मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-59-ट्रोजन युद्ध भाग २.२-ब--

Started by Atul Kaviraje, January 05, 2023, 10:00:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-59
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ट्रोजन युद्ध भाग २.२"

ट्रोजन युद्ध भाग २.२- इलियडमधले द्रोणपर्व: विविध वीरांचा पराक्रम आणि अकीलिसचा धुमसता राग.-ब--
--------------------------------------------------------------------------

     डायोमीडचा हा नंगानाच एनिअस या ट्रोजन योद्ध्याला बघवला नाही. पांदारसला बरोबर घेऊन डायोमीडवर त्याने चढाई केली. समोरासमोर आल्यावर "हे डायोमीडा, सांभाळ माझा भाला" म्हणून भाला फेकला, पण डायोमीडची ढाल मध्ये आली. ढालीला भेदून भाला पलीकडे गेला पण डायोमीडला काही झाले नाही. पांदारसला ढाल भेदली गेली इतक्यानेच लै भारी वाटून त्याने कर्णागत "हतोऽसि वै फाल्गुन" अशी गर्जना केली, पणं डायोमीडने त्याच्यावर अचूक नेम धरून भाला फेकला. तो त्याच्या नाकातून आत घुसून जबड्याच्या खालच्या भागाजवळून बाहेर आला. पांदारस खलास. त्याचे शव ताब्यात घेऊन ग्रीक लोक त्याचे चिलखत आणि इतर शस्त्रे ताब्यात घेतील अशी भीती वाटून एनिअस रथातून खाली उतरला. पण डायोमीडने एक भलाथोरला धोंडा हातात घेतला आणि एनिअसच्या जांघेवर जोराने प्रहार केला. दगडाच्या आघाताने एनिअसच्या जांघेजवळचे काही मांस बाजूला होऊन मोठा भेसूर देखावा दिसू लागला. एनिअस जागीच कोसळला, पण अजून जिवंत होता. डायोमीड आता एनिअसला ठार मारणार इतक्यात त्याला कुणीतरी बाजूला नेले.

     आधी सांगितल्याप्रमाणे डायोमीडच्या या धैर्यामागे मिनर्व्हा देवीची प्रेरणा होती. तिने त्याला असेही सांगितले होते, की व्हीनस देवी तुझ्यासमोर आली तर तिला इजा करायला मागेपुढे पाहू नकोस,मात्र अन्य देवांसमोर असले काही करू नकोस. तेव्हा व्हीनस देवी समोर दिसताच त्याने तिच्या मनगटाजवळ भाल्याने वार केला आणि रक्त काढले. ती विव्हळू लागली, आणि मार्स देवाच्या रथात बसून तडक ऑलिंपसला गेली. तिथे सीनियर मंडळींनी तिचे सांत्वन केले. "काय काय बै सहन करायचं या माणसांचं!" असे उद्गार काढून काही जुन्या कहाण्या पुनश्च चर्चिल्या गेल्या. मग अपॉलो ने मार्सला डायोमीडकडे बघायला सांगितले. कोण मर्त्य इतकी टिवटिव् करतोय पाहूच, असे म्हणत मार्स युद्धक्षेत्रात गेला. आता ट्रोजनांची एक सभा भरली. ट्रोजनसाथी आणि थ्रेशिअन लोकांचा राजा अकॅमस आणि प्रख्यात ट्रोजन योद्धा सार्पेडन या दोघांनी वीरश्रीयुक्त भाषणे करून ट्रोजनांना धीर दिला. विशेषतः सार्पेडनने हेक्टरला लै शिव्या घातल्या-तुझ्यासाठी मी माझी पोरेबाळे-बायको-राज्य सर्व सोडून लांबून आलो पण तुला अक्कल नाही वगैरे वगैरे लैच कायबाय बोलला. हेक्टरला त्याचे शब्द झोंबले. त्याने सेना तयार केली आणि लढाईला पुन्हा मोठ्या प्रमाणावर तोंड लागले. आणि आश्चर्यकारकरीत्या एनिअससुद्धा ठणठणीत बरा होऊन पुन्हा लढायला आला.

(क्रमशः)--
--------
(March 20, 2013)
--------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.01.2023-गुरुवार.