वट-वृक्ष-कविता-गीत-वटवृक्षा, तुझा आजही आहे भव्य विराट पसारा"

Started by Atul Kaviraje, February 01, 2023, 12:18:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, त्या महान वट-वृक्षाचे, वडाच्या झाडाचे महत्त्व या पुढील कविता-गीतातून. वर्षानुवर्षे हा एकाच जागी स्तब्ध उभा असलेला वट-वृक्ष, आपल्याला फक्त वट-पौर्णिमेच्या दिवशीच त्याची आठवण येते. इतर दिवशी तसा तो दुर्लक्षितच असतो. चालता चालता माझं सहज लक्ष गेलं, आणि त्याचा तो भव्य, विराट पसारा, पाहून मला एक कविता सुचली. ती पुढीलप्रमाणे. सुप्रसिद्ध जुने गाजलेले गीत "भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी", या गीतावर आधारित ही कविता आहे. या कवितेचे शीर्षक आहे- "वटवृक्षा, तुझा आजही आहे भव्य विराट पसारा"

                       "वटवृक्षा, तुझा आजही आहे भव्य विराट पसारा"
                      ------------------------------------------
                                   
वटवृक्षा, तुझा आजही आहे भव्य विराट पसारा,
मनुष्य, प्राणी, द्विजगण सारे इथे शोधिती निवारा.

फांदीतून त्या ऐकू येतो, मंजुळ कलरव न्यारा
मोदे नाचू लागती पक्षी, फुलवुनी पंख पिसारा
फांदीवरल्या घरट्या येई, नवं जन्मा आकारा,
वटवृक्षा, तुझा आजही आहे भव्य विराट पसारा.

पानांतुनी चैतन्य वाहवी, हसरा शीतल वारा
सळसळ त्याची करून जाई, सजीव परिसर सारा
जीवनाचा या अनुभव येई, तुज पाहुनी अंतरा,
वटवृक्षा, तुझा आजही आहे भव्य विराट पसारा.

तुला रक्षितो हे वटवृक्षा, पारंबीचा धुमारा
चहुबाजुंनी भिंत उभी ही, सांभाळाया डोलारा
आजानुबाहू जणू भासतो, विशाल विस्तृत डेरा,
वटवृक्षा, तुझा आजही आहे भव्य विराट पसारा.

अमंगळास,अशुभतेस त्या, नच देई तू थारा
देवत्त्वाचा अंश तुझ्यात, तू मंगल ईश-देव्हारा
दिव्यत्त्वाची येते प्रचिती, धन्य पावली धरा,
वटवृक्षा, तुझा आजही आहे भव्य विराट पसारा.

दशके, शतके स्तब्ध उभा तू, झगडत वादळ-वारा
निश्चल, अचल, खंबीर असा, तव हा व्याप्त पसारा
मनुष्यास या शिकवून जाई, तव गांभीर्याचा इशारा,
वटवृक्षा, तुझा आजही आहे भव्य विराट पसारा.

तव पारंब्या शोषून घेती, भुईच्या जीवन-धारा
तुझ्या मुळानी राखले तुजला, होऊनी तुझा सहारा
प्रशांत, अविचल उभा राहुनी, देशी अथक पहारा,
वटवृक्षा, तुझा आजही आहे भव्य विराट पसारा.

अजर आहेस, अमर आहेस, शाश्वत तुझा पसारा
अनुभूती येई तुला पाहता, ऋषींच्या मंत्रोच्चारा
वटवृक्षा, तुझा आजही आहे भव्य विराट पसारा,
मनुष्य, प्राणी, द्विजगण सारे इथे शोधिती निवारा. 

वटवृक्षा, तुझा आजही आहे भव्य विराट पसारा,
मनुष्य, प्राणी, द्विजगण सारे इथे शोधिती निवारा.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.02.2023-बुधवार.   
=========================================