मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-19-बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड-2

Started by Atul Kaviraje, November 26, 2022, 09:16:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-19
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड"

                  बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड--क्रमांक-2--
                 --------------------------------------------------

                    आमचा ट्रेक अनुभव :--

     किल्ल्याच्या पायथ्याशी शेत असलेली मंडळी आमच्याबरोबर होतीच. सकाळी न्याहारी करून आणि दुपारचा डबा डोक्यावर घेऊन, हातात सायकल, तर बाई माणसांच्या कडेवर लहान मुले. आता आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य झाला होता. सगळीकडे अतीव शांतता पसरलेली. सहज मागे वळून पहिले तर गाव खूपच लांब राहिले होते. आणि दिसत होत्या त्या फक्त दूरवरच्या डोंगर रांगा.

     उजवीकडून पाहिल्यास ओळीने मांगी-तुंगी, ताम्बोळया, न्हावी रतनगड अशी डोंगर रंग दिसते.

     जरा थोडे उंच आल्यावर आजूबाजूच्या टेकड्या हि छोट्या वाटत होत्या.

     मजल दरमजल करत आम्ही अर्ध्या तासात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. रस्त्यात एक कूपनलिका दिसली. तिथे थोडे पाणी भरून घेतले आणि पुढे निघालो.
आता भूक हि लागली होती म्हणून तिथेच असलेल्या एका डेरेदार झाडाखाली बसून न्याहारी चालू झाली. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बाहेर येऊ लागले. मी मात्र माझा सगळ्यात प्राणप्रिय पदार्थ "शंकरपाळ्या" खाण्यात गुंतलो होतो. चहा बरोबर शंकरपाळ्या म्हणजे खरेच स्वर्ग सुख आहे. अहाहा !!

     न्याहारी आटोपून आता गडाची चढाई चालू झाली. पायथ्याशी एक मस्त घर होते. कितीतरी वर्षांनी मी बैलगाडी पहिली त्यामुळे ती कॅमेरात कैद करून ठेवली.
या घरापासून पुढे २ वाटा फुटतात. एक वाट सरळ तर दुसरी उजवीकडे वळते.
सरळ वाट : सरळ जाणाऱ्या वाटेने २० मिनिटांत मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापाशी पोहचतो. या वाटेने गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ते सर्व ढासळलेल्या अवस्थेत आहेत. वाट साधी व सोपी आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास अडीच तास पुरतो.

     थोडे चालून जाताच किल्ल्याचे प्रथम दर्शन झाले. पश्चिमेकडून चढण असल्याने उन्हाचा त्रास व्हायचा प्रश्नच नव्हता. हिरव्या गार अश्या गर्द वनराईत वसलेला अजस्त्र असा किल्ला. सकाळचे कोवळे ऊन अंगावर झेलत निश्चल असा उभा होता. किल्ल्याच्या खिंडी मधून सूर्याची कोवळी किरणे डोकावत होती. थंडगार अशी हवेची झुळूक. अशा वातावरणात आम्हाला हुरूप चढला. आणि मग चालू झाली स्वप्नवत अश्या किल्ल्याची चढाई.

     मोबाईल मध्ये नकाशा ठेवलाच होता. तो बघत बघत पुढे निघालो. थोडे अंतर गेल्यावर पहिले प्रवेशद्वार लागले आणि रस्ता बरोबर असल्याची खात्री झाली. या किल्ल्यावर गुरांच्या वाट बऱ्याचं असून त्या जास्त ठळक वाटतात त्यामुळे चुकायची शक्यता जास्त आहे.

     किल्ल्याची थोडी पडझड झाली असली तरी नुसत्या प्रवेशद्वारावरून आणि तटबंदी वरून किल्ल्याच्या अभेद्यतेची प्रचीती येते. पहिल्या प्रवेशद्वारासमोरच एका दगडावर मारुती आणि गणपती कोरलेला ( रंगवलेला) दिसला. शेपूट डोक्यावरून गोल असा मारुती हा नाशिक मधल्याच किल्ल्यामध्ये दिसतो. असाच मारुती हातगड आणि तिकोना (पुणे) किल्ल्यावर हि आहे.

     रस्ता बरोबर असल्याची खात्री झाली आणि आमची स्वारी जोषातच पुढे निघाली. अजून एक प्रवेशद्वार भेदून पुढे जर मोकळे पठार लागले. काही क्षणातच डोळ्याचे पारणे फिटेल असे गणेश मंदिर दृष्टीस पडले. खरेतर हे मंदिराचे फोटो बघूनच मुल्हेर चा ट्रेक फिक्स केला होता.

     गर्द अश्या झाडीतून पुढे आल्यावर पाण्यात पडलेले गणेश मंदिराचे प्रतिबिंब मनाला समाधान देऊन गेले. कुठे येऊन काय बघायला मिळेल आणि कशाने आपले मन आणि डोळे सुखावून जातील सांगणे अवघड आहे. मस्त असे वातावरण, छान हवा, योग्य प्रकाश ... काय ... अजून काय वर्णन करू शकणार होतो आम्ही.
पूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघेच होतो. बराच वेळ हाताशी होता. आता निसर्ग आणि आम्ही यामध्ये दुसरा कोणताही अडथळा नव्हता.

--सागर
-------
(May 9, 2013)
----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.11.2022-शनिवार.