मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-7-दोन ECO

Started by Atul Kaviraje, November 14, 2022, 09:49:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-7
                               ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "दोन ECO."

                                 दोन ECO.--
                                -----------

     उत्तराखंड येथे घडलेल्या दुर्घटनेच्या संदर्भात दोन ECO मधील तथाकथित वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पहिला ECO म्हणजे ECONOMICS अर्थशास्त्र व दुसरा ECO म्हणजे ECOLOGY पर्यावरणशास्त्र. उत्तराखंडमधे घडलेल्या दुर्घटनेला जबाबदार कोण याची चर्चा दूरदर्शनच्या निरनिराळ्या वाहिन्यांवर होत आहे. वर्तमानपत्रे व इतर छापील माध्यमातून (PRINT MEDIA) रकाने भरलेजात आहेत. कालच एका वाहिनीवर चर्चा करातांना पर्यावरणवादी मेधा पाटकर यांनी नेहमीप्रमाणे विकासावर हल्लाबोल केला. वर्तमानपत्रातील एका लेखात "भौतिक सुखासाठी आपण निसर्गाने दिलेल्या वरदानाचे शापात रुपांतर करत आहोत" असे सांगून अप्रत्यक्षपणे भौतीक सुखासाठी केल्याजाणारया आर्थिक विकासावर हल्ला चढवला गेला.

     अर्धवट ज्ञान हे अज्ञानापेक्षा भयानक असते याची प्रचिती या चर्चा व लेखामधून येते. ज्यांना आर्थिकविकास व पर्यावरणाचा समतोल या संकल्पना समजतात त्यांना माहित असते की आर्थिक विकास हा भौतिक सुखासाठी असतो व तो करतांना पर्यावरणाचा समतोल ढळणार नाही, पर्यावरणाचा नाश होणार नाही याची काळजी घेतली जाते. याचाच अर्थ आर्थिक विकास आणि पर्यावरण यामध्ये कोणताही संघर्ष नाही. नद्या-नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलून, टेकड्या फोडून, जंगलेतोडून केलेले बांधकाम हे विकास नसून सर्वनाश आहे. धरणे बांधण्यात काहीच गैर नाही. उलट वाढत्या लोकसंखेच्या, शेतीच्या पाणी, वीज इत्यादी गरजा भागवण्यासाठी धरणे अत्यंत आवश्यक आहेत. विस्थापितांचे पुनर्वसन, नुकसान झालेल्यांना भरपाई व पर्यावरणाच्या समतोलाची योग्यती काळजी घेऊन धरणे बांधली गेली तर समस्या उदभवणार नाहीत. आर्थिकविकास या संकल्पनेत आपत्कालीन संकटांना तोंड देण्यासाठी कार्यक्षम यंत्रणा उभारणे अभिप्रेत आहे. दोष 'विकास' या संकल्पनेचा नसून ही संकल्पना अर्धवट समजून घेण्यात आहे.

     जी गोष्ट आर्थिक विकासाची तीच अध्यात्माची. अध्यात्मातील आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म, द्वैत, अद्वैत, इत्यादी संकल्पना खरोखरच अवघड असून सामान्य व्यक्तीच्या आकलना पलीकडल्या आहेत. पंचेंद्रिया मार्फत होणारया आकलनापलीकडे सामान्य माणूस सहसा जाऊ शकत नाही. त्याच्यासोईसाठी दगडातील देव, मंदिरे, कर्मकांडे जन्मास आली. निसर्गाचा देव वेगळा, माणसांचा देव वेगळा. निसर्ग नियमावर मात करता येत नाही. निसर्गनियम समजून घेऊन नियमांचे पालन करून भौतिक सुख मिळवता येते. अध्यात्मातील संकल्पना समजून न घेता अध्यात्माच्या नावाखाली निरनिराळ्या मृगजालांच्या मागे धावणे मूर्खपणा आहे. आपण भौतिकवादी असू तर प्रथम आर्थिक विकासाचा खरा अर्थ समजून घातला पाहिजे. विपर्यस्त-विकासाच्या (Pseudo-development) मागे न लागता खऱ्याविकासाचा अर्थ व त्याच्या मर्यादा देखील समजून घेतल्या पाहिजेत.
विद्वानांनी कितीही सांगितले "कुठे शोधिशी रामेश्वर कुठे शोधिशी काशी..." तरी चारधाम यात्रा करण्याची अतृप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलेली असते. संधी मिळताच यात्रा केली जाते. केदारनाथ मंदिरात जाणारा भक्त मंदिराचे स्थापत्यशास्त्र बघण्यास जात नाही. ज्या अप्रतिम स्थापत्य कौशल्यामुळे केदारनाथाचे मंदिर व मूर्ती वाचली त्याचे कौतुक करतांना हजारो लोकांचे प्राण गेले हे विसरता येत नाही. धड अध्यात्म कळत नाही, धड विकास म्हणजे काय ते कळत नाही, पर्यावरण हा वरणाचा एक प्रकार नसून तो निसर्ग आहे, त्याचा समतोल राखला पाहिजे हे देखील कळत नाही. एखाद्या परीक्षार्थीने विषय समजून न घेता डिग्री मिळवावी त्याप्रमाणे सर्व धेडगुजरी, अर्धवटज्ञानी व या परिस्थितीचा फायदा उठवणारे स्वार्थी लोक या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे उत्तराखंड मधील दुर्घटना होय.

--AUTHOR UNKNOWN
-------------------------
(June 23, 2013)
------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.11.2022-सोमवार.