मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-47-चेतन ची शोकांतिका-3-ब-

Started by Atul Kaviraje, December 24, 2022, 09:27:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-47
                               ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "चेतन ची शोकांतिका"

                             चेतन ची शोकांतिका-3--ब--
                            ------------------------

     मुलांच्या जीवनात आनंद निर्माण करणार्‍या या चेतन ची एक वेगळीच समस्या असते. एका दुष्ट जादुगाराला चेतनच्या कडे असणारे शक्तीच्या मदतीने दुष्कृत्ये करायची असतात. त्यामुळे चेतन या जादुगारापासून लांब पळत असतो. खरे तर चेतन या जादुगाराला सहज ठार करू शकत असतो पण तो तसे करीत नाही कारण जादुगाराने एक असे वरदान मिळविलेले असते की ज्यायोगे चेतनने जर जादुगाराला ठार मारले तर स्वत: चेतन देखील त्यानंतर संपून जाईल. त्यामुळे जादुगार चेतनला स्वत:ला मारण्याचे खुले आव्हान देत असतो आणि चेतन त्याच्यापुढे हतबल ठरत असतो.

     जादुगाराला चेतनची या तीन मुलांसोबत असलेली जवळीक समजते. तिचा फायदा करून घेण्याच्या उद्देशाने जादुगार त्यातील लहान मुलीला ओलीस ठेवतो आणि त्या बदल्यात चेतनला स्वत:च्या स्वाधीन होण्यास सांगतो. आता चेतनपुढे स्वत:चा जीव वाचविण्याकरिता दोनच पर्याय असतात - एकतर जादुगाराचे ऐकून स्वत:ला त्याच्या स्वाधीन करणे, किंवा मग त्या छोट्या मुलीला जादुगाराच्या ताब्यात तसेच सोडून स्वत: सुखरूप निघून जाणे; परंतू आपल्या छोट्या मैत्रिणीचा जीव वाचविण्याकरिता तो जादुगाराला ठार मारण्याचा तिसरा पर्याय स्वीकारतो, ज्याची किंमत त्याला स्वत:चा अवतार संपवून चुकती करावी लागते.

     अशा प्रकारे हा चित्रपट मानव व अमानवी शक्तीच्या एका अनोख्या मैत्रीची आणि मैत्रीखातर केलेल्या परमोच्च बलिदानाची कथा प्रेक्षकांपुढे सादर करतो. १९८४ साली ज्यांनी ही शोकांतिका बनविली त्यांनीच पुढे १४ वर्षांनी या चित्रपटाचीच शोकांतिका करून टाकली. खरे तर आपल्या चित्रपटात वापरलेल्या ३डी तंत्रापेक्षाही त्याची दर्जेदार कथा हेच त्याचे मोठे बलस्थान आहे हे त्यांना कळायला हवे होते. पण ते त्यांना कळले नाही की प्रेक्षकांच्या अभिरूची विषयी त्यांना तितकासा विश्वास वाटला नाही कोण जाणे? कारण १९८४ मध्ये जो चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला तो १९९८ मध्ये प्रेक्षकांसमोर आणताना त्यावर उर्मिला मातोंडकरचे कलम केले. उर्मिला त्याकाळी रंगीला आदी चित्रपटांमुळे मोठ्या प्रमाणावर चर्चेत होती. तिच्या प्रतिमेचा चित्रपटाच्या यशाकरिता वापर करण्याकरिता मूळ चित्रपटात नसलेली एक भूमिका कोंबून त्यात बळेच उर्मिलाला सादर करण्यात आले. तिच्याकरिता इतके फूटेज खर्चण्यात आले की त्यामुळे चेतनचे चित्रपटातील स्थान दुय्यम झाले. १९९८ सालच्या पोस्टर्सवर देखील उर्मिलाची छबी मोठ्या आकारात तर चेतन आणि त्याचे मित्र कोपर्‍यात कुठेतरी लहानशा जागेत दाखविण्यात आले.

     अनेकदा जुनी चांगली गाणी रिमिक्स स्वरूपात विडंबन होऊन आपल्या समोर येतात तर कधी डॊनचे शाहरूखने केलेले विडंबन, वर्मांची आग किंवा हिमेशने कर्जचे केलेले विडंबन पाहण्याचे दुर्दैव प्रेक्षकांच्या वाट्याला येते. पण निर्मात्यांनी स्वत:च्याच निर्मितीचे असे वाटोळे केलेली शोकांतिका निदान मला तरी फार दुखवून गेली.

--चेतन सुभाष गुगळे
(April 3, 2013)
------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.12.2022-शनिवार.