मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-82-गप्पा गणितज्ञाशी !

Started by Atul Kaviraje, January 28, 2023, 09:53:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-82
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "गप्पा गणितज्ञाशी !"

                                  गप्पा गणितज्ञाशी ! --
                                 -----------------

हॉटेल वैशालीच्या एका कोपऱ्यात डॉक्टर आचार्य कॉफी पीत बसले होते. मी त्यांच्यासमोर बसल्यानंतर हातातील चिठ्ठी माझ्या हातात दिली. नेहमीप्रमाणे त्यात 2 कूटप्रश्न होते.

प्रश्न 1
वडील व मुलाचे आताचे वय अनुक्रमे 43 व 16 आहे. यानंतर किती वर्षानी वडिलाचे वय मुलाच्या वयापेक्षा दुप्पट होईल?

प्रश्न 2
बुद्धीबळाच्या एका मॅराथॉन स्पर्धेसाठी 14539 बुद्धीबळपटूंनी नाव नोंदविले. स्पर्धेच्या नियमानुसार बाद पद्धतीच्या या स्पर्धेत जो हरतो त्याला स्पर्धेतून वगळले जाणार होते. जर खेळ ड्रा झाल्यास नाणे उडवून छाप काट्याद्वारे विजेता ठरवला जाणार होता व त्याला पुढच्या फेरीत खेळण्याची संधी मिळणार होती. किती डावानंतर अंतिम विजेता कोण हे ठरविणे शक्य होईल?

मी चिठ्ठी खिशात ठेवल्यानंतर डॉक्टर विषयाचा प्रस्ताव मांडतात.

"टीव्हीवर जाहिरातींचा एवढा भडिमार का असतो याची तुम्हाला काही कल्पना आहे का?"

"प्रेक्षकांनी त्यांचा माल विकत घ्यावा म्हणून.."

"टीव्हीच्याऐवजी इंटरनेटवर ते का जाहिरात करत नाहीत? कारण बहुतेक प्रगत देशात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे व त्याचा फायदा जाहिरातदार घेऊ शकतात."

"टीव्हीएवढा प्रभाव त्याचा नसावा."

"मला वाटतं, फक्त तेवढच कारण नसावं. लोकांना माहिती शोधण्याचा कंटाळा येत असावा. त्यांना सर्व काही आयतेच मिळाले पाहिजे. चमच्यानी भरवायला हवे. टीव्हीचे जाहिरातदार याचाच फायदा घेत असावेत. यांच्या जाहिराती तद्दन भिकार, गुणवत्ता नसलेले, प्रेरणाशून्य असतात. ज्यांना थोडी तरी अक्कल आहे त्यांनी टीव्हीवर जाहिरात केलेल्या वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार टाकावा, या मताचा मी आहे."

"का म्हणून?"

"माझ्या या विधानामागे तर्कशुद्ध विचार आहे. वाईट जाहिराती वाईट जाहिरातदार बनवितात. वाईट जाहिरातदारांना काम देणाऱ्या उत्पादकांना आपल्या वस्तूंची जाहिरात बघितल्यावर ते चांगले आहे का वाईट हेही त्यांना कळत नाही. त्यांच्यावर व त्यांच्या उत्पादनांवर विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकाच्या माथी मारू पाहणाऱ्या मालांची खरेदी करू नये. त्यांचा माल नक्कीच निकृष्ट दर्जाचाच असणार, यात शंका नसावी. अशा जाहिरातदारांचा MICQ अगदीच कमी असणार हे मी या अगोदरच सांगितले आहे. याचा अर्थ असा नाही की चांगल्या जाहिरातींच्या उत्पादनांची खरेदी करावी. "

"परंतु आज जाहिरातीवर राग येण्याचे कारण काय?"

"टीव्हीवरील कॉमर्शियल ब्रेकच्या वेळी एक जाहिरात दाखवित होते. लॅपटॉपवर ते तुम्हीच बघा. म्हणजे मला का राग येतो याचे कारण समजेल."

"एक गोड चेहऱ्याची आई आपल्या आजारी पडलेल्या मुलीला कुठले औषध द्यावे याची विचारपूस पांढरा ऍप्रॉन घातलेल्या 'डॉक्टर'कडे करत होती. या कंपनीची का त्या कंपनीची. मुळात मुलगी आजारी वाटत नव्हती. आजारपणाचे ढोंग करणारी ही मुलगी चॉकलेट देणार म्हणून झोपवल्यासारखी वाटत होती. ही आई दोन कंपन्यांच्या गोळ्या डॉक्टरसमोर हातात धरून कुठल्या गोळ्या देऊ अशी विचारत होती."
"मग..."
"मग काय? कुठलाही शहाणा माणूस डॉक्टरांना असले मूर्खपणाचे प्रश्न कधी विचारेल का?" डॉक्टर भास्कर आचार्य यांचा चेहरा लालबुंद झाला होता.

"अजून एक उदाहरण देतो. अशाच एका औषध कंपनीची जाहिरात होती. काही वृद्ध पुरुष व स्त्रिया स्वत:च्या आजारपणाचे 'अनुभवकथन' करत होते. एक पडीक हीरो त्यांना खोदून खोदून प्रश्न विचारत होता. औषध किती गुणकारी आहे हेच ठसविण्याचा प्रयत्न तो करत होता. परंतु कार्यक्रमाच्या शेवटी हा हिरो औषधाच्या उपदुष्परिणामांची अक्षरश: यादी वाचून दाखवू लागला. मी तर अवाकच झालो. एवढे साइडइफेक्ट्स असतील तर हे औषध कुणी घेतील का? जाहिरातदाराच्या डोक्यात असले प्रश्न कसे काय शिरत नाहीत? असली औषधं बाजारात यायला नकोत. त्यावर बंदी घालायला हवी."
"औषध घेतल्यानंतर एखाद्या रुग्णावर काही विपरीत परिणाम झाल्यास उत्पादकावर खटला भरला जाऊ नये म्हणून ही काळजी."
"फारच विचित्र. गंमत म्हणजे हा हिरो एवढ्यावरच थांबत नाही. पुढच्या वेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरला भेटल्यास हे औषघ लिहून देण्याचा आग्रह धरा, असे ठणकावून सांगतो. डॉक्टर असे काही तरी सांगेल का? मी याचीसुद्धा चवकशी केली."

--प्रभाकर नानावटी
(February 28, 2013)
-----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.01.2023-शनिवार.
=========================================