गौळण-कुठे बाई गेला, कान्हा कुठे लपला, कशी शोधू त्याला ?

Started by Atul Kaviraje, January 13, 2023, 05:46:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया एक गौळण. खोडकर कान्हाच्या खोड्या, आणि त्यासाठी माता यशोदेकडे येणाऱ्या गोप-गोपिकांच्या तक्रारी, या सर्वांनी यशोदा आई कशी हैराण झाली आहे, याचे चित्रण मी पुढील गौळणीतून केलं आहे. माझ्या गौळण-कवितेचे-गाण्याचे शीर्षक आहे- "कुठे बाई गेला, कान्हा कुठे लपला, कशी शोधू त्याला ?"

                  "कुठे बाई गेला, कान्हा कुठे लपला, कशी शोधू त्याला ?"
                 -------------------------------------------------

कुठे बाई गेला, कान्हा कुठे लपला, कशी शोधू त्याला ?
कान्हा गं माझा, भारीच लाडावला
मोहना माझा, फारच लाडावला,
कृष्ण गं माझा, बराच लाडावला.

दाढी वेणीची गाठ मारुनी, लपून तो बसला
पती-पत्नीचा त्रागा पाहुनी, खुद्कन की हसला
अंगलट येता, हळूच काढता पाय घेता झाला,
कुठे बाई गेला, कान्हा कुठे लपला, कशी शोधू त्याला ?
कान्हा गं माझा, भारीच लाडावला.

घरात चोरून गोपिकांच्या, माठ की हो फोडला
दह्या-दुधाचा अन ताकाचा, काला फस्त केला
कशी उत्तरु गोपिकांच्या नित्य तक्रारीला ?
कुठे बाई गेला, कान्हा कुठे लपला, कशी शोधू त्याला ?
कान्हा गं माझा, भारीच लाडावला.

सवे खेळता गोप-गड्यांच्या, चेंडू पळवून नेला
पेंद्या शोधिसी चेंडूला, अन त्या द्वाड कृष्णाला
रडकुंडीस आला, त्रस्त करिती कृष्णाच्या लीला,
कुठे बाई गेला, कान्हा कुठे लपला, कशी शोधू त्याला ?
कान्हा गं माझा, भारीच लाडावला.

बाजाराला गौळण निघता, लबाड झाडापाठी दडला
खडा मारुनी डोईवरला, माठ की हो फोडला
दह्या-दुधाचा काला सारा डोईवर झरला,
कुठे बाई गेला, कान्हा कुठे लपला, कशी शोधू त्याला ?
कान्हा गं माझा, भारीच लाडावला.

यशोदा म्हणते, भांडावले मी साऱ्या तक्रारीला
मोहन माझा, अति लाडका, खट्याळ पुत्र एकला
पोर-वयाचा बाळ-कृष्ण तो, कशी शिक्षा करू त्याला ?
कुठे बाई गेला, कान्हा कुठे लपला, कशी शोधू त्याला ?
कान्हा गं माझा, भारीच लाडावला.

त्रस्त होऊनि, त्यास मग मी उखळीला बांधला
पाठ फिरता, लबाडाने तो दोर कसा सोडवला ?
पुन्हा फिरुनी, गोकुळीचा तो चोर पसार झाला,
कुठे बाई गेला, कान्हा कुठे लपला, कशी शोधू त्याला ?
कान्हा गं माझा, भारीच लाडावला.

खोड्या करितो, मस्करी करितो, तरी सर्वांचा लाडला 
त्यास मारीतI, अश्रूंचा मग झरा वाहू लागला
शहाणा होईन, मजसी तो मग उगा विनवू लागला
त्याची लबाडी, त्याचा कावा, मजसी मग उमगला
पुन्हा फिरुनी बाळाची मग सुरु झाली लीला
समजावीतI तयास मग मी, नाद की हो सोडला
कुठेही जा तू, कुठेही लप तू, जा खोड्या करायला,
अश्याच राहूदे, साऱ्या रिझविती, तुझ्या बाललीला.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.01.2023-शुक्रवार.
=========================================