मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-31-पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट--2-

Started by Atul Kaviraje, December 08, 2022, 09:35:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-31
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट"

                    पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट--2--
                   ---------------------------------------------

     तेवढ्या वेळात भाची चे अजून एक चित्र काढून पूर्ण झाले.

     खूप चेष्टा उडवल्यानंतर, चित्र नीट पाहिले. लहान मुलांमध्ये ग्रास्पिंग पॉवर जास्त असते. बालमनाने साकारलेले ते पक्षी आणि कुत्रा( का मांजर) पाहून विचार आला की, तिच्या मनात "पक्षी दिसतो कसा" याचा फक्त साचा होता त्याला पंख वैगरे काढावे असे तिला वाटले नसावे. पण, त्यातही त्याला खाण्यासाठी दाणे द्यायला हि ती विसरली नव्हती.

     असो,हि कामगिरी झाल्यावर जरा वामकुक्षी साठी टेकलो.

     आता मात्र बरे होऊन मी दुसऱ्या संकटात सापडलो ते म्हणजे "दाखवायचा"फोटो काढून यायच्या. बऱ्याचं दिवस मातोश्री मागे लागल्या होत्या की लग्नाचे बघायला चालू करू. जरा (तरी) बरा फोटो काढून आण तुझा, पण मी मात्र दरवेळी टाळाटाळ करत होतो. यासाठीच का, पण शनिवार- रविवार दोन दिवस मी झोपूनच घालवतो. हा दाखवायचा फोटो म्हणजे एक करामतच असते. शक्य तेवढे बरे कपडे अंगावर चढवून, चेहऱ्यावर २-३ किलो पावडर थापून, ( काहींच्या बाबतीत हि लिस्ट अजुन वाढते, एक दीड किलो लिपस्टिक, अर्धा लीटर नेलपॉलिश, वाटी भरून काजळ ... असो. ),चेहऱ्यावर उसने सोज्वळ भाव आणून फोटो काढून घ्यायचा आणि त्यानंतरही विश्वाची आणि पर्यायाने आपली उत्पत्ती करणाऱ्याच्या आपल्यासाठीच्या "ब्लु प्रिंट" ची आणि त्या फोटोची तडजोड झाली नाही तर फोटोशॉप ची करामत सुरू ... त्यात खाली परत ती करामत करणाऱ्या कारागिराचे नाव वळणदार अक्षरात ...

     जमेल तेवढी टाळाटाळ करून जरा निवांत बसलो तेवढ्यात आमच्या बहिणीचे आगमन झाले. एरवी माझ्याबरोबर कुठेही न येणाऱ्या आमच्या भगिनी, फोटो चा विषय निघाल्यावर " चल मी पण येते तुझ्याबरोबर, तो निळ्या चेक्स शर्ट घाल हा... आणि "अशी" पोझ दे" असे म्हणत त्या पोझ चे हि मार्गदर्शन झाले. आता मात्र गप्प जावे लागणार या विचारातच फोन वाजला.

     "ए काय करतोयेस, बरेच दिवस गेलो नाही कुठे चल आपल्या तिकोना पॉइंट ला जाऊ" असे म्हणत मित्राचा फोन आला, मग म्हटले ट्रेक नाही तर नाही आपला आवडता "पॉइंट" तरी का सोडा?" पाठदुखी थांबून, आणि आपल्याला अजून काही झालेले नाही या आनंदाने निघालो आम्ही आमच्या पेटंट पॉइंट ला.
"हो" म्हणून फोन ठेवला. पुढच्या १० मिनटात तो हजर. लगेच जर्किन,हेल्मेट वैगरे आभूषणे चढवून आमची यात्रा निघाली.

     तिकोना पॉइंट म्हणजे एक अद्भुत जागा आहे. छोटा ब्रेक पाहिजे असेल तर यासारखी उत्तम जागा नाही. कोथरूड पासून ४५ - ४८ किमी अंतर असून एकदा पौड गाव सोडले की जास्त रहदारीही लागत नाही. खर्च तर जवळ जवळ नाहीच काही. फक्त पेट्रोल काय असेल ते.

     कोथरूड पासून पौड गावाकडे जाताना, गावातूनच उजव्या हाताला "हाडशी" कडे जाणारा रस्ता पकडायचा. हाडशी येथे "श्री सत्य साईबाबा" यांचे अतिशय सुरेख असे मंदिर आहे. त्यामुळे हि जागा बऱ्याचं लोकांना माहीत असते. ४ वाजायच्या सुमारास कोथरूड, पुणे वरून निघालो, की पुढचं दीड तासात हाडशी मंदिरा ला आपण पोहोचतो. तिथून वरती मंदिरात न जाता पुढे 'पवना नगर" च्या दिशेने जावे. हाडशी पासून पुढे ७ किमी जाताना छोटा घाट लागतो. आणि मग एकदा 'तिकोना' किल्ल्याचे दर्शन झाले की की पुढे जात राहायचे. दहा मिनटे गेल्यावर एक निसर्गरम्य असे ठिकाण येते. तोच हा तिकोना पॉइंट.

     तिकोना पॉइंट वरून दिसणारे तुंग किल्ल्याचे मनोहारी दृश्य.
पश्चिमे कडे तोड करून आपण उभे असतो. समोर उत्तुंग असा 'तुंग" किल्ल्याचे शिखर दिसते. त्याच्या भोवताली पवना धरणाचे निळेशार पाणी... मागे पहिले तर अजस्त्र असा तिकोना उभा. कोणताही गजबजाट नाही. शांत अश्या जागेत पक्ष्यांचे किलबिलाट.... बघता बघता पश्चिमे कडील आभाळाला केशरी किनार येते आणि सूर्य त्या मनोहारी डोंगर रांगांमध्ये लुप्त होऊन जातो. फक्त आपण, तुंग, तिकोना, आणि सूर्यास्त. खरंच निसर्गाच्या महानतेची अनुभूती ज्याचे त्यानेच घ्यायला हवी.

--सुज्ञ माणुस
--सागर शिवडे
(April 29, 2013)
------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.12.2022-गुरुवार.