मकर संक्रांत-कुठे गेला तिळातला गोडवा, कुठाय पतंग विचारतेय हवा ?

Started by Atul Kaviraje, January 15, 2023, 11:06:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०१.२०२३-रविवार. मकर संक्रांतीचा पुण्य पावन सण. "तीळ-गूळ घ्या, गोड गोड बोला" म्हणायचंI सण. पतंग उडवण्याचा सण. साखरेचा काटेरी हलवा खाण्याचा सण. एकमेकांना भेटण्याचा सण. काही गोड-धोड खाण्याचा सण. परंतु, मित्रानो, यातले काहीही मला आज दिसून आले नाही, जाणवले नाही. सारंच कसं गुळमुळीत होतं. कुठे गेली ती मजा ?, कुठे गेला तो उत्साह ?, कुठे गेली ती उमंग ?, सर्व सर्व काही आज मला फारच कमी प्रमाणात आढळलं ! ऐकुया याच विषयावर एक प्रश्न उभी करणारी कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "कुठे गेला तिळातला गोडवा, कुठाय पतंग विचारतेय हवा ?"

                "कुठे गेला तिळातला गोडवा, कुठाय पतंग विचारतेय हवा ?"
               ----------------------------------------------------

गेले ते दिन गेले !
उल्हासाने भरलेले, उमंगाने नटलेले
खुशीने भारलेले, आनंदाचे उत्साहाचे,
ते दिवस कुठे गेले ? 

     तिळाच्या कढईतील गुळाच्या पाकाचे
     साखरेच्या मधुर काटेरी हलव्याचे
     गोड गोड उष्ण लाडवांचे,
     सुरस, मधुर पुरणपोळीच्या घासाचे.

रंगीबेरंगी पतंगांनी भरलेल्या आकाशाचे
सरसर फिरणाऱ्या फिरकीतील मांजांचे
एकदुसऱ्यांशी चुरशीची लढाई लावण्याचे,
एकमेकांचे पतंग सफाईदार काटण्याचे.

     तीळ गूळ घ्या सांगण्याचे
     गोड गोड बोला म्हणण्याचे
     एकमेका गळा भेट घेण्याचे,
     भांडण तंटे वाद मिटविण्याचे. 

कुठे गेले ते दिवस ?
येतील का फिरुनी परत ?
ती मजा, तो उत्साह,
मिळेल का पहावया परत ?

     कुठे आहे तिळाची उष्णता ?
     कुठे गेली तिळाची स्नेहता ?
     कुठे गेली गुळाची मधुरता ?
     कुठे गेली गुळाची गोडता ?

लोक एकमेकांना नाहीय भेटत
एकमेकांच्या गळा नाहीय लागत
तीळ गूळ घ्या नाहीय म्हणत,
गोड गोड बोला नाहीय बोलत.

     साखर पाकाचे काटे बोथटलेत
     हलवा, रेवडीचे दागिने काळवंडलेत
     पुरणपोळीचा घास कडू लागतोय,
     संक्रांतीचा साऱ्या विरसच होतोय.

कुठाय पतंग, विचारतेय हवा
एक तरी पतंग, आकाशी उडावा
रंगीबेरंगी पतंगास दिशा देण्यास,
वाट पाहतेय, उदासवाणी हवा.

     आज आकाश सुने आहे
     केव्हातरी रंगीबेरंगी पतंगांनी नटलेले
     आज हवा सुन्न आहे,
     कितीतरी पतंग तिने खेळवलेले.   

फिरकीतल्या मांजाचा रंग उडालाय
तिचा गरगर प्रवास थांबलाय
फिरकी आज फिरत नाहीय,
पतंगाची साथ करत नाहीय.

     संक्रांत आली आणि गेली
     सकाळ दुपार संध्याकाळ, निराशाच राहिली
     पुनः येतील का ते दिवस ?
          तीळ गूळ घ्या म्हणण्याचे
          अन गोड गोड बोलण्याचे !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.01.2023-रविवार.
=========================================