मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-63-ट्रोजन युद्ध भाग २.२

Started by Atul Kaviraje, January 09, 2023, 09:54:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-63
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ट्रोजन युद्ध भाग २.२"

ट्रोजन युद्ध भाग २.२- इलियडमधले द्रोणपर्व: विविध वीरांचा पराक्रम आणि अकीलिसचा धुमसता राग.
--------------------------------------------------------------------------

          अ‍ॅगॅमेम्नॉनची हतबलता आणि अकीलिसची समजूत काढण्याचा अयशस्वी प्रयत्न

     हेक्टरच्या शौर्याने स्तिमित झालेल्या अ‍ॅगॅमेम्नॉनने एक सभा बोलावली. त्याला सभेत बोलताना रडू कोसळले होते. "झ्यूसदेवाने आपल्यावर मोठी अवकृपा केली, आपण उद्या गप निघून आपापल्या घरी परत जाऊ, ट्रॉय घेणे आपल्याच्याने काही होईल असे वाटत नाही" वगैरे ऐकून सगळ्यांना कळायचं बंद झालं. सगळे तसेच दु:खी होऊन बसले, पण तरणाबांड यवनवीर डायोमीड मात्र रागाने ताडकन उठून उभा राहिला. "तुला काय वाटलं आम्ही सगळ्यांनी बांगड्या भरल्यात का? पहिल्यांदा मला भित्रा म्हणाला होतास तू, आणि आज तू असा भित्र्यागत पळून चाललास? लाज वाटते का? तू गेलास तरी बेहत्तर, बाकीचे गेले तरी बेहत्तर, पण स्थेनेलस आणि मी ट्रॉय घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण आर्गोसहून आम्ही आलो तेव्हा देवांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते."

     हे ऐकून यवनभीष्म नेस्टॉरने तरुण असूनही दाखवलेल्या मॅच्युरिटीबद्दल डायोमीडची प्रशंसा केली आणि अकीलिसची माफी मागून, त्याला भेटवस्तू वगैरे देऊन परत लढण्यास राजी करण्याबद्दल सांगितले. तेव्हा अ‍ॅगॅमेम्नॉनने अकीलिसला भरपाई देण्याचे कबूल केले- इतक्या भरघोस भेटवस्तू नुसत्या ऐकूनच पागल व्हायची पाळी. काय होत्या त्या भेटवस्तू आणि ओव्हरऑल ऑफर?

-अजून एकदाही आगीची धग न लागलेल्या ७ तिवया.
-दहा टॅलेंट भरून-जवळपास २५०-३०० किलो-सोने.
-वीस लोखंडी कढया/काहिली.
-रेस जिंकून बक्षिसे मिळवलेले बारा घोडे.
-लेस्बॉस बेटावरचे अतिकुशल कामगार.
-अकीलिसपासून हिरावून घेतलेली ब्रिसीस ही मुलगी त्याला परत देण्यात येईल. (बादवे अ‍ॅगॅमेम्नॉनने तिला हातही लावला नव्हता)
-ट्रॉयहून परतताना जी लूट मिळेल तिचा मोठा हिस्सा अकीलिसला दिला जाईल.
-हेलेनखालोखाल हॉट अशा वीस ट्रोजन बायका त्याला दिल्या जातील.
-अ‍ॅगॅमेम्नॉनला क्रिसोथेमिस्,लाओदिस,इफिआनास्सा१ या तीन मुली होत्या (इफिजेनिया नामक मुलीला आधी ठार मारले गेले ती सोडून) आणि ओरेस्टेस हा मुलगा होता. तीन मुलींपैकी आवडेल तिच्याशी अकीलिसचे लग्न लावले जाईल.
-कार्डामिल, एनोपे, हिरे,फेराए, आंथिआ,आएपेआ आणि पेडॅसस ही सात शहरे आणि त्यांची सर्व संपत्ती अकीलिसच्या नावे केली जाईल.

     १ म्हंजेच इफिजेनिया. ट्रॉयला जाण्याअगोदर तिचा बळी दिला गेला असा उल्लेख उत्तरकालीन साधनांत लै आढळतो, पण स्वतः होमर त्याचा उल्लेख करतच नै. अंमळ विचित्रच प्रकर्ण आहे हे.

     ही ऑफर ऐकून नेस्टॉर खूष झाला. त्याला खात्री होती की आता अकीलिस पाघळेल आणि नक्की युद्धाला जॉइन होईल. त्याने थोरला अजॅक्स, ओडीसिअस यांना अकीलिसचा एक सबॉर्डिनेट फीनिक्स याबरोबर अकीलिसकडे पाठवले. ते त्याच्या तंबूत पोहिचले. तिथे अकीलिस आणि पॅट्रोक्लस दोघे आरामात वाईन पीत बसले होते. अकीलिस लायर वाजवत होता. त्यांना पाहताच अकीलिसने त्यांचे स्वागत केले, "वाईन टाक पावन्यास्नी" अशी आज्ञा केली. ओडीसिअसने अ‍ॅगॅमेम्नॉनची ऑफर अकीलिसला सांगितली. पण अकीलिसचा राग काही जायला तयार नव्हता.

(क्रमशः)--
--------
(March 20, 2013)
--------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.01.2023-सोमवार.