मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-3-गर्भधारणेचे बाजारीकरण-2-अ

Started by Atul Kaviraje, November 10, 2022, 09:23:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                      लेख क्रमांक-3
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "गर्भधारणेचे बाजारीकरण"

                               गर्भधारणेचे बाजारीकरण--2--
                              -------------------------

     मुळातच मूल न होण्याची कारणे अनेक आहेत. त्यातील काही, सामाजिक, काही भावनिक तर काही शारीरिक असतात. उशीरा लग्न करणे - होणे, दीर्घ काळ कुटुंब नियोजन करणे, मादक पदार्थांचे सेवन, अती मद्यपान, इत्यादीमुळेसुद्धा मूल होत नाही. शुक्राणूंची कमतरता, त्यांचा मंद वेग, बीजांडातील दोष, कमकुवत वा सदोष गर्भाशय, मासिक पाळीतील अनियमितता, हार्मोन्सचे असंतुलन, फॅलोपियन ट्यूबमधील दोष इत्यादी अनेक कारणं यामागे असू शकतात.

     लग्न झाल्या झाल्या आपल्याला मूल व्हावे ही सामान्यपणे सर्व दांपत्यांची रास्त अपेक्षा असते. मूल लवकर न झाल्यास जोडप्यांना कुत्सित बोलणी ऐकून घ्यावे लागतात. विशेष करून स्त्रीला याचा फार त्रास होऊ शकतो. स्वत:ची आई, सासू, नणंद, इतर नातेवाईक, मैत्रिणी कुत्सित नजरेने तिच्याकडे पाहू लागतात. या संबंधात तिला आपण फार मोठा गुन्हा केला आहे असे वाटू लागते. पुरुष प्रधान समाजात मूल न होण्यामध्ये पुरुषाचा दोष नाही असेच गृहित धरले जाते व स्त्रीला अपराध्याच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. मग मात्र दांपत्याची ससेहोलपट चालू होते. बाबा, बुवा, ताई, महाराजांपासून सुरुवात होत अघोरी उपचारापर्यंत सर्व उपाय केले जातात. हे सर्व उपाय थकल्यानंतर गरीब कुटुंब असल्यास दैवाला दोष देतात किंवा देवाची अवकृपा म्हणून गप्प बसतात. श्रीमंत मात्र यांत्रिक पुनरुत्पादनाच्या बाजारपेठेला शरण जातात.

                      यांत्रिक पुनरुत्पादन--

     यामध्ये वंध्यत्व दूर करणारे फर्टिलिटी क्लिनिक्स व वंध्यत्वावर तंत्रज्ञान शोधणार्‍या व औषधं तयार करणार्‍या कंपन्या आपापली पोळी भाजून घेत आहेत. याच बरोबर भारतात आयुर्वेदाचे पुरस्कर्तेसुद्धा आपलेही हात धुवून घेत आहेत. मुळातच कृत्रिम गर्भधारणेच्या बाजाराशी सुमारे 90-95 टक्के जनसंख्येचा संबंध येत नाही. उरलेल्यामधील गरीबांची संख्या वगळल्यास एक टक्क्याहून कमी असलेल्या श्रीमंतांसाठीच ही बाजारपेठ आहे. जनसंख्येचा एवढा मोठा हिस्सा गर्भधारणेच्या बाजारापासून दूर असला तरी, पैशाची उलाढाल मात्र मोठ्या प्रमाणात होत आहे. इतर नित्योपयोगी उत्पादनाच्या बाजारात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असूनही या बाजाराची पातळी त्यांना अजून गाठता आली नाही.

     यांत्रिक पुनरूत्पादनाची सुरवात 1978 मध्ये 'टेस्ट ट्यूब' बेबीच्या शोधानंतर झाली. यात प्रामुख्याने कृत्रिम गर्भधारणा (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन IVF) या संकल्पनेचा आधार घेतला. आता हे कृत्रिम पुनरूत्पादन वेगवेगळ्या स्वरूपात ग्राहक जोडप्यांना आकर्षित करत आहे. वंध्यत्वावर मात करणारी औषधं, परक्याचे शुक्राणू, परक्याचे बीजांड, शुक्राणू व बीजांडाचे फॅलोपियन ट्यूबमध्ये कृत्रिम संयोग, टेस्ट ट्यूबमध्ये गर्भनिर्मिती, परक्या बाईच्या (सरोगेट मातेच्या) गर्भाशयात गर्भवाढ, बीजांडाचे प्रशीतन (रेफ्रिजरेशन), गर्भाची अदलाबदल अशा अनेक पध्दतीत गर्भधारणेचा व्यवहार चालतो. गर्भधारण व्यवहारात आता अपत्यपूर्तीची केवळ अपेक्षा नसते, तर जन्माला येऊ घातलेले बाळ सुदृढ, जनुकरोगमुक्त व सर्वगुणसंपन्न असावे अशी पण अपेक्षा केली जाते व बाजारपेठ ही अपेक्षा पण पूर्ण करण्याचा तयारीत आहे.

(क्रमशः)--

--प्रभाकर नानावटी
(July 19, 2013)
-----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.11.2022-गुरुवार.