दत्त-जयंती-कविता-दत्त माझ्या स्वप्नी आला

Started by Atul Kaviraje, December 07, 2022, 08:59:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.१२.२०२२-बुधवार आहे. आज श्री दत्त-गुरूंची जयंती आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्रीस "दत्त-जयंती" च्या हार्दिक शुभेच्छा. दत्त गुरूंचे नांव घेत आणि मंत्रघोष करीत कविता वाचूया. या कवितेचे शीर्षक आहे- "दत्त माझ्या स्वप्नी आला"

                             "दत्त माझ्या स्वप्नी आला"
                            ----------------------

प्रभाते, दत्त माझ्या स्वप्नी आला
हलकेच स्पर्शुनी मज पुसू लागला
बरेच दिवस भेट नाही तुझी,
भक्ता, विसरलास की काय मला ?

स्वप्न ते सत्य, की मज भास झाला
स्पर्शाने शहारत, तनू रोमांच फुलला
माझ्या दत्ताने मजसाठी कमीपणा घेतला,
गेल्या दोन वारींचा माझा खेप चुकला

गाणगापुरी क्षेत्री त्वरा करुनी
दत्त माउलीचे ते सोज्वळ रूप पाहुनी
चरण कमलांचे निर्मळ तीर्थ पिउनी,
सर्व चुकांचे परिमार्जन केले

संगमरवरी मूर्ती अति प्रसन्न भासली
हसून मजसी ती विचारू लागली
उशीर खरा पण मज नाही विसरलास,
बाळा, मी तर तुझी परीक्षा पहिली

माझे कुल-दैवत पुढे उभे ठाकले
डोळ्यांचे पारणे माझे आजची फिटले
डोळा भरून रूप साठवू लागलो,
भक्ती-भजनात दत्ताच्या तल्लीन झालो

तूच तारणहार, तूच त्राता
तुजविण दुजा देव कुणी नाही आता
तिन्ही देवांचा असे तुझ्यात वास,
तुज माझा जीव, तूच माझा श्वास

हृदयी मूर्तीस जतन करुनी
माघारी मग सदनी परतलो
गाणगापूरच्या आठवणी मनात कोरून,
नित दत्त गुरूंच्या सेवेत रत झालो

आता वर्षाकाठी करितो मी नित्य वारी
श्री क्षेत्रे श्री दत्ताच्या गाणगापुरी
माझा दत्त-देवाचे दर्शन घेऊनि,
पुढील वारीची धरितो आस उरी.   

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.12.2022-बुधवार.