नवं घर केव्हा मिळणार ?

Started by Atul Kaviraje, January 12, 2023, 05:27:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो, 

     भटक्या, विमुक्त जमातींसाठी, गरजू , गरीब आदिवासी यांचेसाठी, वनवासी लोकांसाठी सरकारने "घरकुल योजना" सुरु तर केली आहे, पण ती प्रत्यक्षात कधी उतरणार, की फक्त कागदोपत्रीच राहणार ? ऐकुया या लाभार्थी जनांचे या घरकुल योजनेवरील  मनोगत. माझी पुढील कविता याच विषयावर आहे. या वास्तव-वादी कवितेचे शीर्षक आहे- "नवं घर केव्हा मिळणार ?"     
     
                                 "नवं घर केव्हा मिळणार ?"
                                -------------------------

कागदी घोडे नाचवतंय सरकार
भरपूर नव्या योजनांचा भरमार
त्यातलीच एक ही घरकुल योजना,
आताशी उतरतेय ती कागदावर.

     मोकळे आकाश छत आमचे
     चारी दिशा भिंती आमच्या
     दगड उशाला, निजाया धरतीवर,
     जगतोय एका घराच्या आशेवर.

गरिबांचे अश्रू दिसणार कोणा ?
पीडितांचे दुःख कळणार कोणा ?
रानोमाळ भटकणारी मुक्त जमात आम्ही,
ही वनराईच आमचे घर होई.

     आमचे काट्याकुट्यांचे हे जगणे
     अनवाणी फिरतोय, पायी नाहीत वहाणे
     निदान एखादा आडोसा हवा,
     थंडी पावसापासून निवारा हवा.

पिढी दर-पिढी असेच जिणे
आतल्या आत अश्रूंना पीत रहाणे
कोण न्याय देईल आम्हा ?
कोण घर देईल आम्हा ?

     स्वप्नातले घर आम्हाला मिळेल ?
     लेकरांना आमच्या सरंक्षण लाभेल ?
     शिकून सवरून होतील मोठी,
     आई-बापाचे नाव राखतील पाठी.

लाभार्थी आम्ही, वाट पाहतोय
त्यातील थोडासा अंश लाभावा
सरकारने राबवलीय ही योजना,
चार भिंतींच्या आड निवारा मिळावा.

     कागदावरून प्रत्यक्ष उतरेल धरतीवर
     कार्य कधी होईल सुरु योजनेवर ?
     आता फक्त पाहतोय वाट,
     सुखाची कधी उगवेल ती पहाट ?

आसवांना आज रोखून धरलंय
हुंदक्यांना आत दाबून टाकलंय
प्रतीक्षेत आहे नवे सदन मिळण्याच्या,
आमच्या स्वप्नातील हक्काच्या घराच्या. 

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.01.2023-गुरुवार.
=========================================