मंगेश पाडगांवकर-आपलं गाणं-आपण गाऊ लागतो नी गाणं सुचू लागतं

Started by Atul Kaviraje, January 03, 2023, 09:58:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                    "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !"
                   -------------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, एक गीत. या गीताचे शीर्षक आहे- "आपण गाऊ लागतो नी गाणं सुचू लागतं"

                          "आपण गाऊ लागतो नी गाणं सुचू लागतं"
                         ------------------------------------

गाय जवळ घेते नी वासरू लुचू लागतं
आपण गाऊ लागतो नी गाणं सुचू लागतं

गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो
गाणं आपल्या मनात आपण गाऊ शकतो
जनात गायलात म्हणून तुम्ही मोठे नसता
मनात गायलात म्हणून तुम्ही छोटे नसता
एक गोष्ट नक्की असते तिन्ही त्रिकाळ पक्की असते
आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे
आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही म्हटलं पाहिजे ॥

असंच असलं पाहिजे असं गाण्यावर बंधन नसतं
असंच नसलं पाहिजे असं गाण्यावर बंधन नसतं
गात गात केंव्हाही जाता येतं
आपलं गाणं केंव्हाही गाता येतं.
एकटं एकटं चालताना गाणं म्हणता येतं
धुणी वाळत घालताना गाणं म्हणता येतं
चुलीपुढे रांधताना गाणं म्हणता येतं
मच्छरदाणी बांधताना गाणं म्हणता येतं
जेव्हा आपला सूर लागतो बाथरूममध्ये न्हाताना
भरली बादली डुलू लागते आपण गाणं गाताना
फांदीतून पान फुटावं तसं गाणं फुटलं पाहिजे
आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही ते म्हटलं पाहिजे ॥१॥

तुमचं आणि माझं जेव्हा मन जुळतं
त्याच क्षणी दोघांनाही गाणं कळतं
माझ्या पावसात मग तुम्ही न्हाऊ लागता
तुम्हीच माझ्या गळ्यातून गाऊ लागता
कधी गाणं मिठीचं कधी आतूर दिठीचं
कधी गाणं एकाचं कधी एकमेकाचं
गाणं हेच गाण्याचं मोल असतं
गाण्यापुढे बाकी सारं फोल असतं
फूटपट्टी घेऊन गाणं मापता येत नाही
द्वेष करून गाण्याला शापता येत नाही
झऱ्यासारखं आतून गाणं फुटलं पाहिजे
आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही ते म्हटलं पाहिजे ॥२॥

पण एक गोष्ट नक्की असते तिन्ही त्रिकाळ पक्की असते
आपलं गाणं आपल्यालाच पटलं पाहिजे
आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही ते म्हटलं पाहिजे.

--प्रकाशक : शंतनू देव
(WEDNESDAY, MARCH 2, 2011)
-----------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                           (संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
                -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.01.2023-मंगळवार.