दत्त-जयंती-चारोळी

Started by Atul Kaviraje, December 07, 2022, 09:14:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.१२.२०२२-बुधवार आहे. आज श्री दत्त-गुरूंची जयंती आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्रीस "दत्त-जयंती" च्या हार्दिक शुभेच्छा. 

      ब्रह्मा,विष्णू आणि महेश या त्री-मूर्ती देवांचे सती अनुसया हिने आपल्या तपस्येने केलेले बाळ-रूप म्हणजेच, दत्त-गुरु. दत्त-गुरूंची थोरवी माहित नसणारा असा एकही भक्त-गण सापडणार नाही. दत्त-गुरूंचा महिमाच असा आहे. इतके देवत्त्व ,श्रेष्ठत्त्व प्राप्त असूनही त्यांनी अक्षरशः आपल्यापेक्षाही कमी जात-कुळीतील एकूण २१ गुरु केले होते, हे सर्वांना विदित असेलच. खरोखरच, इतकी महानता, दानतI, दातृत्त्व फारच कमी लोकांत दिसून येते. आणि ते तर प्रत्यक्ष देव. अश्या या आपल्या पूज्य श्री दत्त-गुरूंची आज जयंती आहे. महाराष्ट्रातील सर्व दत्त-देवस्थाने आज भाविकांनी भरून गेली आहेत. भक्तांचा जणू महापूरच लोटला आहे. जिथे-तिथे दत्त-गुरूंची गाणी आणि भजनेच ऐकू येत आहेत. वातावरण उल्हासमय,मंगलमय आणि भक्तिमय असे झाले आहे. मित्रांनो, माझेही कुल-दैवत श्री दत्त-गुरूच आहेत. ही चारोळी मी माझ्या देवाला समर्पित करीत आहे. त्यांचे एक माहित असलेले सर्व-परिचित छायाचित्र म्हणजे तीन शिरे-सहा हात, कफनी धारण केलेले,गळ्यात माळा, काखेत झोळी, हाती कमंडलू, पुढे आणि पाठी उभे असलेले श्वान, गाय आणि वासरू असे त्री-देव रूप पाहिले की डोळ्यांचे अक्षरशः पारणेच फिटते. तल्लीन होऊन ते फक्त पाहत राहावेसेच वाटते. तर या दैवतास , माझ्या श्री दत्त-गुरुंस माझा साष्टांग प्रणिपात.

                       चारोळी
                      --------

दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दत्तगुरूंच्या पावन चरणांची नित्य तुम्ही हो आस धरा
श्री क्षेत्र गाणगापुरासी नित्य तुम्ही हो वारी करा,
तारणहार तुमचा दत्त गुरु, त्याची मनोभावे सेवा करा.
=========================

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.12.2022-बुधवार.