मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-13-शिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ |-अ

Started by Atul Kaviraje, November 20, 2022, 09:48:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-13
                                  --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे-"शिव शिव रे काऊ|हा पिंडाचा घेई खाऊ |"

                 शिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ |--अ--
                ------------------------------------------

     शिव शिव रे काऊ। हा पिंडाचा घेई खाऊ।

     "शहाण्यांचा मूर्खपणा अर्थात् आपले प्रेतसंस्कार" या सुधारकातील लेखात आगरकर म्हणतात, "देशपरत्वे व धर्मपरत्वे उत्तरक्रियांचे अनेक प्रकार आहेत.मेलेल्या माणसाच्या प्रेताचा चटदिशी काहीतरी निकाल लावून मी आपला मोकळा होईन असे कोणालाही म्हणता येत नाही.शवाचा निकाल लावला म्हणजे हे काम आटोपते तर त्याविषयी विशेष चर्चा करण्याची गरज पडती ना.पण या दु:खदायक कामामागे त्याहूनही क्लेशकारक अशा विधींचे दुट्टें प्रत्येक धर्माने लावून दिले आहे. हिंदूंनी हे और्ध्वदेहिक प्रकरण भयप्रद,अमंगळ व कष्टमय केले आहे.गोवर्‍या रचण्यापासून राख होईपर्यंत आणि नंतरसुद्धा विधीच विधी.

     हे भीषण अमंगळ हिंदुधर्मा ! तुझ्या आज्ञेने स्मशानात शेकडो वर्षे आम्ही क्षौरें केली,कणकेचे गोळे करून ते प्रेताच्या अनेक भागांवर ठेवले,गळके मडके डोक्यावर घेऊन प्रदक्षिणा घातल्या,त्याबद्दल तू आम्हांस काय दिलेस?...हिंदूंनो!, तुम्ही इतके गतानुगतिक कशासाठी होऊन बसला आहांत? मनुष्याच्या जन्माला येऊन असे मेषासारखे वर्तन का करता? डोक्यात जो मेंदू आहे त्याची माती का होऊ देता? जिवंत माणसाच्या आहारास लागणारे पदार्थ तुम्ही मेलेल्या माणसास अर्पण करता याचा अर्थ काय? मृत शरीराची राख झाल्यावर त्याच्या नावाने तुम्ही जें अन्न-पाणी देतां त्याचा उपभोग कोण घेतो? आत्म्याला नाक,तोंड,पोट असे अवयव असतात का? असतील तर जिवंतपणा आणि मृतावस्था यांत भेद काय ?

     खुळ्यांनो! असे पोराहून पोर कसे झालांत? गरुडपुराणातील किळसवाण्या गप्पांवर श्रद्धा ठेवणार्‍या मूढांनो,अरबी भाषेतील चमत्कारी कथा खर्‍या मानून त्यांना पुराणांच्या पदवीला चढवाल तर अधिक बरें होईल.अकलेची ऐट मिरविणार्‍या मतिमंदांनो 'अ' व्यक्तीचा 'ब' हा आप्त वारला तर 'अ'ला कोणत्या कारणानें सुतकी,अस्पृश्य मानून त्याला दहा दिवस वाळीत टाकता? 'अ'चा अपराध काय? बाप मेला तर मुलानें क्षौर केलेच पाहिजे असा हट्ट का ? दाढी-मिशा काढून तोंड असोल्या नारळासारखे गुळगुळीत केलें आहे, डोक्यावरील गळक्या मडक्यातून पाण्याची धार अंगावर पडते आहे, कमरेला एक पंचा, बाकी उघडाबंब आहे, असें मुलाचें नटणें मृत बापाच्या आत्म्याला आवडतें हें तुम्हाला कसे कळले ? कुणी सांगितले?" ...( "सुधारका"तील लेखाचा काही भाग)

     .........खरें तर कुणाचा मृत्यू हा दु:खद प्रसंग.पण पिंडदान विधीत जें चालतें तें पाहून हसूं यावे. पिंड ठेवले आहेत .काकस्पर्शासाठी माणसे ताटकळत उभी आहेत.मग मृताचा मुलगा पुढे येऊन हात जोडून म्हणतो," बापू, चिंता करू नका.आत्याला आम्ही अंतर देणार नाही.शेवटपर्यंत सांभाळू."बापूंच्या आत्म्याला हे ऐकू येते.त्याच्या अदृश्य चेहेर्‍यावरील चिंतेचे भाव जाऊन समाधान पसरते.झाडावरील कावळ्याला हा बदल दिसतो.तो खाली येऊन पिंडाला शिवतो.हे सगळे खरे मानण्यात आपले काही चुकते आहे असे कुणाला वाटतच नाही.

--AUTHOR UNKNOWN
------------------------
(May 20, 2013)
-----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.11.2022-रविवार.