मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-79-माझा आवडता ऋतू उन्हाळा

Started by Atul Kaviraje, December 31, 2022, 09:51:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-79
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता ऋतू उन्हाळा"

     उन्हाळा हा वर्षातील तीन ऋतु पैकी एक आहे. जरी हा ऋतू वर्षातील सर्वात उष्ण ऋतु असला तरी लहान मुलांना हा ऋतु इतर ऋतूंच्या तुलनेत सर्वात जास्त आवडतो. कारण या ऋतूत शाळा कॉलेजांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतात. उन्हाळ्याच्या या सुट्ट्यांच्या वेगवेगळ्या पद्धतींनी आनंद उपभोगला जातो. उन्हाळा ऋतुत पृथ्वी सर्वात जास्त प्रमाणात सूर्याकडे झुकलेली असते. उन्हाळा सर्वात उष्ण आणि कोरडा ऋतू आहे. या ऋतूत दुपारी व संध्याकाळी उष्ण वारे वाहतात.

     संपूर्ण वर्षभरातून उन्हाळ्याचा कालावधी माझा आवडता काळ असतो. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर आमच्या शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या 60 दिवसांच्या असतात. या सुट्ट्या एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपासून सुरू होऊन जून महिन्याच्या 15 तारखेपर्यंत राहतात. या सुट्यांचा उद्देश शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आराम, मनोरंजन व इतर नवीन गोष्टी शिकण्याचा आहे.

     मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझे मामा, मावशी व आजीच्या घरी जातो. वेगवेगळ्या गावी जाऊन मी आनंद साजरा करतो. जवळपास 15-20 दिवस मी गावोगावी फिरतो. यानंतर आपल्या घरी परत आल्यावर दररोज खेळणे व मजा करणे सुरू होते. मला बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल इत्यादी खेळ खेळायला खूप आवडते. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यामध्ये मी माझ्या मित्रांसोबत दररोज संध्याकाळी हे खेळ खेळतो. उन्हाळ्यात फक्त सकाळी वातावरण थंड असते म्हणून आम्ही सकाळीच उठून मॉर्निंग वॉक करतो.

     दुपारी बाहेर उन्हाचा कडाका असल्याने बाहेर निघायची इच्छाच होत नाही. मग अश्यावेळी मी मस्त पैकी कूलर लाऊन टीव्ही वर माझे आवडते कार्टून पाहतो. थंडगार हवेत टीव्ही पाहण्याची मजाच वेगळी असते. या शिवाय उन्हाळ्यात खूप साऱ्या आनंददायी गोष्टी मी करतो. सकाळ संध्याकाळ आनंददायी नाश्ता, दुपारी आईने कापलेले थंडगार टरबूज, थंडगार लिंबू शरबत, संध्याकाळी वडिलांसोबत लस्सी आणि आईस क्रीम या सर्व गोष्टी मला खूप उत्साही करतात. सुट्ट्यांमध्ये दरवर्षी आमच्या घरात आंब्याचा रस केला जातो. आंबा माझे आवडते फळ आहे. मला आंबा व आंब्याचा रस प्यायला खूप आवडते.

     मागील उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मी स्केटिंग शिकण्याचा विचार केला होता. स्केटिंग एक मनोरंजक खेळ आहे. माझ्या वडिलांनी मला स्केटिंग क्लास लावून दिला होता. लवकरच मी या खेळात तरबेज झालो. उन्हाळ्याच्या या सुट्टीत वेळेचा सदुपयोग म्हणून मी दरवर्षी काही न काही नवीन शिकत असतो.

     उन्हाळ्याचा कालावधी आपल्या दररोज च्या कंटाळवाण्या जीवनापासून एक लांब ब्रेक देतो. या सुट्ट्या आपल्याला खूप काही शिकण्यासाठी प्रेरणा देखील देतात. आम्ही बऱ्याचदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी भेट देतो. समुद्र, पहाडी भाग आणि इतर थंड ठिकाणी आम्ही कॅम्प करून दिवस घालवले आहेत. पुढील वर्षासाठी माझ्या वडिलांनी सिंगापूर जाण्याची योजना देखील बनवली आहे.

     उन्हाळ्याचा सुट्ट्यांचा उद्देश विद्यार्थ्यांना आराम मिळवा म्हणून तर आहेच पण या काळात आपल्याला खूप काही शिकता देखील येऊ शकते. जे विद्यार्थी अभ्यासात कमकुवत आहेत ते या सुट्ट्यांचा सदुपयोग करून नवीन गोष्टी शिकू शकतात. या वेळेत सामान्य ज्ञान वाढवणे नवीन नवीन पुस्तके आणि कादंबरी वाचणे फार उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्याचा सुट्ट्या आपल्या सर्वांगीण विकासासाठी फार उपयोगी आहेत. म्हणूनच माझा आवडता ऋतू उन्हाळा आहे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.12.2022-शनिवार.