मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-3-गर्भधारणेचे बाजारीकरण-2-ब

Started by Atul Kaviraje, November 10, 2022, 09:26:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-3
                               ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "गर्भधारणेचे बाजारीकरण"

                               गर्भधारणेचे बाजारीकरण--2--
                              -------------------------

                 त्रासदायक प्रकिया--

     मूल होण्याची भूक शमविण्यासाठी वंध्यत्व दूर करणारे क्लिनिक्स व त्यातील निष्णात डॉक्टर्स व नर्सेसची फौज शहरा-शहरात जय्यत तयारीत आहेत. नैसर्गिकरित्या मूल होत नाही याची खात्री करून घेतल्यानंतर जोडपे गर्भचाचणीसाठी तयार होते. पुरुषांची चाचणी तुलनेने फार सोपी असते. रक्त व वीर्य यांच्या चाचणीनंतर पुरुषाच्या लैगिंकतेचा संपूर्ण आराखडा डॉक्टरसमोर उभा राहतो. स्त्रीची चाचणी मात्र जास्त त्रासदायक व तिच्या आत्मसन्मानाची कदर न करणारी असते. समागमानंतर शुक्राणू तिच्या योनीत प्रवेश करतात की नाही हे सिम्स हुन्हेर चाचणीत कळते. रूबेन्स चाचणीत फॅलोपियन ट्यूबमधील दोष लक्षात येतात. हिस्टेरोस्कोपीत गर्भाशयातील उणीवा कळतात. दांपत्याला अती क्षुल्लक समजणाऱ्या या चाचण्या अतिशय क्लेशकारक व मनस्ताप देणार्‍या आहेत. एवढेच नव्हे तर चाचणीतून कळलेल्या दोषांचे निवारण करणार्‍या सर्व उपाय-उपचारांना स्त्रीलाच सामोरे जावे लागते. त्यामुळे तिला जीव नकोनकोसा वाटू लागतो. कशाला या फंदात पडलो? अशी पश्चात्तापाची वेळ येते; परंतु यासाठीची फी डॉक्टरने अगोदरच वसूल केलेली असल्यामुळे अर्धवट सोडताही येत नाही. काही दोष आढळ्यास जननेंद्रियाची शस्त्रक्रिया, त्यांनतर गर्भधारणेसाठी औषधं, इंजेक्शन्स अशा वैद्यकीय चक्रातून तिला जावे लागते. गर्भाशयाबाहेर बीजांडांची वाढ करण्याचे ठरवल्यास हार्मोन्स नियत्रिंत करण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. या औषधांचे दुष्परिणाम होऊ शकतात. रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. गर्भशयात गर्भ व्यवस्थितपणे स्थिर होईपर्यंत तिला या प्रकियेमधून अनेक वेळा जावे लागते. चाचणीचे सर्व ताण स्त्रीलाच सहन करावे लागतात. अपत्याच्या अदम्य इच्छेपायी ( व सासू सासर्‍यांना, आई-बापाला, नवर्‍याला खूश ठेवण्यासाठी!) स्वत:चा जीव धोक्यात घालत मुकाट्याने या सर्व गोष्टी ती सहन करते. (कित्येक वेळा स्त्रीचा दोष नसतानासुध्दा तिला सर्व चाचणी व गर्भोपचारांचा सामना करावा लागतो; कारण तिचा पुरूष या प्रसंगी योग्य साथ देत नसतो. एका अभ्यासात क्लिनिकमध्ये चाचणी करून घेणार्‍या दापंत्यापैकी वीस टक्के दांपत्य नैसर्गिकरित्या गर्भधारण करण्यास योग्य असतात असे आढळले आहे.)

(क्रमशः)--

--प्रभाकर नानावटी
(July 19, 2013)
-----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.11.2022-गुरुवार.