेवरील एका गावात पार्वती माँ नावाची बाई केवळ पोटावर हात सावरून गर्भधारणेचे चमत्कार करत होती. व महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून मिळेल त्या वाहनांनी झुंडीच्या झुंडी तेथे जात होत्या. अजूनही काही अनेक जोडप्या अशा बाई - बाबांच्या नादी लागून हजारो रुपयांचा चुराडा करून घेत आहेत. हे सर्व उपाय संपल्यानंतर खात्रीचा उपाय म्हणून शेवटी आधुनिक तंत्रज्ञानाला शरण जातात. विज्ञान - तंत्रज्ञान अशांसाठी आपली दारे उघडी ठेवत मूल होणारच याची खात्री देते.

(क्रमशः)--

--प्रभाकर नानावटी
(July 19, 2013)
------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.11.2022-बुधवार.