मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-30-पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट--1-

Started by Atul Kaviraje, December 07, 2022, 09:32:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-30
                                  --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट"

                    पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट--1--
                   ---------------------------------------------

     शनिवार, रविवार ची चाहूल शुक्रवारी लागली की लगेच फोनाफोनी करून ट्रेक चे प्लान होतात. त्यातले किती प्रत्यक्षात येतात हा वादाचा मुद्दा, पण तरी काहीतरी सबळ कारण निर्माण करून, असे झाले म्हणून जमले नाही असे म्हणता येते.
गुरुवारीच गूगल नकाशे वरून शोधून काढत खांडस मार्गे भीमाशंकर चा ट्रेक ठरवला. शुक्रवार संध्याकाळ उजाडली तरी ट्रेक चे काही नक्की होईना. मग थोडी हापिसातल्या फोन चे बिल वाढवल्यानंतर प्लान ठरला. लगेच आई ला फोन करून गुळाच्या पोळ्या बनवायला सांगितले.

     कुठेतरी माळरानात सहा सहा तास भटकत राहायचे, जळता सूर्य डोक्यावर घेऊन फिरून ग्लुकॉन डी चे पुडे च्या पुडे संपवायचे आणि तरी तरतरी येत नाही मग रस्त्यात मिळेल तिथे मांडी घालून बसून एकदाची ती गुळाची पोळी हाणली की मग मात्र गड सर झाल्याचेच सूतोवाच. अहाहा. असेच एकदा सरसगडाला चढताना डी-हायड्रेशन झाले म्हणून एकटाच बसलो होतो पायथ्याशी पोळ्या खात !!

     पण यावेळची गोष्ट जरा वेगळी होती. आठवडाभर उर फुटेस्तोवर काम करून पाठीची हाडे आणि मणके खिळखिळे व्हायला आले होते. अमाप वेदना झाल्यावर शुक्रवारी कौटुंबिक वैद्य बुवाकडे गेल्यावर त्यांनी चक्क मला ताकीद दिली. मणक्याचा आजार झाला असून, खांद्यामधले वंगण ( Body Oil ) कमी झाले आहे. २ आठवडे सक्त विश्रांती घ्यावी लागेल. बरीच औषधे आणि मलम यांचा भडिमार करूनही खांदादुखी काही थांबेना. शेवटी क्ष- किरण चाचणी करायचा सल्ला दिला गेला. X -Ray काढल्यावरच नक्की निदान होणार होते. मग गप्पपणे क्ष- किरण चाचणी करायला दुसऱ्या डॉक्टर कडे.... तिथे जवळ पास ३ तास पुरतील एवढी लोक आणि समोर एक सूचना वजा फलक. "मराठी भाषेत एका वाक्यात जास्तीत जास्त किती चुका आपण करू शकतो?" अश्या स्पर्धे मधूनच त्या फलकाची निर्मिती झाली असावी. सुमारे तब्बल तीन तास तोच फलक वाचून वाचून मी इतका पकलो की जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मी का आलो आहे हेच आठवेना. मग एका "खली" सदृश माणसाने मला त्या दिव्याच्या प्रकाशात जवळ जवळ ढकलूनच दिले. खिसा शे पाचशे रुपड्यांनी नी रिकामा झाल्यावर हातात एक फोटो निगेटिव घेऊन मी घरी आलो आणि झोपून गेलो.

     कालच्या औषधांच्या भडिमाराने सकाळी उठल्यावर जरा बरे वाटायला लागले. सकाळी सकाळी जाऊन मी तो 'क्ष- किरण' अहवाल डॉक्टर बुवांना दाखवला. ट्रेक तर रद्द झालाच होता, पण तो माझ्यामुळे रद्द झाल्याने सकाळी सकाळी शिव्या सदृश फोन येतच होते. यातच २ आठवडे विश्रांतीच्या विचाराने मी तर वेडाच झालो होतो. आता यात अजून काही निघाले तर वाटच लागेल म्हणून मी कुतूहलाने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो.

काय बरं वाटतंय का ?
हो आता बरे आहे जरा ....
अरे, काही नाही झालेय, फक्त 'Muscular Spasm' आहे. दोन दिवसात होईल बरा.
मी मात्र सुटकेचा निःश्वास सोडला. तडक घरी गेलो, म्हणालो काही झाले नाहीये आता मी बरा आहे.

     हे ऐकून भाची ने तिची शाळेचा "घ. अ." म्हणून थर्माकोल चे कमळ बनवायचे आहे असे फर्मान सोडले. मग आमची स्वारी कमळाच्या मागे... ४ थर्माकोल चे ग्लास, आणि असंख्य रंगांच्या पेट्या तिने उपलब्ध करून दिल्यावर माझी कारागिरी चालू झाली. २-३ तासांच्या (अथक) प्रयत्नांनंतर ते कमळ तयार झाले.

--सुज्ञ माणुस
--सागर शिवडे
(April 29, 2013)
------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.12.2022-बुधवार.