गौळण-माझ्या कृष्णाला आज मी, या उखळीला बांधिला

Started by Atul Kaviraje, January 14, 2023, 10:19:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया एक गौळण. खोडकर कान्हाच्या खोड्या, आणि त्यासाठी माता यशोदेकडे येणाऱ्या गोप-गोपिकांच्या तक्रारी, या सर्वांनी यशोदा आई कशी हैराण झाली आहे, याचे चित्रण मी पुढील गौळणीतून केलं आहे. शेवटी त्रस्त होऊन, साऱ्यांच्या तक्रारींना भंडावून, यशोदा-आईने कृष्णाला उखळीला बांधून ठेवले.  माझ्या गौळण-कवितेचे-गाण्याचे शीर्षक आहे- "माझ्या कृष्णाला आज मी, या उखळीला बांधिला"

                    "माझ्या कृष्णाला आज मी, या उखळीला बांधिला"
                   -------------------------------------------

खोड्या करितो, साऱ्या सतावितो 
गुपचूप येऊनि कुशीत झोपतो
तक्रारी सोडविता माझा आज
घाईस जीव आला,
माझ्या कृष्णाला आज मी, या उखळीला बांधिला.

नटखट कान्हा, मन मोहना
कधी बालरूपही दाखवितो
खोड्याना त्याच्या ऊत येऊनि
वर खुदुखुदू तो हसतो
डोळा आणुनी पाणी गौळणी
कन्हैयाच्या वदती लीला,
माझ्या कृष्णाला आज मी, या उखळीला बांधिला.

तया मारण्या हात माझा
अवचित तो थांबतो
प्रसन्न त्याचे मुख पाहुनी
मनास आवर येतो
पाहता पाहता तोच द्वाड मग
खोड्या करुनि गेला,
माझ्या कृष्णाला आज मी, या उखळीला बांधिला.

अति खट्याळ तरी सर्वांस प्रिय
मोहनावरती साऱ्यांचा जीव
संधी पाहुनी, हळूच मग
नकळत खोडी काढतो
संधी साधुनी, खडा मारुनी
मटका त्याने फोडला,
माझ्या कृष्णाला आज मी, या उखळीला बांधिला.

सामोरी आला, कान्हा दिसला
जो तो मुकाट वाट सोडितो
नको ही ब्याद, कान्हा जा तू
गोकुळवासी त्रस्त वैतागीतो
परी फिरुनी, वाट अडवूनी
नेमकाची डाव साधला,
माझ्या कृष्णाला आज मी, या उखळीला बांधिला.

देवत्त्वाचा बाल-अंश घेऊनि
गोकुळी तो अवतरतो
अखिल विश्वाचा दाता, ईश्वर
मज पुत्र म्हणुनी लाभतो
समजूत काढता, तयास आवरिता
लाडे लाडे मज वदला
मैया, मी तुझा कान्हा लाडला 
मी तुझा मोहन एकला
खेळकर, खट्याळ, खोडकर मी
याच तर माझ्या बाल-लीला
नाही आवडल्या तुला,
तर बांध मज उखळीला.

साश्रू नयनांनी वदली यशोदा
तू माझा जीव, तू माझा देव
तू माझा प्राण, तू आहेस अजुनी लहान
कुशीत घेऊनि वदली यशोदा
मज क्षमा करिशी कृपाळा
हे सावळ्या, हे घननीळा
पहा तुझे मी बंधन सोडले 
उखळीचा पाश मी तुझा तोडीला.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2023-शनिवार.
=========================================